आई हाका मारत होती 'निदान माझ्या मुलाला तरी कुणी वाचवा,' अन् जीव धोक्यात घालून पोलिसाने वाचवले प्राण

Published
वाचन वेळ: 4 मिनिटे

धार्मिक तणावातून उसळलेल्या दंगलीत आगीचा डोंब उसळला होता. संपूर्ण परिसर पेटला होता, लोक सैरावैरा पळत होते. या आगीत एक महिला आणि तिचं बाळ अडकलं होतं. आपल्या बाळाचा जीव वाचवा म्हणून एक आई हृदयातून आर्त हाक देत होती.

"कुणी माझ्या मुलाला तरी वाचवा, असं ती जीवाच्या आकांताने ओरडत होती," आणि तिची हाक एका पोलिसाने ऐकली. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्याने डोळ्याचे पाते लवते न लवते तोच माय-लेकरांना वाचवले. त्या पोलिसाचे आज सर्वत्र कौतुक होत आहे.

राजस्थानातील एका पोलीस कर्मचाऱ्याचा एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा पोलीस कर्मचारी पेटलेल्या घरातून लहान मुलाला तसंच त्याच्या आईला वाचवताना या फोटोत दिसत आहे.

राजस्थानातील करौली जिल्ह्यातील ही घटना असून महिला-मुलाचे प्राण वाचवणाऱ्या त्या शूर पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे नेत्रेश शर्मा. नेत्रेश हे राजस्थान पोलिसांत पोलीस कॉन्स्टेबल म्हणून करौलीच्या कोतवाली ठाण्यात कार्यरत आहेत.

गुढीपाडव्याच्या दिवशी म्हणजेच शनिवारी (2 एप्रिल) करौली येथे धार्मिक तणावातून दंगल भडकली होती. यावेळी समाजकंटकांकडून मोठ्या प्रमाणात दगडफेक आणि जाळपोळ असे प्रकार झाले. याच दरम्यान नेत्रेश शर्मा यांनी आगीत अडकलेल्या महिला-मुलाला वाचवलं.

स्वतःचा जीव धोक्यात घालून केलेल्या या कामगिरीमुळे नेत्रेश यांचं देशभरातून कौतुक होत असून राज्य सरकारने त्यांना बढती देण्याची घोषणाही केली आहे.

नेमकं काय घडलं?

करौली येथील मुख्य बाजार परिसरात शनिवारी गुढीपाडव्याच्या सणाचा उत्साह सर्वत्र होता. बाजारपेठही चांगलीच गजबजली होती.

यावेळी एक महिला आणि तिचा मुलगा बाजारपेठेत खरेदीसाठी गेले होते. पण सायंकाळी पाच-सहाच्या सुमारास याठिकाणी एका बाईक रॅलीवर दगडफेकीच्या कारणावरून गोंधळ माजला. याच कालावधीत काही दुकाने पेटवून देण्याचा प्रकारही झाला. या घटनांमुळे बाजारपेठेत गदारोळ सुरू झाला.

या घटनेमुळे लोक सैरावैरा धावू लागले. मिळेल त्या ठिकाणी आश्रय घेण्याचा प्रयत्न करू लागले. महिला आणि तिच्या मुलाने एका घरात धाव घेतली आणि लपून बसले. त्यांच्यासोबत इतर काही नागरिकही लपून बसले होते.

पण नेमक्या याच घराच्या आजूबाजूला असलेली दोन्ही दुकाने समाजकंटकांनी पेटवून दिली. त्यामुळे महिला-मुलगा तसंच इतर महिलांचे प्राण धोक्यात आले होते. पण नेत्रेश शर्मा त्याठिकाणी आले आणि त्यांनी सर्वांना बाहेर काढण्याचं काम केलं.

याविषयी माहिती देताना पोलीस कॉन्स्टेबल नेत्रेश शर्मा सांगतात, "इथे एक घर आहे. त्याच्या आजूबाजूच्या दोन्ही दुकानांना आग लागली होती. प्रचंड मोठ्या ज्वाळा उठल्या होत्या. घराच्या दरवाजावर दोन-तीन महिला आरडाओरडा करताना मला दिसल्या. त्यापैकी एका महिलेच्या कडेवर एक लहान मूल होतं. कुणी माझ्या मुलाला तरी वाचवा, असं ती जीवाच्या आकांताने ओरडत होती."

