बाईक घेण्यासाठी 2 लाखांची चिल्लर घेऊन तो आला आणि...

फोटो स्रोत, ANI
बाईक घेताना माणसं कर्ज घेतात. त्यासाठी कागदपत्रांची जुळवाजुळव करतात. पण या पठ्ठ्याने अडीच लाखांची बाईक चक्क एवढ्या रकमेची नाणी देऊन विकत घेतली.
तामिळनाडूतल्या कोयम्बतूर इथल्या व्ही. बूपाठी या माणसाने 2 लाख 60 रुपये किंमतीची बाईक चक्क एक एक रुपयांची चिल्लर देऊन विकत घेतली आहे. 27 मार्चला बूपाठी एका बाईक शोरुममध्ये गेले आणि त्यांनी बजाज डॉमिनॉर-400 ही बाईक विकत घेतली.
एवढ्या प्रचंड रकमेची नाणी असल्यामुळे शोरुममधल्या माणसांची तारांबळ उडाली. 2 लाख 60 रुपये इतक्या रकमेची नाणी मोजण्यासाठी शोरुम कर्मचाऱ्यांना तब्बल 10 तास लागले. बूपाठी यांनी ही नाणी एका व्हॅनमधून शोरुममध्ये आणली.
सगळी नाणी ट्रेमध्ये ओतून त्यांनी मोजायला सुरुवात केली. अनोख्या पद्धतीने बाईक विकत घेण्यासंदर्भात बूपाठी यांना विचारलं असता 29 वर्ष बाईक घेण्यासाठी ते पैसे साठवत असल्याचं त्यांनी सांगितलं.
मंदिरं, हॉटेल आणि चहाच्या टपऱ्या इथे मिळालेल्या एक रुपयांच्या नाण्यांचं बूपाठी यांनी जतन केलं. बूपाठी त्यांच्याकडच्या नोटा नाण्यांमध्ये बदलून घेत असत. सुट्टे पैसे झाले की त्याचं जतन करत असत.
शोरुमचे व्यवस्थापक महाविक्रांत यांना याबद्दल विचारलं असता ते म्हणाले, "नाण्यांच्या रुपात एवढी मोठी रक्कम घ्यायला आम्ही सुरुवातीला नकार दिला. पण बूपाठी यांना निराश झालेलं पाहायचं नव्हतं. त्यामुळे आम्ही तयारीला लागलो. एक लाख रुपयांची नाणी मोजण्यासाठी बँका अतिरिक्त कमिशन घेतात. बूपाठी यांचं बाईक घेण्याचं स्वप्न पाहून आम्ही संमती दिली."

बूपाठी यांचे 4 मित्र आणि शोरुमचे 5 कर्मचारी यांनी एकत्रपणे ही नाणी मोजली. 27 मार्चच्या सकाळी बूपाठी यांनी रक्कम शोरुममध्ये जमा केली. रात्री 9 वाजता नाणी मोजायची प्रक्रिया पूर्ण झाली. त्यानंतरच बूपाठी यांना बाईकची डिलिव्हरी मिळाली.
बूपाठी हे कोयम्बतूर शहरातल्या गांधी मैदानात परिसरात राहतात. बूपाठी एका खाजगी कंपनीत कॉम्प्युटर ऑपरेटर म्हणून काम करतात. त्याचं स्वत:चं युट्यूब चॅनेलही आहे. अनोख्या बाईक खरेदीचा व्हीडिओ त्यांना लवकरात लवकर युट्यूबवर टाकायचा आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)

























