पंकजा मुंडेः महाविकास आघाडी सरकार नापास म्हणजेच उद्धव ठाकरे नापास

पंकजा मुंडे

फोटो स्रोत, facebook

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा..

1. महाविकास आघाडी सरकार नापास म्हणजेच उद्धव ठाकरे नापास - पंकजा मुंडे

"मुख्यमंत्री जरी एका पक्षाचे असले तरी सरकार मात्र दुसराच पक्ष चालवत असल्याचं दिसत आहे. महाविकास आघाडी सरकार सर्वच पातळीवर नापास झालं आहे. त्यामुळे सरकार नापास म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नापास," असं वक्तव्य भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केलं आहे.

सरकारच्या कामगिरीविषयी बोलताना मुंडे म्हणाल्या, "राज्य सरकारच्या कामाचं विश्लेषण करायचं म्हटलं तर उद्धव ठाकरे या व्यक्तीविषयी लोक चांगला विचार करतात. पण या सरकारविषयी चांगला विचार करत नाहीत. ठाकरे सरकार सर्वच पातळीवर नापास झालं आहे. तीन वेगवेगळ्या विचारांचे पक्ष एकत्र आले आहेत. त्यामुळे या सरकारमध्ये गोंधळ सुरू आहे. राज्य सरकार नापास आहे म्हटल्यावर मुख्यमंत्री ठाकरे हेसुद्धा नापास झाले आहेत." ही बातमी एबीपी माझाने दिली.

2. राज ठाकरे यांची 9 एप्रिलची सभा रद्द, नवी तारीख ठरली

येत्या 9 एप्रिल रोजी ठाणे येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. पण पोलिसांच्या परवानगी अभावी ही सभा रद्द करण्यात आली आहे.

राज ठाकरे

सभेचं ठिकाण आणि तारीख बदलल्याची माहिती मनसे नेते अभिजित पानसे आणि आमदार राजू पाटील यांनी दिली आहे.

नव्या नियोजनानुसार राज ठाकरे यांची सभा गडकरी रंगायतन येथील दुसऱ्या रस्त्यावर चिंतामणी चौक परिसरात होणार आहे, असं मनसे पदाधिकाऱ्यांनी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितलं. त्यानुसार, ही सभा 12 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता सुरू होईल. ही बातमी लोकमतने दिली.

3. 'अनिल देशमुखांना जामीन मिळाला तर ते साक्षीदारांवर दबाव आणतील'

"माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे राज्यातले मोठे राजकीय नेते असून त्यांचे मोठ्या व्यक्तींशी संबंध आहेत. त्यामुळे जामीन मिळाला तर ते साक्षीदारांववर दबाव आणू शकतात," अशी शब्दात ED ने कोर्टासमोर बाजू मांडली आहे.

अनिल देशमुख

फोटो स्रोत, FACEBOOK/ANIL DESHMUKH

100 कोटींच्या वसुली प्रकरणात जामीन मिळावा यासाठी अनिल देशमुख यांनी अर्ज केला आहे. यावेळी युक्तिवाद करताना ED कडून सहायक संचालच तहसीन सुलतान यांनी आपल्या संस्थेची बाजू कोर्टासमोर मांडली.

"देशमुख यांनी आपल्या कारकिर्दीत मोठ्या प्रमाणात संपत्ती जमा केली आहे. ती कशी जमा केली याचा स्त्रोत ते अजुनही सांगू शकले नाहीत. तसंच त्यांना जामीन मिळाला तर ते या तपासातील पुराव्यांशी ते छेडछाड करु शकतात, अशी शक्यता ED ने कोर्टासमोर वर्तवली आहे. ही बातमी मुंबई तकने दिली.

4. राजभवनात दही-खिचडी खाणाऱ्यांनी, पत्ते खेळणाऱ्यांनीच पुरावे दिले - संजय राऊत

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी गेल्या दोन दिवसांपासून INS विक्रांत प्रकरणातील कथित गैरव्यवहाराचा मुद्दा उचलून धरला आहे. याप्रकरणी राऊत थेट किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांच्यावर थेट आरोप करताना दिसत आहेत.

संजय राऊत

फोटो स्रोत, Getty Images

यासंदर्भात बोलताना राऊत म्हणाले, "राजभवनात जाऊन जे रोज खिचडी खात आणि पत्ते खेळत बसतात त्यांनीच हे पुरावे दिले. हा देशद्रोहासारखा मोठा गुन्हा आहे."

"आज राज्यसभा या विषयावर बंद पडली. आम्ही प्रश्न विचारले. त्यावेळी भाजपचे खासदार गप्प बसले होते," असंही ते म्हणाले. ही बातमी टीव्ही 9 मराठीने दिली.

5. अभिनेत्री आसावरी जोशी यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

अभिनेत्री आसावरी जोशी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुख्यालयात हा कार्यक्रम गुरुवारी (7 एप्रिल) पार पडला.

आसावरी जोशी यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाने एक वेगळी ओळख प्राप्त केली आहे. सध्या त्या स्टार प्रवास वाहिनीवर स्वाभिमान : शोध अस्तित्वाचा या मालिकेत काम करत आहेत.

जोशी यांनी 1986 मध्ये माझं घर माझा संसार या मराठी चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली होती. ही बातमी लोकसत्ताने दिली.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)