हुबळी : कर्नाटकमध्ये दिल्लीतील जहांगीरपुरीप्रमाणे हिंसा, काय आहे प्रकरण?

    • Author, इमरान क़ुरैशी
    • Role, बीबीसीसाठी
  • Published
  • वाचन वेळ: 3 मिनिटे

उत्तर कर्नाटकमधील हुबळी शहरात सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टविरोधात काही लोक रस्त्यावर उतरले. जमावाला शांत करण्यासाठी पोलिसांना अश्रुधूराच्या गोळ्या झाडाव्या लागल्या.

परिस्थिती नियंत्रणात आणत असताना काही पोलीस जखमी झाले आहेत. दरम्यान, संतप्त जमावाने पोलिसांची गाडी पेटवली. ही घटना शनिवारी (16 एप्रिल) रात्रीची आहे.

नमाजानंतर काही लोक जुन्या शहराच्या पोलीस स्टेशनसमोर जमा झाले. या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला.

हुबळीचे पोलीस आयुक्त लाभू राम यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं, "एका धार्मिक स्थळाला अपवित्र करणारा बनावट (मॉर्फ्ड) व्हीडिओ पोस्ट करणाऱ्या एका इसमाला अटक केली आहे. या व्हीडिओमुळे लोकांमध्ये नाराजी होती. या विरोधात तक्रारही करण्यात आली होती."

बनावट व्हीडिओ बनवणाऱ्याला पोलिसांनी अटक केल्यानंतरही पोलीस स्टेशनबाहेर लोकांनी गर्दी केली होती. संबंधित इसमाला अटक केली आहे, हे समजवण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू होता. पण त्यांना अपयश आलं आणि जमाव हिंसक बनला.

जमावाकडून दगडफेक सुरू झाली. त्यांनी पोलिसांच्या गाडीचंही नुकसान केलं.

राज्याचे गृहमंत्री अरागा जनानेंद्र यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं की, या घटनेत सात पोलीस जखमी झाले आहेत. यात एक पोलीस निरीक्षकसुद्धा आहेत. त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

रात्रीच्या नमाजानंतर संतप्त झालेल्या जमावाला शांत करण्यासाठी पोलिसांना अनेक तास लागले. रविवारी (17 एप्रिल) सकाळी पोलिसांना अश्रुधूराचा वापर करावा लागला. या दरम्यान संतप्त जमावाने गाड्या, हॉस्पिटल आणि एका धार्मिक स्थळावर दगडफेक केली.

परिस्थिती आता नियंत्रणात असल्याचा दावा पोलीस आयुक्त लाभू राम यांनी केला आहे. तसंच परिसरात संचारबंदी लागू केली आहे.

दोन दिवसांपूर्वीच धारवाडमध्ये एका मुस्लीम विक्रेत्याचे टरबूज नष्ट केल्याचा आरोप असलेल्या सहा सदस्यांचा श्रीराम सेनेने सत्कार केला.

हुबळी येथील स्थानिक मंदिराजवळ टरबूज विकणाऱ्या एका मुस्लीम विक्रेत्याची सर्व फळं उद्ध्वस्त केली. गेल्या दहा वर्षांपासून विक्रेता मंदिराजवळ फळ विकत होते.

गेल्या आठवड्यात सहा लोकांचा समूह त्याठिकाणी पोहचला आणि त्यांनी फळ विक्रेत्याचे जवळपास आठ ते दहा क्विंटल टरबूज नष्ट केले.

शनिवारी रात्री एकाबाजूला हुबळीमध्ये तणावपूर्ण परिस्थिती होती तर दुसऱ्या बाजूला हजारोंच्या संख्येने कर्नाटकची राजधानी बंगळुरू येथे पारंपरिक सण साजरा करण्यासाठी जुन्या शहरात लोक एकत्र जमले होते.

करागा जुन्या बंगळुरू शहराचा महत्त्वाचा सण आहे.

करागा म्हणजे, मातीच्या भांड्यांवर उभा केला जाणारा फुलांचा पीरॅमिड. याला द्रौपदीचं प्रतीक मानलं जातं. आपल्या डोक्यावर घेऊन चालणारे पुजारी पिवळ्या रंगाची साडी नेसतात आणि आपल्या पत्नीचे मंगळसूत्र, बांगड्या घालतात. पुजारी जेव्हा हे घेऊन चालतात तेव्हा त्यांच्यासोबत द्रौपदीचे वीर-पुत्र 'वीरकुमार' असतात.

परंपरेनुसार ही पूजा पार पडल्यानंतर मध्यरात्री पुजारी श्री धर्मरायस्वामी मंदिरातून तवक्कल मस्तान दर्ग्यात फातिहा वाचल्यानंतर पुन्हा मंदिरात परततात. दरवर्षी हजारो हिंदू भाविक या दर्ग्याला भेट देतात.

हा सण प्रामुख्याने 'वाहनिकुला क्षत्रिय' साजरा करतात. तमीळ भाषेत 'थिगाला समुदाय' म्हणूनही ओळखले जातात.

फजलुल हसन यांच्या 'बँगलोर थ्रू द सेंचूरी' आणि स्मृति श्रीनिवास यांची 'लँडस्केप ऑफ अर्बन मेमरी: द सेक्रेड अँड द सिविक इन इंडियाज हाय-टेक सिटी' यातही करागा आणि सूफी संत तवक्कल मस्तान यांचा उल्लेख आढळतो.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)