You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
Ikea ने भारतात जम बसवण्यासाठी केले 'हे' बदल आणि उत्पादनं झाली सुपरहिट!
- Author, सौतिक बिस्वास
- Role, इंडिया करस्पाँडंट
- Published
- वाचन वेळ: 5 मिनिटे
नेहा मंडलिक ऑक्टोबर 2021मध्ये अहमदाबादमध्ये रहायला आल्या तेव्हा त्यांनी आयकियामधून फर्निचर आणि इतर लहानमोठ्या गोष्टी घेतल्या.
स्टडी टेबल, स्टूल्स, लँम्प, कार्पेट, डिशेस आणि काचेची इतर भांडी अशा सगळ्या गोष्टी त्यांनी आयकियामधून घेतल्या. स्विडनमध्ये सुरू झालेली ही आयकिया कंपनी आज जागतिक बाजारपेठेत एक 'फर्निचर जायंट' म्हणजेच फर्निचर क्षेत्रातली मोठी कंपनी मानली जाते. 2018 मध्ये आयकियाने भारतात प्रवेश केला. भारतातल्या दोन शहरांमध्ये आयकियाची भली मोठी दुकानं आहेत आणि अहमदाबादसह एकूण 7 शहरांमध्ये ऑनलाईन शॉपिंग सेवा आहे.
घरी पाहुणे आले की नेहा मंडलिक त्यांच्या घरातली 2 स्टडी टेबल्स जोडतात आणि त्याचं मग एक 8 माणसं बसू शकेल इतकं मोठं डायनिंग टेबल होतं. पांढरा, राखाडी आणि फिकट तपकिरी रंगांमध्ये मंडलिक यांनी त्यांचं नवं घर सजवलं आहे. नेहा उच्च शिक्षणासाठी लंडनच्या केन्सिंगटनमध्ये 18 महिने होत्या आणि नवीन घरातल्या सजावटीवरून त्यांना लंडनची आठवण येते.
"गेल्या काही वर्षांत माझी फर्निचरबद्दलची आवड पूर्णपणे बदलली आहे आणि आयकियाची उत्पादनं ही मला आवडणाऱ्या धाटणीची - aesthetics ची आहेत." नेहा मंडलिक आर्किटेक्ट आहेत आणि अहमदाबादेतल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन (NID) या प्रतिष्ठित संस्थेत शिकवतात.
नेहा महाराष्ट्रातल्या औरंगाबादमध्ये एकत्र कुटुंबात, मोठ्या घरात लहानाच्या मोठ्या झाल्या. तिथलं बहुतेक फर्निचर भरभक्कम होतं - सागवानी लाकडाचे सोफे आणि खुर्च्या, वरती काच असलेलं डायनिंग टेबल, घडीच्या जड लोखंडी खुर्च्या आणि सुटीसाठी फिरायला बाहेर गेल्यावर आईवडीलांनी घेतलेल्या लहानसहान गोष्टी - लॅम्प्स, लोलक, शोभेच्या लहानच्या लाकडी बोटी आणि लाकडी मुखवटे, यांनी घर सजलं होतं.
"आता कुटुंबं लहान होतायत आणि घरंही. घरं बदलण्याचं प्रमाणही वाढलेलं आहे. माझ्या पिढीचा फर्निचरकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदललाय." 35 वर्षांच्या नेहा सांगतात.
भारतातल्या अत्यंत गुंतागुंतीच्या समजल्या जाणाऱ्या फर्निचर मार्केटमध्ये प्रवेश करण्यामागचं आयकियाचं हे एक कारण होतं. एकीकडे भारतीय कुटुंबांमध्ये 'अँटिक' फर्निचर एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे सोपवलं जातं, तर आपल्याला गरजेनुसार तयार करण्याचं फर्निचर सुताराकडून करवून घेतलं जातं. भारतीय बाजारपेठेतली हजारो लहान दुकानं विविध प्रकारचं मॉडर्न फर्निचर तयार करून घरपोच देतात.
भारतातली फर्निचर बाजारपेठ अंदाजे 40 अब्ज डॉलर्सची आहे. यामध्ये फर्निचर आणि फर्निशिंग्स (फर्निचरसोबत लागणाऱ्या इतर वस्तू) यांचा समावेश आहे.
या सगळ्यामध्ये आपण हळुहळू आपलं स्थान निर्माण करत असल्याचं आयकियाचं म्हणणं आहे.
हैदराबाद आणि मुंबईमध्ये आयकियाची एकूण 4 लाख 30 हजार स्क्वेअर फुटांची दुकानं आहेत. इथे आणि ऑनलाईन विक्रीसाठी असणाऱ्या आयकियाच्या एकूण 8500 उत्पादनांपैकी अनेक उत्पादनांमध्ये कंपनीने खास भारतीय ग्राहकांच्या गरजा लक्षात घेत बदल केले आहेत.
