'माझ्या मुलांना आईची उणीव भासू देऊ नका' असं लिहून महिला डॉक्टरची आत्महत्या

फोटो स्रोत, Getty Images
- Author, मोहर सिंह मीणा
- Role, बीबीसीसाठी जयपूरहून
- Published
- वाचन वेळ: 2 मिनिटे
'मी कोणालाही मारलं नाही' असं स्यूसाईड नोटमध्ये लिहित राजस्थानमध्ये प्रसूतीतज्ज्ञ डॉ. अर्चना शर्मा यांनी आत्महत्या केली आहे.
डॉ. शर्मा यांच्या रुग्णालयात प्रसूतीवेळी एका महिलेचा मृत्यू झाला होता. मृत महिलेच्या नातेवाईकांनी केलेल्या आरोपानंतर डॉ. शर्मा यांच्यावर हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला. खूनाचा गुन्हा दाखल केल्यामुळे डॉ. शर्मा तणावात होत्या अशी चर्चा आहे.
डॉ. शर्मा आत्महत्या आणि त्यांच्यावर दाखल गुन्ह्याप्रकरणी राजस्थानच्या डॉक्टरांनी 24 तास कामबंद आंदोलन सुरू केलंय.
डॉ. अर्चना शर्मांनी स्यूसाईड नोटमध्ये काय लिहीलंय?
डॉ. अर्चना शर्मा यांनी मंगळवारी सकाळी 11 वाजता आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी डॉ. अर्चना शर्मा यांनी एक स्यूसाईड नोट लिहीलीय.
'मी कोणालाही मारलं नाही. माझी यात काहीच चूक नाहीये.' असं त्यांनी नोटमध्ये लिहिलंय. त्या पुढे लिहीतात, 'PPH एक सामान्यत: आढळून येणारी गुंतागुंत आहे. यासाठी डॉक्टरांना त्रास देणं बंद करा. बहुदा माझं मरणंच मी दोषी नसल्याचा पुरावा आहे.'
त्या पुढे लिहीतात, निष्पाप डॉक्टरांना नाहक त्रास देणं बंद करा.
डॉ. अर्चना शर्मा यांनी आत्महत्या करण्यापूर्वी ही स्यूसाईड नोट हाताने लिहील्याचं दिसून येतंय.
त्यांनी पुढे आपल्या कुटुंबाबद्दल लिहिलंय. 'मी माझे पती आणि मुलांना खूप प्रेम करते. मी मेल्यानंतर त्यांना कृपाकरून त्रास देऊ नका. माझ्या मुलांना कधीच आईची कमी जाणऊ देऊ नका.'
डॉ. शर्मा यांच्यावर हत्येचा गुन्हा का दाखल झाला?
राजस्थानच्या दौसा जिल्ह्यातील लालसोटमध्ये डॉ. अर्चना शर्मा यांचं आनंद रुग्णालय आहे. रविवारी या रुग्णालयात 22 वर्षीय महिलेला प्रसूतीसाठी आणण्यात आलं. डॉक्टरांनी उपचार सुरू केले. पण महिलेला रक्तस्राव मोठ्या प्रमाणात होत होता.
या महिलेचा प्रसूतीदरम्यान मृत्यू झाला. ज्यानंतर मृत महिलेच्या नातेवाईकांनी खूप गोंधळ घातला. हा मृत्यू डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला. महिलेच्या कुटुंबीयांनी रुग्णालयाबाहेर आंदोलन केलं. तसंच डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
नातेवाईकांच्या गोंधळानंतर पोलिसांनी डॉ. अर्चना यांच्यावर गुन्हा दाखल केला.
पत्रकारांशी बोलताना दौसाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक लाल चंद कयाल म्हणाले, "या डॉक्टरवर उपचारादरम्यान महिलेच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या डॉक्टने आत्महत्या केलीये."
डॉ. शर्मा यांचे पती डॉ. सुनीत उपाध्याय यांनी या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केलीये.
ही घटना राजस्थानचे आरोग्यमंत्री परसादी लाल मीणा यांच्या मतदारसंघात घडलीये.
डॉ. शर्मा यांच्या आत्महत्येबाबत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत ट्विटरवर लिहीतात, "डॉ. अर्चना शर्मा यांची आत्महत्या खूप दुखःद आहे. डॉक्टर रुग्णाचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करतो. पण एखादी अनुचित घटना घडली तर डॉक्टरांना दोष देणं योग्य नाही."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
डॉक्टरांनी पुकारला संप?
डॉ. अर्चना शर्मा यांच्या आत्महत्येनंतर राजस्थानमधील सर्व डॉक्टरांनी 24 तास कामबंद आंदोलन सुरू केलंय.
डॉक्टरांनी बुधवारी राजस्थानमध्ये रस्त्यावर उतरून आंदोलन केलं. या प्रकरणी दोषींना शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी डॉक्टरांनी केली आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
























