बोरिस जॉन्सन गुजरातमध्येः नरेंद्र मोदी सगळ्या परदेशी पाहुण्यांना गुजरातमध्येच का नेतात?

मोदी आणि बोरिस

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, तेजस वैद्य
    • Role, बीबीसी गुजराती प्रतिनिधी
  • Published
  • वाचन वेळ: 5 मिनिटे

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन हे भारतभेटीवर आले असून, आज त्यांनी भारताचे पंतप्रधान मोदी यांची अहमदाबाद येथे भेट घेतली.

या आठवड्याच्या सुरुवातीलाचं गुजरातमधील जामनगर येथे डब्लूएचओच्या ग्लोबल सेंटर फॉर ट्रेडिशनल मेडिसिनच्या उद्घाटनावेळी मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जुगनाथ आणि डब्लूएचओचे प्रमुख टेड्रोस गेब्रेयसस सुद्धा गुजरातमध्ये आले होते.

यापूर्वी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप, जपानचे पंतप्रधान शिंजो आबे, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि इतर नेत्यांनीही गुजरातला भेटी दिल्या आहेत.

जर आपण या सगळ्या नेत्यांच्या भेटींचा कालखंड पाहिला तर असं लक्षात येईल की 2014 मध्ये अनेक देशांच्या पंतप्रधान आणि राष्ट्रपतींनी गुजरातला भेटी दिल्या आहेत. पण यापूर्वी ही संख्या कमी होती. पूर्वी ही नेतेमंडळी स्वतःला दिल्लीपुरतं मर्यादित ठेवायचे किंवा पर्यटक म्हणून ताजमहाल पाहण्यासाठी जायचे. तर कधी कधी मुंबई किंवा चेन्नईसारख्या इतर शहरांना सुद्धा भेटी द्यायचे.

गुजरात भेटीवर आलेले जिनपिंग ते बोरिस जॉन्सन

सप्टेंबर 2014 मध्ये चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग भारत दौऱ्यावर आले होते. तेव्हा त्यांनी प्रथम अहमदाबाद आणि नंतर दिल्लीला भेट दिली.

2017 मध्ये जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी 13 आणि 14 सप्टेंबर रोजी अहमदाबादला भेट दिली होती.

2018 मध्ये इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनीही अहमदाबादला भेट दिली होती. त्यानंतर त्यांनी दिल्ली आणि मुंबईलाही भेट दिली.

फेब्रुवारी 2020 मध्ये, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप आणि त्यांच्या पत्नी भारताच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आले होते. त्यांनी पहिल्यांदा अहमदाबाद आणि त्यानंतर आग्रा आणि दिल्ली या ठिकाणी भेटी दिल्या.

आणि आता, ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन गुरुवारी अहमदाबादमध्ये आलेत. ते अहमदाबादमध्ये काही कार्यक्रम आणि सभांना उपस्थित राहतील आणि नंतर ते दिल्लीकडे रवाना होतील.

परंपरेत बदल

आता हेच जर 2014 पूर्वीच्या दौर्‍यांवर नजर टाकली तर दिसेल की, परदेशातील नेत्यांच्या दौऱ्यांची सुरुवात मुख्यतः राजधानी दिल्लीतूनच होते आणि अशी परंपराही होती. मुंबई ही आर्थिक राजधानी असल्याने काही देशांचे नेतेही मुंबईत उतरायचे. कधी-कधी, पण क्वचितच हे परदेशी मान्यवर इतर कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी चेन्नई किंवा कोलकाता इथं जायचे. देशाच्या सर्वोच्च नेतृत्वासोबतच्या बैठका या मात्र दिल्लीपुरत्याचं मर्यादित होत्या.

आता परिस्थिती बदलली आहे. नरेंद्र मोदी अनेक देशांच्या प्रमुखांना गुजरातमध्ये नेतात.

परदेशी नेत्यांच्या स्वागतासाठी रोड शो आणि विविध कार्यक्रमही आयोजित केले जातात.

मोदी आणि शिंजो आबे

फोटो स्रोत, EPA

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप 2020 मध्ये गुजरात दौऱ्यावर आले होते तेव्हा मोटेरा क्रिकेट स्टेडियमवर 'नमस्ते ट्रंप' नावाचा कार्यक्रम आणि रोड शो आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमावर टीका झाली होती.

जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांचा भारत दौराही गुजरातमधून सुरू झाला. त्यावेळी गुजरातमध्ये '50 जपानी कंपन्या' असल्याने त्यांचा गुजरात दौरा 'महत्त्वाचा' असल्याचं मत तज्ज्ञांनी नोंदवलं होतं.

2014 मध्ये चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि त्यांच्या पत्नी अहमदाबादला आले असताना, साबरमती नदीच्या काठावर लोकनृत्य सादर करून त्यांचं स्वागत करण्यात आलं होतं.

दिल्लीस्थित राजकीय विश्लेषक विनोद शर्मा म्हणतात, "भारताच्या पंतप्रधानांनी परदेशी राष्ट्रपती किंवा पंतप्रधानांना वारंवार आपल्या गृहराज्यात बोलावलंय अशा घटना कधीच घडल्या नाहीत."

मात्र, अलीकडच्या काळात काही नेत्यांनी राजधानी दिल्ली आणि देशाच्या इतर भागांतही भेटी दिल्या आहेत. ऑक्टोबर 2021 मध्ये, डेन्मार्कचे पंतप्रधान मॅट फ्रेडरिकसन यांनी दिल्लीला भेट दिली.

फेब्रुवारी 2020 मध्ये म्यानमारचे अध्यक्ष यू विन मिंट यांनी दिल्ली आणि आग्र्याला भेट दिली.

2018 आणि 2019 मध्ये श्रीलंका, भूतान आणि पोर्तुगालच्या पंतप्रधानांनी भारताला भेट दिली होती. ते देखील दिल्लीच्या दौऱ्यावर आले होते. ऑक्टोबर 2019 मध्ये, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आणि पंतप्रधान मोदी यांनी तामिळनाडूमधील ममल्लापुरम येथील युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाला भेट दिली.

ऑक्टोबर 2017 मध्ये इटलीचे पंतप्रधान पाओलो जेंटिलो यांनीही दिल्लीला भेट दिली होती.

मोदी आणि नेत्यान्याहू

फोटो स्रोत, AP

फोटो कॅप्शन, मोदी आणि नेत्यान्याहू

जर एखाद्या देशाचे प्रमुख गुजरातला भेट देत असतील तर त्यामागे नेमकं कोणतं कारण असू शकतं? पंतप्रधान असूनही नरेंद्र मोदी इतर राज्यांच्या तुलनेत गुजरातला अधिक प्राधान्य देत आहेत.

गुजरात बिझनेस मॉडेलसाठी?

नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी व्हायब्रंट गुजरात समिटला सुरुवात केली होती. यात देश-विदेशातील गुंतवणूकदारांना आकर्षित करणे हा प्रमुख उद्देश होता. भाजपने गुजरातची ओळख बिझनेस मॉडेल आधारित राज्य अशी करून द्यायला सुरुवात केली.

गुजरात चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष हेमंत शाह म्हणतात, "परदेशी नेत्यांच्या गुजरात दौऱ्यांचा येथील उद्योगासाठी खूप फायदा झाला. आज जगाच्या नकाशावर गुजरातला महत्त्वाचं स्थान प्राप्त झालं आहे."

ते म्हणतात, "जेव्हा परदेशी पाहुणे येतात तेव्हा त्यांना राज्याविषयी माहिती मिळते. ज्याचे दीर्घकालीन फायदे असतात. आणि याच आधारावर ते गुंतवणुकीच्या योजना तयार करतात."

"पंतप्रधान गुजरातचेच आहेत आणि त्याचा गुजरातला फायदा होत असेल तर ते चांगलच आहे."

जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील निवृत्त प्राध्यापक आणि लेखक घनश्याम शाह मात्र या गोष्टींशी सहमत नाहीत.

ते म्हणतात, "गुंतवणूकदार हे कोणत्याही एका देशाचे नसतात."

"नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री नव्हते तेव्हाही गुजरातमध्ये परकीय गुंतवणूक येतच होती."

अहमदाबाद हे शहर कापड गिरण्यांसाठी प्रसिद्ध होते. गुजरातची व्यावसायिक प्रतिमा ही भाजप सरकारपेक्षा ही जुनी असल्याचं शहा सांगतात.