महिलांना अडकलेलं पाहून आग विझवण्यासाठी लोकांचे प्रयत्न सुरू होते. लोक शक्य त्या पद्धतीने त्यांची मदत करण्याचा प्रयत्न करत होते.

याविषयी नेत्रेश शर्मा पुढे सांगतात, "मदतकार्य सुरू असताना माझी नजर त्या महिलेवर आणि तिच्या मुलावर पडली. आजूबाजूच्या आगीची पर्वा न करता मी त्या घरात घुसलो. एका महिलेकडची ओढणी मुलाच्या शरिराभोवती गुंडाळून त्याला कडेवर घेतलं. मी मुलाला घेऊन प्रचंड वेगात घराबाहेर पडलो. इतर दोन महिलासुद्धा माझ्या मागे-मागे धावत आल्या. त्यानंतर मी सर्वांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवलं."

घटनेचा फोटो देशभरात व्हायरल

करौलीत पेटलेल्या या दंगलीचं वार्तांकन काही पत्रकार करत होते. दैनिक भास्कर वृत्तपत्रासाठी कार्यरत असलेले पत्रकार उमेश शर्मा यांची नजर यावेळी वरील प्रकाराकडे गेली.

नेत्रेश शर्मा हे महिला-मुलांना वाचवत असल्याचा थरार शर्मा यांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केला.

या फोटोमध्ये दंगलीचं अत्यंत सजीव दृश्य दिसून आलं. मागे प्रचंड मोठी आग, एक लहान मूल आकाशी रंगाच्या कापडात गुंडाळलेल्या अवस्थेत पोलीस कर्मचाऱ्याच्या कडेवर आहे. पोलीस कर्मचारी संपूर्ण शक्तिनिशी तिथून धावत बाहेर येत आहे. तसंच त्याच्या पाठीमागे एक महिलाही वेगाने धावत बाहेर येण्याचा प्रयत्न करत आहे, असा हा फोटो काही क्षणातच सर्वत्र व्हायरल झाला.

सोशल मीडियावर या फोटोवर अनेक प्रतिक्रिया आल्या. सर्वजण नेत्रेश शर्मा यांचं तोंडभरून कौतुक करताना दिसून आले.

गहलोत यांच्याकडून बढतीची घोषणा

करौली दंगलीचा व्हायरल झालेला नेत्रेश शर्मांचा फोटो राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्यापर्यंत पोहोचला.

गहलोत यांनीही नेत्रेश शर्मा यांचं कौतुक करून त्यांना बढती देण्याची घोषणा केली आहे. नेत्रेश शर्मा यांना वैयक्तिक फोन करून गहलोत यांनी संवाद साधला.

यादरम्यान मुख्यमंत्री गहलोत म्हणाले, "मी तुमचा फोटो पाहिल्यानंतर पोलीस आयुक्त, पोलीस महानिरीक्षक यांच्याशी चर्चा केली. या पोलीस कॉन्स्टेबलला तुम्ही बढती दिली पाहिजे, अशी सूचना मी त्यांना केली. तुम्हाला पोलीस हेड कॉन्स्टेबल बनवण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. त्याबद्दल तुमचे अभिनंदन आणि शुभेच्छा. "

याच्या उत्तरादाखल नेत्रेश शर्मा मुख्यमंत्र्यांना म्हणाले, "खूप खूप धन्यवाद. हे माझं कर्तव्यच होतं. मी ते पार पाडलं."

त्यावर मुख्यमंत्री गहलोत यांनी म्हटलं, "कर्तव्य तर सर्वच जण पार पाडतात. पण स्वतःचा जीव धोक्यात घालून तुम्ही ज्याप्रकारे त्यांचा जीव वाचवला, ते अत्यंत कौतुकास्पद आहे."

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)