You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
46 वर्ष लिव्ह-इनमध्ये आणि 69 व्या वर्षी लग्न, झारखंडमधील ही प्रथा काय आहे?
- Author, रवी प्रकाश
- Role, बीबीसी हिंदीसाठी, रांचीहून
- Published
- वाचन वेळ: 4 मिनिटे
झारखंडच्या खुंटी जिल्ह्यातील डुमरदगा गावातील फुलमनी टूटी 46 वर्षांच्या आहेत. 1998 मध्ये पहिल्या लग्नाच्या वेळेस त्यांचं वय 22 वर्षं होतं. त्यानंतर 7 वर्षांनी त्यांच्या पतीचा मृत्यू झाला. तोवर त्यांना दोन मुलं झाली होती आणि तिसरं बाळ पोटात होतं. त्या गरोदर होत्या.
पतीच्या मृत्यूनंतर त्या एकट्या पडल्या. तीन अपत्य आणि पैसै कमावून घरखर्च चालवू शकेल, असा घरात कुणी तरुण पुरुष नाही.
त्यांचे सासरे वृद्ध होते. त्यामुळे ते कुठे काम करू शकत नव्हते, तर सासूचा आधीच मृत्यू झाला होता. त्यामुळे त्यांच्यावर डोंगराएवढं दु:ख होतं.
दोन मुलं, एक मुलगी आणि सासरे बिरसा लोहरा यांच्यासोबत त्या राहत होत्या. त्यावेळी सासऱ्यानं बहिणीच्या मुलाला महावीर यांना दत्तक घेतलं.
फुलमनी आणि महावीर एकमेकांच्या जवळ आले आणि मग लिव्ह-इनमध्ये राहायला लागले. या नात्याला त्यांच्या सासऱ्याचा पाठिंबा होता.
सूनेला जीवनसाथी आणि कुटुंबाला वारस मिळाल्यानं ते खूश होते. या नात्याला सामाजिक मान्यता देण्यासाठी त्यांना गावातील पंचांकडे जावं लागणार होतं. त्यांच्या सल्ल्यानुसार या दोघांचं विधीवत लग्न करायचं होतं. पण, याआधीच त्यांच्या सासऱ्याचा मृत्यू झाला.
आता घरात फुलमनी टूटी, त्याची मुलं आणि महावीर लोहरा राहत होते. महावीर मजुरी करत घरखर्च भागवायला लागले आणि त्यांचं जीवन पुन्हा सुरळीत झालं. ते दोघेही पती पत्नीसारखं राहायला लागले.
पण, परंपरेनुसार लग्न न झाल्यामुळे त्यांना 'ढुकू' म्हटलं जाऊ लागलं. कारण ते आपल्याच गावातील महिलेसोबत समाजाच्या अधिकृत मंजुरीशिवाय लिव्ह-इनमध्ये राहत होते. यामुळे मग फुलमनी यांना त्यांच्या सासऱ्याच्या जमिनीवर कायदेशीररित्या हक्क मिळवता आला नाही.
एका स्वयंसेवी संस्थेद्वारा आयोजित सामूहिक विवाह सोहळ्यात त्यांचं विधीवत लग्न पार पडलं आहे. या संस्थेसाठी त्या व्हिलेज को-ऑर्डिनेटर म्हणून काम पाहत होत्या.
फूलमनी टूटी सांगतात, "मला माझ्या सासरकडच्या संपत्तीवर मालकी हक्क मिळाला आहे आणि माझ्या पतीला ढुकूपासून सुटकारा मिळाला आहे. आता आम्ही विधीप्रमाणे पती पत्नी आहोत. 16 वर्षं लिव्ह-इनमध्ये राहिल्यानंतर आमचं लग्न झालं आहे. त्यामुळे आम्ही आनंदी आहेत.
"आधी आम्ही सरना धर्माचं पालन करत होतो. पण आता ख्रिश्चन आहोत. त्यामुळे आमचं लग्न चर्चच्या परंपरेनुसार झालं आहे. या विवाह सोहळ्यात सरना आणि हिंदू धर्मातील लोकांचंही लग्न करण्यात आलं. ते सगळे आमच्याप्रमाणे लिव्ह-इनमध्ये राहत होते."
अनेक जोडप्यांचं लग्न
खुंटी इथं आयोजित सामूहिक विवाह सोहळ्यात फुलमनी टुटी यांच्याप्रमाणे अनेक ढुकू जोडप्यांचं लग्न पार पडलं. आणि या जोडप्यांना आता त्यांच्या समाजाकडूनही लिव्ह-इन रिलेशिनशिपला सामाजिक आणि कायदेशीर मान्यता मिळाली आहे.
सिलवंती मुंडाईन यापैकीच एक आहेत. त्या 69 वर्षांच्या आहेत आणि त्यांचं विधीवत लग्न आतापर्यंत होऊ शकलं नव्हतं. त्यांच्या सगळ्यात मोठ्या मुलाचं वय 40 वर्ष आहे. त्या त्यांचे पती प्रभू सहाय आईंद यांच्यासोबत गेल्या 46 वर्षांपासून लिव्ह-इनमध्ये राहत होत्या.
आता मात्र त्या विधीवत पत्नी आहेत आणि झारखंडमधील आदिवासी समाजाच्या परंपरेनुसार त्यांना त्यांच्या सासरकडच्या मंडळीच्या संपत्तीवर मालकी हक्क मिळाला आहे.