राजकीय फायद्यासाठी भेट?

डोनाल्ड ट्रम्प असो वा नेतन्याहू किंवा मग शिंजो आबे. या नेत्यांच्या भेटीदरम्यान रोड शो आयोजित करण्यात आले होते. हजारो लोक या रोड शोसाठी रस्त्यावर जमले होते. या कार्यक्रमांवर त्यावेळी टीकाही झाली होती.

काही तज्ज्ञ अशा कार्यक्रमांना "राजकीय फायदा मिळवण्यासाठी केलेले प्रयत्न" असल्याचं मत व्यक्त करतात.

दिल्लीस्थित राजकीय विश्लेषक विनोद शर्मा म्हणतात, "संघीय पद्धतीच्या राजकारणामध्ये प्रत्येकजण समानपातळीवर असतो. त्यामुळे एखाद्या राज्याला जास्त महत्त्व मिळालं तर ते हानिकारक ठरू शकतं."

शर्मा पुढे म्हणतात की "नरेंद्र मोदी जेव्हा पंतप्रधान झाले तेव्हा ते 'टीम इंडिया' म्हटले होते. जेव्हा संघाचा विचार केला जातो तेव्हा सर्व खेळाडूंना खेळण्याची समान संधी उपलब्ध असते."

ते म्हणाले, "परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी कोणत्या राज्यांकडे संसाधने आहेत, नाहीत हे केंद्र सरकारने पाहावं."

मोदी

फोटो स्रोत, AFP

"राज्यांनी सर्वाधिक एफडीआय (परकीय थेट गुंतवणूक) आणावी यासाठी राज्यांमध्ये रचनात्मक स्पर्धा निर्माण करणे ही केंद्राची जबाबदारी आहे. त्यासाठी प्रत्येक राज्याला समान संधी दिली गेली पाहिजे."

"एखाद्या परदेशी नेत्याला गुजरातमध्ये विशेष गुंतवणूक करायची असेल किंवा त्यांचा तसा आग्रह असेल, तर ती बाब वेगळी आहे."

ज्येष्ठ गुजराती पत्रकार रमेश ओझा म्हणतात, "मला वाटत नाही की नरेंद्र मोदींनी दिलंय तेवढं महत्त्व इतर कोणत्याही पंतप्रधानाने आपल्या राज्याला दिलं असेल. मला यात दोन गोष्टी दिसतात, पंतप्रधानांची त्यांच्या राज्याविषयी असलेली आस्था आणि दुसरी म्हणजे गुजरात म्हणून असलेला त्यांचा कम्फर्ट झोन."

गुजरातचा प्रचार करण्याची योजना?

जेव्हा एखादा नेता दुसर्‍या देशाला भेट देतो तेव्हा तो सहसा त्या देशाच्या राजधानीत जातो. काही प्रकरणांमध्ये, ते देशाच्या राजधानीव्यतिरिक्त तेथील इतर शहरे किंवा राज्यांना देखील भेटी देतात.

गुजरात कौन्सिल ऑफ द असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑफ इंडियाच्या माजी अध्यक्ष आणि महिला व्यावसायिक भाग्येश सोनेजी म्हणतात, "भारताचे पंतप्रधान आणि भारताचे गुजराती पंतप्रधान असण्यातला फरक नरेंद्र मोदींमध्ये दिसून येतो."

घनश्याम शाह म्हणतात, "यामागील हेतू हा आहे की गुजरात इतर राज्यांपेक्षा पुढे आहे. 2009 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी हे भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार होते आणि मोदी त्यांचे प्रचारक होते."

"त्यावेळी ही मोदी आपल्या भाषणात अडवाणींना गुजरातचे 'प्रतिनिधी' म्हणून अधोरेखित करायचे. कारण अडवाणी गांधीनगरमधून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी आले होते."

शहा म्हणतात, "नरेंद्र मोदी गुजरातचा प्रचार करण्याची एकही संधी सोडत नाहीत. गुजरात हे राज्य राष्ट्रीय स्तरावरील आदर्श राज्य आहे असा संदेश त्यांना द्यायचा असतो."

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)