You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
जोधपूर: आजवर कधीही हिंसा न झालेल्या या शहरात झेंड्यावरून गदारोळ का झाला? - ग्राऊंड रिपोर्ट
- Author, कीर्ती दुबे
- Role, बीबीसी प्रतिनिधी, जोधपूरहून
- Published
- वाचन वेळ: 7 मिनिटे
1992 मध्ये भारतात जेव्हा जातीय हिंसाचार उसळला होता, अगदी तेव्हाही जोधपूर शांत होतं. निळ्या भिंतींच्या अरुंद गल्ल्या असलेल्या जोधपूर शहरात कधीच दोन धर्मांमध्ये संघर्ष झालेला बघायला मिळाला नव्हता.
यंदाच्या ईदच्या एक रात्र आधी मात्र इथली परिस्थिती झपाट्याने बदलली. 2 मे रोजी रात्री 11 वाजता इथं सुरू झालेला वाद अशा पद्धतीने चिघळला की, असा वाद जोधपूरच्या इतिहासात कधी घडला नसेल.
यानंतर 8 मेपर्यंत शहरात संचारबंदी लागू करण्यात आली होती.
संचारबंदी नक्की असते कशी, हे पाहण्यासाठी लोक त्यांच्या दारं-खिडक्यांमधून बाहेर डोकावत होते. पण गेल्या दोन दिवसांत असं नेमकं काय घडलं, ज्यामुळे जोधपूरसारखं निवांत शहर जातीय हिंसाचाराला बळी पडलं.
नेमका वाद सुरू कसा झाला?
आतापर्यंत या वादाची सुरुवात झेंड्यांवरून झाल्याचं बोललं जात होतं. मात्र, प्रत्यक्षात या वादाची सुरुवात झेंड्यांवरून झालीच नाही. झेंडा हा या वादाचा दुसराच अध्याय आहे.
वास्तवात या प्रकरणाची सुरुवात जलौरी गेट चौकातील बालमुकुंद बिस्सा नावाच्या स्वातंत्र्यसैनिकांच्या पुतळ्यापासून झाली. शहराच्या मध्यभागी असलेल्या या चौकात प्रत्येक धर्माचे लोक आपापल्या सणावेळी सजावट करतात. मग त्यात महावीर जयंती असो, आंबेडकर जयंती असो किंवा रामनवमी.
अशाप्रकारे परशुराम जयंतीच्या दिवशी ब्राह्मण समाजाने इथं भगवे झेंडे लावले होते. 2 मे रोजी दुपारी 2.30 वाजता समाजाच्या संमतीनंतर प्रशासनाने हे झेंडे हटवले होते.
यानंतर काही मुस्लीम मुलांनी ईदसाठी सजावट करण्याच्या उद्देशाने संध्याकाळी हिरवे झेंडे लावले.
पुतळ्यावर झेंडा लावण्यासाठी काळ्या फितीचा वापर करण्यात आला. याला हिंदू समाजाच्या लोकांनी आक्षेप घेतला. आणि बघता बघता या मुद्द्यावरून सोमवारी रात्री उशिरा दोन गटात जोरदार हाणामारी झाली.
हाणामारी झाल्यानंतर हिंदू समाजाच्या लोकांनी हिरव्या झेंड्यांची संपूर्ण सजावट काढून तिथे भगवे झेंडे लावले.
नमाजच्या तयारीसाठी लावण्यात आलेले लाऊडस्पिकरही तोडण्यात आले. आणि इथूनचं हिंसाचार वाढला. या हिंसाचारामुळे जोधपूरच्या इतिहासात कधीच न लागलेली संचारबंदी लावण्यात आली.
जोधपूरच्या रहिवाशांचे म्हणणं आहे की, अशी घटना यापूर्वी कधीही घडली नव्हती.
लोक बाहेरून आले होते का?
रात्री उशिरा पोलिसांनी लाठीचार्ज करून वातावरण नियंत्रणात आणलं. मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळी ईदची नमाज अदा केली जात असताना या चौकात लावलेल्या भगव्या झेंड्यांवर मुस्लिम समाजातील काहींनी आक्षेप घेत घोषणाबाजी केली.
घडलेल्या प्रकाराने संपूर्ण शहरात पेट घेतला. शहरातील हिंदू-मुस्लिम संमिश्र लोकसंख्या असलेल्या भागात जोरदार दगडफेक झाली. संतप्त जमावाने रस्त्यावर उभी असलेली वाहने फोडली.