सिलवंती आणि फुलमनी यांच्याप्रमाणे प्रमिला टोपनो, ढेकला उराइन, फूलो मुंडाइन, जाउनी मुंडाइन, कृपा सोय, मरियम बोदरा, शांति आईंद यांचंही लग्न वर्षानुवर्षांच्या लिव्ह इन रिलेशनशिप आणि मुलांच्या जन्मानंतर झालं आहे.
झारखंडमध्ये यापद्धतीचं लग्न लागल्यास कुणाला त्याचं आश्चर्य वाटत नाही. कारण ही पद्धत आदिवासी परंपरेचा एक भाग आहे.
आदिवासी समाजात अनेक प्रकारचे लग्न प्रचलित आहे. ज्यात ढुकू प्रथेचा समावेश आहे.
ढुकू प्रथा काय आहे?
आदिवासी समाज हा सामान्यपणे महिलाप्रधान समजला जातो. या समाजात प्रत्येक निर्णयात महिलांचा सहभाग सुनिश्चित केला जातो. असं असलं तरी संपत्तीवर कब्जा करण्याच्या मोहात चेटकीण समजून महिलांच्या हत्यांमुळेही झारखंडवर टीकाही केली जाते.
हा मूळात आदिवासी समाजाशी संबंधित प्रकरण आहे. लग्न आणि जोडीदार निवडण्याच्या बाबतीत आदिवासी समाजाच्या प्रथा परंपरा महिलांना विशेष अधिकार देतात.
ढुकू प्रथा याच स्वातंत्र्याचं द्योतक आहे, असं आदिवासी धर्मगुरू बंधन तिग्गा यांचं मत आहे.
बंधन तिग्गा यांनी बीबीसीला सांगितलं, "झारखंडच्या गावात आखाड्यांची परंपरा आहे. इथं आयोजित धुमकुडिया उत्सवादरम्यान तरुण-तरुणींना वेगवेगळं राहण्याची सोय करण्यात येते. संध्याकाळ झाली के एकत्र येताता आणि डान्स करतात. यादरम्यान एखादा तरुण किंवा तरुणीला दुसरं कुणी पसंत आलं तर ते समोरच्याला प्रेमाचा प्रस्ताव देतात.
"मग ते ही गोष्ट आपल्या आई-वडिलांना सांगतात. घरचे तयार झाले तर मग या जोडप्याची विधीवत लग्न करून दिलं जातं. पण, काही प्रकरणांत कुटुंबीय लग्नासाठी तयार होत नाहीत.
"तेव्हा मग ते जोडपं लिव्ह-इनमध्ये पती पत्नीसारखं राहायला लागतं. त्यांना ढुकू असं संबोधलं जातं. काही प्रकरणांत तर अशी जोडपे गाव सोडून जातात आणि मुलं-बाळं झालं की गावात परत येतात. त्यानंतर मग ते जोडपं आपल्या लग्नाला सामाजिक मान्यता मिळावी यासाठी गावातल्या पंचांकडे जातं.
ते सांगतात, "पंच त्यांना दंड ठोठावतात. तो भरून झाला की या जोडप्याचं विधीवत लग्न लावून दिलं जातं. जेणेकरून त्यांना त्यांच्या पिढीजात संपत्तीत वाटा मिळावा आणि त्यांची येणारी पीढीही विधीवत लग्न करू शकेल. त्यामुळे मग कधीकधी तर एकाच मंडपात काही तासांच्या अंतरानं आई-वडिल आणि त्यांच्या मुला-मुलींचं लग्नही तुम्हाला पाहायला मिळतं."
सामूहिक विवाह का?
बंधन तिग्गा सांगतात, "ढुकू जोडप्यांवर सामान्यपणे किंचित दंड लावण्याची प्रथा आहे. कधीकधी हा दंड 100-200 रुपयांपासून एखादा बोकड कापण्यापर्यंत तर गाव जेवण देण्यापर्यंत मर्यादित असतो. दंड लावताना पंच त्या जोडप्याची आर्थिक स्थिती पाहत असतात."
ढुकू प्रथेत राहणाऱ्या जोडप्यांचं सामूहिक विवाह सोहळा घडवून आणणारी संस्था निमित्तच्या संस्थापक निकिता सिन्हा यांच्या मते, झारखंडमध्ये अशा सोहळ्यांचं आयोजन नियमितपणे करण्याची गरज आहे. कोल इंडिया आणि खुंटी जिल्हा प्रशासनाही या सोहळ्याच्या आयोजनला पाठिंबा दिला आहे.
त्यांनी बीबीसीला सांगितलं, "निमित्तच्या माध्यमातून आम्ही आतापर्यंत 1950 जोडप्यांचं लग्न लावलं आहे. यासाठी डझनभराहून अधिक सामूहिक विवाह सोहळ्यांचं आयोजन केलं आहे. असं लग्न करताना त्या जोडप्यांचा धर्म काय आहे, याची आम्हाला काळजी घ्यावी लागते. त्यांच्या धर्माच्या परंपरेनुसार त्यांचं लग्न केलं जातं. मग ते सरना असो हिंदू असो की ख्रिश्चन. धर्मातील प्रथापरंपरेनुसार त्यांचं लग्न लावलं जातं.
"आतापर्यंत झालेल्या लग्नाच्या आकडेवारीनुसार, 85 टक्के जोडप्यांचं लग्न तेव्हा झालं जेव्हा त्यांना मुलं झालेली होती. लग्न करणाऱ्यांत 85 टक्के जोडणे आदिवासी (एसटी) आहेत."
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)