ऑस्कर सोहळ्यात अँकरला थोबाडीत लगावणारा विल स्मिथ भारतात

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

काही दिवसांपूर्वी झालेल्या ऑस्कर सोहळ्यात निवेदकाला थोबाडीत मारल्याप्रकरणी वादात अडकलेला अभिनेता विल स्मिथ मुंबईत पाहायला मिळाला. एएनआय वृत्तसंस्थेनं यासंदर्भात बातमी दिली आहे.

विल भारतात वैयक्तिक भेटीगाठींसाठी आहे. या दौऱ्याबाबत प्रसारमाध्यमांना कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. विमानतळावर विल स्मिथ यांच्याबरोबर भगवे वस्त्रधारी गृहस्थही दिसले.

विल स्मिथ याआधी भारतात आला होता. त्यावेळी त्याने हरिद्वारला भेट दिली होती. स्मिथने शंकराचा अभिषेकही केला होता. भारत भेटीचं वर्णन त्याने अद्भुत असं केलं होतं. प

हिंदू धर्माबाबत विलला आस्था आहे. त्याने भविष्यही जाणून घेतलं होतं. आधीच्या भारत भेटीदरम्यान विलने इशा फाऊंडेशनचे संस्थापक सदगुरू जग्गी वासुदेव यांची भेट घेतली होती. वासुदेव यांनी स्वत: या भेटीविषयी माहिती दिली होती.

ऑस्कर सोहळ्यात काय झालं होतं?

सर्वोत्कृष्ट माहितीपट पुरस्कार घोषणेवेळी रॉक बोलत होते. त्यावेळी त्यांनी पिंकेट स्मिथ यांच्यासंदर्भात GI Jane2 म्हणजेच केसविरहित डोक्याचा उल्लेख केला. पिंकेट स्मिथ यांना अलोपेसिआ नावाचा आजार आहे. यामध्ये डोक्यावरचे केस जातात. यासंदर्भात पिंकेट स्मिथ यांनी जाहीरपणे या आजाराविषयी सांगितलं होतं.

रॉक बोलत असताना स्मिथ व्यासपीठावर गेले आणि त्यांनी थोबाडीत लगावली. तुझ्या बोलण्यात माझ्या बायकोचा उल्लेख करू नकोस असं स्मिथ सांगत असताना दिसलं. स्मिथ यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. त्यावेळी बोलताना स्मिथ यांनी माफी मागितली.

माझं वागणं योग्य नव्हतं आणि त्याचं समर्थन होऊ शकत नाही. ख्रिस, मी तुझी जाहीर माफी मागतो. मी शिष्टसंकेतांचा भंग केला. मी चुकलो"

मी संयोजकांची माफी मागतो. नॉमिनेशन मिळालेल्या कलाकारांची माफी मागतो. प्रेमात पडल्यानंतर माणूस अनेक अतर्क्य गोष्टी करतो. माझ्या हातून असंच काहीसं घडतं", असं स्मिथ यांनी सांगितलं.

विल स्मिथ यांना अटक व्हायला हवी आणि त्यांच्यावर शारीरिक मारहाणाची कलमं लागू करण्यात यावी असं काहींना वाटतं.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)