जुन्या जोधपूरच्या ईदगाह रोड परिसरात देवेंद्रच्या कुटुंबातील चार पिढ्या नांदल्या. ते सांगतात की, त्यांनी मागच्या काही दिवसांत ज्या प्रकारचा हिंसाचार आणि संतप्त जमाव पाहिलाय ते बघता, ते 'आमचे लोक' नव्हते असं त्यांचं म्हणणं आहे.
देवेंद्र सांगतात, "खूप गर्दी जमली होती. गर्दीतील काही लोकांच्या हातात हिरवे झेंडेही होते. शे-दीडशे लोकांपैकी एकही माणूस आमच्या इदगाह परिसरातील नव्हता. आम्ही इथं तीन चार पिढ्यांपासून राहतोय. आणि मी सांगतोय ना की, इथलं वातावरण खूप चांगलं आहे. त्यादिवशी आम्हाला पहिल्यांदाच भीती वाटली. आम्ही स्वतःला घरात कोंडून घेतलं.
ही भीती मला माझ्या शेजारच्या मुस्लिमांची नव्हतीचं. हे लोक कधीच काही करणार नाहीत, पण बाहेरच्या लोकांचं काय? आजही बाहेर गेलो तर 'जय राम जी की' म्हणत भेटू पण त्या दिवशी कोण आलं होतं, नक्की कसं घडलं, काहीचं समजायला मार्ग नाही.
आता हे सांगणारे देवेंद्र एकटेच नव्हते. प्रत्येकजण तुम्हाला एकचं गोष्ट सांगताना दिसेल. ती गोष्ट म्हणजे हा हिंसाचार सुनियोजित होता आणि ज्यांनी तो केला ते लोक बाहेरून आलेले होते.
सर्वसामान्यांबरोबरच प्रशासनही हेच सांगताना दिसतंय. पण ते सिद्ध करण्यासाठी अजूनपर्यंत तरी कोणताही ठोस पुरावा मिळालेला नाही. पोलिसांनी आतापर्यंत ज्या लोकांना अटक केलीय, त्यापैकी एकही व्यक्ती शहराबाहेरचा नाही.
वेगवेगळ्या धर्माचे लोक आपापल्या सणासुदीच्या काळात जालोरी गेट सजवताना दिसतात. मात्र, ईदच्या दिवशी इथं सजावट करायला कोणी आलंय, असं कधीच दिसलं नाही. मुस्लिमांनी त्यांच्या सणासाठी हा चौक सजवण्याची ही पहिलीच वेळ होती. पण ती सजावट सणापर्यंत टिकू शकली नाही.
जावेद सांगतात, "आमचेही सण आहेत. आमच्या सणाला आम्ही चौक सजवायचा विचार केला, तर त्यात काय चुकलं? सजावट करताना एकच काठी होती, जी मधोमध ठेवावी लागत होती. झेंडा उभा राहू शकत नव्हता, म्हणून त्या मुलांनी काठी वरून बांधायचा प्रयत्न केला. मला मान्य आहे की, असं करताना काळी पट्टी बिस्सा यांच्या चेहऱ्यावर आणि गळ्यावर जात होती. मात्र यातून बऱ्याच लोकांना त्यांना मारहाण करायची संधी मिळाली. आणि त्यांनी त्या मुलांना मारहाण करायला सुरुवात केली. जर त्यांना पट्टीची अडचण होती, तर त्यांनी पट्टी का काढायला हवी होती. त्यांनी संपूर्ण सजावट का काढली."
दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा लोकांनी नमाज नंतर भगव्या झेंड्याचा निषेध केला तेव्हा इथला हिंसाचार वाढला. त्यानंतर पोलिसांनी भगवा झेंडा काढून तिथं तिरंगा लावला.
पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे प्रकरण चिघळलं का?
सीआरपीसीच्या कलम 151 (कर्फ्यूचे उल्लंघन) अंतर्गत या प्रकरणात आतापर्यंत 200 जणांना अटक करण्यात आली असून, दंगल भडकवल्याप्रकरणी 20 जणांना अटक करण्यात आली आहे. पण हे लोक कोण आहेत? ते बाहेरून आले होते का? बीबीसीला अद्याप ही पोलिसांकडून माहिती मिळालेली नाही.
मात्र, हा केवळ दोन गटातील हाणामारी पुरता मर्यादित विषय नाही. प्रशासनाने कारवाई करण्यात दिरंगाई केली हे देखील परिस्थिती बिघडण्यामागे एक प्रमुख कारण असल्याचं म्हटलं जातंय. स्थानिकांच्या आरोपानुसार, पहिल्यांदा दंगल भडकू दिली आणि नंतर प्रशासकीय कर्मचारी कामाला लागले.
