You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
संजय राऊत यांची राज ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका, 'नवहिंदू औवेसी' असा केला उल्लेख
"मशिदीसमोर भोंगे लावण्यासाठी काही लोकांना सुपाऱ्या दिल्यात. यांनी भोंगे लावले की मग खरा औवेसी येणार आणि त्यानं दंगली घडवायच्या. नवहिंदू औवेसी आणि खरा औवेसी यांच्या माध्यमातून महाराष्ट्रात दंगली घडवायच्या, असं भाजपचं नियोजन आहे," असा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे.
"त्यानंतर मग राजभवनातून कायदा व सुव्यवस्थेच्या नावावरून केंद्र सरकारला अहवाल पाठवून राष्ट्रपती राजवट लावण्याचा प्रयत्न करायचा, अशाप्रकाराचे कुटील कारस्थान महाराष्ट्रात सुरू आहे," असं राऊत पुढे म्हणाले.
संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. त्यात त्यांनी भाजप आणि राज ठाकरे यांना टोला लगावला आहे.
भाजप आणि राज ठाकरे यांच्याकडून अद्यापपर्यंत राऊत यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देण्यात आलेलं नाही.
दरम्यान, संजय राऊत म्हणाले, "ज्याने भाड्याने हिंदुत्व घेतलं आहे त्याने आम्हाला हिंदुत्व शिकवू नये. काही गरज नाही. कोल्हापूरची पोटनिवडणूक लागल्यानंतर या काही लोकांनी भोंगे, हनुमान चालिसा याचं घाणेरडं राजकारण सुरू करून तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पण, कोल्हापूरच्या जनतेनं त्यांचे भोंगे खाली उतरवले आहेत.
"त्यामुळे भाजप ज्यापद्धतीचं राजकारण नवहिंदुत्ववादी औवेसी किंवा नवहिंदुत्ववादी एमआयएम कडून करू इच्छित आहे, त्याचा काही उपयोग होणार नाही. कोल्हापूरचा निकाल त्याचा दाखला आहे."
राऊत पुढे म्हणाले, "भोंगे लावून हिंदुत्व वाढत नाही, लोक स्वीकारत नाही. भोंग्यामागचे आवाज कुणाचे आहेत हे कोल्हापूरच्या जनतेनं दाखवलं आहे.
"रामनवमीला राज्यात 10 दंगली झाल्या. ज्या राज्यात भविष्यात विधानसभा निवडणुका आहेत, तिथलं ऐक्य बिघडवायचं, हे काम काही लोकांनी केलं."
(ही बातमी सतत अपडेट होत आहे.)
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)