You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
औरंगाबाद लेबर कॉलनी : 30 जेसीबी, 6 पोकलेन, मोठ्या पोलिस बंदोबस्तात पाडकाम सुरू
औरंगाबादमधील लेबर कॉलनी जमीनदोस्त करण्याच्या प्रक्रियेला सकाळी सुरुवात झाली आहे. सरकारी कर्मचारी आणि मोठ्या पोलिस बंदोबस्तात हे काम सुरू आहे.
पहाटे 5 वाजेपासून या वसाहतीत जाणारे सगळे रस्ते बंद करण्यात आले आहेत. या परिसरात पोलिसांनी कलम 144 बुधवार सकाळपासून ते रात्रीपर्यंत लागू केलं आहे.
औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण स्वत: या कारवाईप्रसंगी उपस्थित आहेत.
औरंगाबादमधील लेबर कॉलनी 67 वर्षांपासून जुनी आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवासासाठी ती तयार करण्यात आली होती.
आज मात्र ही कॉलनी पाडण्यात येत आहे. या कॉलनीत 338 सदनिका होत्या.
आजच्या कारवाईविषयी बोलताना औरंगाबाद सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे यांनी बीबीसी मराठीला सांगितलं, "आज 30 जेसीबी, 6 पोकलेन, 150 महसूल कर्मचारी, 300 हून अधिक पोलिसांचा फौजफाटा लेबर कॉलनीच्या पाडकासाठी तैनात करण्यात आला आहे. संध्याकाळी 4 किंवा 5 वाजेपर्यंत पाडकामाई कारवाई पूर्ण होईल."
ही कारवाई का करण्यात येत आहे, असं विचारल्यावर ते म्हणाले, "लेबर कॉलनीत पूर्वी सरकारी कर्मचारी राहायचे. हे सर्व्हिस क्वार्टर होतं. पण, रिटायर झाल्यानंतरही कर्मचारी ती घरं सोडत नव्हते. कर्मचाऱ्यांची मुलं, नातू असे नातेवाईक इथं येऊन राहायचे."
लेबर कॉलनी पाडण्याआधी काय प्रक्रिया केली, यावर ते म्हणाले, "हे प्रकरण कोर्टात होतं. आधी जिल्हा न्यायालय, मग उच्च न्यायालय आणि मग ते सर्वोच्च न्यायलयात गेलं. त्यानंतर मग रहिवाशांना टाईमलाईन वाढवून देण्यात आली आणि आज ते बांधकाम पाडून टाकण्यात आलं आहे."
नवीन योजना काय?
लेबर कॉलनीचा परिसर हा साडे एकोणावीस एकर एवढा मोठा आहे. त्यामुळे या पाडकामानंतर तिथं काय काम करण्याची योजना आहे, असाही प्रश्न उपस्थित होतो.
याविषयी मुळे सांगतात, "याठिकाणी कॅबिनेट हॉल उभारण्याचं नियोजन आहे. दुसरं म्हणजे कलेक्टर ऑफिस आणि इतर नवीन इमारती उभारण्याचं नियोजन आहे."
अनेकांचा विरोध
पाडकाम कारवाई सुरू होण्याआधी अनेक लोकांनी स्वतःचं घर आवरायला, सामान घेऊन जायला सुरुवात केली.
डोळ्यात पाणी आणून लोक घर सोडत असल्याचं दिसून आलं. अनेकांचं सर्व आयुष्य इथं गेलं त्यामुळं ही वसाहत सोडताना त्यांना गहिवरून येत होतं.
पण, सर्वोच्च न्यायालयाने ही घरे पाडण्याचे निर्देश दिल्याने जिल्हा प्रशासनाने आज कारवाई केली आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)