जुन्या जोधपूरच्या अरुंद गल्ल्यांमध्ये प्रत्येक सणाच्या वेळी पोलीस बंदोबस्त करण्यात येत असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. पण यावेळी एक रात्र आधी शहराच्या आतील भागात पोलीस बंदोबस्त ठेवलाच नाही. त्यामुळे चौकातून शहराच्या आतील भागापर्यंत हिंसाचार पसरत गेला हे एक महत्त्वाचं कारण बनलं.
लोकांच म्हणणं आहे की, 'नमाजानंतर पोलिसांनी चौकाचौकात जमावावर लाठीमार केला आणि त्यांना हुसकावून लावले. मात्र, शहरात मोठ्या प्रमाणावर दगडफेक झाली यावर पोलिसांनी कोणतीच कारवाई केली नव्हती.'
बीबीसीशी बोलताना जोधपूरचे आयुक्त नवज्योती गोगोई सांगतात, "हे खरं आहे की, सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत वातावरण तणावपूर्ण होतं आणि कर्फ्यू लागू करेपर्यंत दोन वाजले होते. पोलिसांनी रात्री लाठीचार्ज केल्यानंतर आता त्या भागात तणावाची स्थिती नाहीय. आम्ही दोन्ही समाजातील लोकांशी बोललो. नमाज अदा केल्यानंतर परिस्थिती आणखी बिघडली पण आम्ही परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यानंतर शहरात जेव्हा दंगल उसळली तेव्हा आम्ही संचारबंदी लागू केली. आमच्या बाजूने तर कशासाठीचं उशीर झाला नाही."
"हिंदू आणि मुस्लीम धर्मातील लोकांशी चर्चा केल्यानंतर हे प्रकरण मिटलं. पण हे ही तितकंच खरं आहे की भाजपच्या आमदार आणि त्यांचे समर्थक सकाळपर्यंत तिथेच होते. ते लोक आमच्या वाटाघाटीत सहभागी होते, पण सगळे गेल्यानंतरही ते तिथेच होते. आम्ही ज्या लोकांवर कारवाई केली आहे ते अतिशय ऑब्जेक्टिव आहेत. कारवाई करताना आम्ही व्हीडिओ आणि आमचे इंटेलिजन्स इनपुट विचारात घेतले आहेत."
मात्र, शहराच्या आतील भागात पोलीस बंदोबस्त का नव्हता, यावर मात्र नवज्योती गोगोई कोणतंही उत्तर देत नाहीत.
हिंसाचार, राजकारण आणि मूर्ती
जोधपूरमधील जातीय दंग्याला अनेक पदर आहेत. फक्त प्रशासकीय दिरंगाईच नाही तर राजकीय पक्षांनीही या प्रकरणाला हवा दिली.
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी भाजपवर दंगली भडकवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केलाय.
रात्री उशिरा दंगल उसळली, तेव्हा भाजप आमदार सूर्यकांता व्यास त्यांच्या समर्थकांसह जलौरी गेटवर पोहोचल्या. सकाळी 6 वाजेपर्यंत ते चौकाचौकात थांबले होते.
पोलिसांनी रात्रीपर्यंत परिस्थिती आटोक्यात आणली असताना देखील भाजपच्या नेत्यांना चौकात थांबण्याची काय गरज भासली?
बीबीसीच्या या प्रश्नावर भाजप आमदार सूर्यकांता व्यास म्हणतात, "आम्ही उभे राहणार नाही तर कोण राहणार? एवढं सगळं घडलं. जोधपूरमध्ये आजवर असं काही घडलं नव्हतं, मग आत्ता घडल्यावर आम्ही शांत कसं राहू."
त्या म्हणतात की, "बिस्साजींच्या पुतळ्यावर टेप लावला कसा? आम्ही आमच्या लोकांसोबत उभे होतो. प्रशासनाने सांगावं की ते लोक कोण होते आणि हे सगळं कसं घडलं? आमच्या गल्लीत एका बाजूला मशीद आणि दुसऱ्या बाजूला मंदिर आहे. नमाज सुरू झाल्यावर आरती थांबते आणि आरती सुरू झाली की नमाज. पण तरीही असं कसं घडलं?"
मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या विधानाचा संदर्भ देत त्या म्हणतात, "जर त्यांना वाटतं की भाजप हे सर्व करतयं, तर सरकारही त्यांचचं आहे आणि प्रशासनही त्यांचचं. मग ते कारवाई का करत नाहीत?"
पण रात्रभर चौकात त्या का थांबल्या याचं स्पष्ट उत्तर त्या देत नाहीत.
त्यावर त्यांच्यासोबतचं उपस्थित असणारे भाजप कार्यकर्ता कमलेश पुरोहित याचं उत्तर देतात.
पुरोहित सांगतात, "आमची हिंदू मुलं रागात होती आणि आम्हाला त्यांना शांत करून परत पाठवायचं होत. आम्ही निघून गेलो तर तिथं दुसरं काही घडायला नको. म्हणूनच आम्ही सकाळपर्यंत तिथे बसलो. ज्यांनी झेंडा लावला त्यांना अटक झाली पाहिजे असं मुलांचं म्हणणं होतं. पण तसं न झाल्याने ते रागात होते."
दोन्ही समाजातील लोक जखमी झाले. कोण्याएका विशिष्ट धर्माचे लोकचं हिंसाचाराला बळी पडले नव्हते.
सोनोरोकबास परिसरात राहणारे शाकीर त्यांच्या मित्रासोबत ईदची नमाज अदा करण्यासाठी गेले होते.
शाकीर आधीच आजारी आहेत. त्यांच्या दोन्ही किडन्या खराब झाल्यामुळे त्यांना दर आठवड्याला डायलिसिस करावे लागते.
मात्र, ईदची नमाज आटोपून परतत असताना त्यांच्यावर लोखंडी सळईने हल्ला करण्यात आला. डोके वाचवण्यासाठी त्यांनी हात पुढे केला तर त्यांचा हात तुटला.
ते म्हणतात, "ते माझ्या डोक्यावर वार करत होते, पण सुदैवाने हातावर निभावलं. आता हात तुटलायं पण नशीब बलवत्तर आहे."
सोनारोकबास परिसरात राहणाऱ्या दीपक नावाच्या व्यक्तीने आपल्यावरही चाकूने हल्ला झाल्याचे सांगितले.
दंगल उसळल्यानंतर प्रशासनाने दोन्ही गटांच्या नेत्यांशी चर्चा केली आहे, जेणेकरून परिस्थिती सुधारता येईल. मात्र या जातीय हिंसाचाराकडे राजकीय चष्म्यातून पाहता येणार नाही. आणि इथले लोकचं असं म्हणतायतं. पुढील वर्षी राज्यात निवडणुका आहेत आणि करौली आणि जोधपूरला त्यांच्यापासून वेगळे करणे योग्य होणार नाही, असं काही लोकांचं मत आहे.
या शांतता चर्चेत मुफ्ती शेर मोहम्मद खान रिझवी मुस्लिमांचे नेते म्हणून सहभागी झाले होते.
त्यांनी बीबीसीला सांगितलं की, "बैठकीत मी जे काही बोललो तेच तुम्हालाही सांगेन. जर मुस्लिम मुलाकडून काही चूक झाली असेल, तर मी माझ्या समाजाच्या वतीने माफी मागतो आणि हिंदू बांधवांकडून काही चूक झाली असेल तर मी माझ्या समाजाच्या वतीने त्यांना माफही करतो. आम्हाला आमच्या शहरात शांतता टिकवून ठेवायची आहे. पण मी हे सांगू इच्छितो की आमच्या उत्सवाचे झेंडे काढून तिथे भगवे झेंडे लावल्यामुळे काही मुलं संतप्त झाली आहेत."
"त्यांचं म्हणणं होतं की भलेही आमचा झेंडा तिथं लावू नका तर तिरंगा लावा. पण ते काम नंतर पोलिसांनी केलं. मी कोणाला दोष देत नाही, पण पुढच्या वर्षी राजस्थानमध्ये निवडणुका आहेत. त्यामुळे दोन्ही धर्माच्या लोकांनी आपापसात भांडावं आणि आमची डाळ शिजावी अशी काही लोकांची इच्छा आहे. ते कोण आहेत ते तुम्हाला ही माहीत आहे. करौलीपासून जोधपूरपर्यंत हेच घडतयं."
भाजपचे कार्यकर्ते कमलेश पुरोहित भीती व्यक्त करत म्हणाले, "हे बघा, असं एकदाही घडून चालणार नाही. कारण भविष्यात अशा घटना घडण्यासाठीची ही एक संधी असते."
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)