श्रेयस तळपदे: तर मराठी चित्रपटसुद्धा जमवू शकतील कोट्यवधींचा गल्ला, श्रेयसने सांगितली ट्रिक

    • Author, विशाखा निकम
    • Role, बीबीसी मराठी
  • Published
  • वाचन वेळ: 2 मिनिटे

सध्या साऊथचे चित्रपट आणि बॉलिवूड असा वाद रंगलाय. पुष्पा, आरआरआर आणि नुकताच रिलीज झालेला केजीएफ 2 या साऊथ चित्रपटांची कोटींची उड्डाणं पाहून बॉलिवूडचं टेन्शन वाढलंय.

अनेक बॉलिवूडचे कलाकार यावर बोलत आहेत. अभिनेता श्रेयस तळपदेनेही बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीत यावर आपलं मत मांडलं आहे.

साऊथ इंडियन फिल्म आणि बॉलीवुड या वादात बॉलीवुडचं नुकसान होतंय का? यावर श्रेयस तळपदे म्हणतो,

"चित्रपट म्हटले की स्पर्धा ही आलीच. आपल्या चित्रपटसृष्टीला एवढ्या वर्षांची परंपरा आहे. तुमच्याकडे जर सशक्त कथा असेल तर घाबरायची गरज नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज साऊथ फिल्म इंडस्ट्री एवढी वाढत आहे त्याला बराच अवधी जावा लागलाय. त्यांचा एक चाहतावर्ग निर्माण झालाय त्यामुळे आज त्यांना असा रिस्पॉन्स मिळतोय."

चित्रपटांनी नेमकं काय करणं अपेक्षित आहे यावर तो म्हणतो, "तुम्ही तो प्रयत्न केला का? पण आज तुम्हाला ती संधी उपलब्ध आहे. तुम्ही तुमच्या वेगवेगळ्या फिल्म वेगवेगळ्या भाषांमध्ये डब करा. हे सर्व एका रात्रीत शक्य नाही, त्यासाठी वेळ जाईल. पण तुमच्या चित्रपटांसाठी वेगवेगळ्या बाजारपेठा खुल्या होतील."

"सहसा मराठी चित्रपट हे 10 ते 15 करोडचा गल्ला कमावतात. पण मार्केटमध्ये अशा वेगवेगळ्या भाषांमध्ये चित्रपट डब केले तर काय सांगावं ते ही असाच गल्ला जमा करतील. आणि त्यासाठी पुष्पा हे एक मोठे उदाहरण आहे. तुम्ही याच्याकडे जर एक संधी म्हणून पाहिलं तर तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल," असं श्रेयस पुढे सांगतो.

प्रवीण तांबे यांच्यावर बायोपिक करताना कोणते चॅलेंजेस आले? यावर श्रेयस म्हणतो, "एखाद्याच्या आयुष्यावर बायोपिक करताना चॅलेंजेस हे असतातच. तो चित्रपट कायमस्वरूपी बघितला जाणार आहे. जगभरातून वेगवेगळे लोक हा चित्रपट बघणार आहेत. आम्ही दाखवलेला प्रवीण तांबे त्यांना काय म्हणून दिसतोय ही आमची जबाबदारी असते. प्रवीण तांबेच्या बाबतीत काय घडलं, त्याला कशाप्रकारे स्ट्रगल करावं लागलं, हे लोकांपर्यंत योग्य पद्धतीने पोहोचवणं सगळ्यात मोठी जबाबदारी असते."

याबाबतीत श्रेयस सांगतो, चित्रपट बघितल्यानंतर मला प्रवीण तांबेंचा फोन आला. आणि त्याने मला सांगितलं की चित्रपटांमध्ये मला मीच काम केलंय असं वाटलं. तो जेव्हा हे मला बोलला तेव्हा ती माझ्या कामाची पोचपावती होती आणि ती मला मिळाली.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)