"आयकियाला कोणतीही घाई नाही. भारतामध्ये एक संघटित, मूल्याधारित आणि मॉडर्न रिटेल फर्निचर मार्केट निर्माण करणं आणि वाढवणं हे त्यांचं उद्दिष्टं आहे," टेक्नोपॅक या कन्सल्टन्सी फर्मचे सीनियर व्हीपी अंकुर बिसेन सांगतात.
भारतात आयकिया विकत असलेल्या एकूण उत्पादनांपैकी एक तृतीयांश दरवर्षी बदलण्यात येतात आणि एकूण उत्पादनांपैकी 25% हे स्थानिक बाजारपेठेतून घेण्यात येत असल्याचं आयकिया इंडियाच्या चीफ कमर्शियल ऑफिसर कविता राव सांगतात. "भारतीय बाजारपेठ हे कायमच जागतिक कंपन्यांना आर्श्चयाचे धक्के देत आलेली आहे. वस्तूची किंमत हा या बाजारपेठेसाठी संवेदनशील मुद्दा आहे आणि प्रत्येक विभागामध्ये ग्राहकाला आकर्षित करण्यासाठी तुम्हाला कष्ट घ्यावे लागतात."
आयकिया भारतात विकत असलेल्या सर्वात स्वस्त सोफ्याची किंमत आहे 10 हजार रुपये. तर सगळ्यात महाग सोफा आहे 1 लाख 25 हजारांना.
19 रुपयांत तुम्हाला लहान मुलांसाठीचा रंगीबेरंगी चमच्यांचा सेट मिळतो, तर 99 रुपयाला व्हिस्कीचा ग्लास मिळतो. आयकियाच्या सर्वात स्वस्त उत्पादनांपैकी ही काही आहेत.
भारतीय ग्राहकांची आवडनिवड समजून घेण्यासाठी आयकियाने वेगवेगळ्या शहरांतल्या, वेगवेगळ्या उत्पन्न गटातल्या 2,000 कुटुंबाची भेट घेतली. त्यांना काही फर्निचर, फर्निशिंग अॅक्सेसरीज म्हणजे पडदे, बेडशीट्स आणि इतर गोष्टी दिल्या, किचनमधल्या वापराच्या गोष्टी दिल्या आणि त्या गोष्टींच्या वापराबद्दलची या लोकांची मत जाणून घेतली. भारतातल्या उष्ण, दमट आणि धूळ असलेल्या वातावरणात या वस्तूंची उपयुक्तता कंपनीला तपासायची होती.
भारत एक विखुरलेली - विविधांगी बाजारपेठ असल्याचं त्यांना आढळलं.
उदाहरणार्थ, मुंबईतल्या सर्वसामान्य घराच्या तुलनेत हैदराबादेतली सर्वसामान्य घर दुप्पट आकाराची असतात. म्हणून मग आयकियाने मुंबईमध्ये Vertical Storage म्हणजे उभ्या आकाराचं, सामान ठेवण्यासाठीचं फर्निचर बनवायला सुरुवात केली. मुंबईतल्या लहान घरांसाठी हे कमी जागेत जास्त सुविधा देणारं होतं. मुंबईतले ग्राहक असा सोफा ज्याचा ओढून बेड तयार करता येतो म्हणजेच सोफा कम बेड घेण्याची शक्यता जास्त असते.
हैदराबादमधले ग्राहक मोठे सोफो किंवा मोठे बेड्स घेण्याची शक्यता जास्त असते. म्हणूनच हैदराबाद आणि मुंबईतल्या स्टोअर्समधल्या बेडरूम डिस्प्लेंची रचना वेगवेगळी आहे. त्यांची साईझ आणि आकार वेगळे आहेत.
कविता राव सांगतात, "भारतातल्या प्रत्येक शहरातल्या लोकांचा प्राधान्यक्रम आणि त्यासाठी पर्याय ठरणारी उत्पादनं वेगवेगळी आहेत."
भारतात धूळ जास्त असल्याने भारतीय ग्राहक स्टोअरेज म्हणजे वस्तू बंदिस्त ठेवता येतील अशा फर्निचरला प्राधान्य देतात. म्हणून मग आयकियाने त्यांच्या विना दरवाज्यांच्या मॉडेल्समध्ये बदल केले आणि काचेचे दरवाजे असलेल्या कॅबिनेट्स आणि कपाटं आणली.
भारतासाठीची स्वयंपाक घरासाठीची उत्पादनं तयार करताना मात्र आयकियाला काही धक्के बसत गेले. इथली कुटुंबं दिवसातून साधारण 4 ते 5 वेळा जेवतात - खातात आणि किचनमध्ये साफसफाईसाठी पाण्याचा जास्त वापर होतो. आयडियाच्या मॉड्युलर किचन्सच्या ओट्यावरून हे पाणी ओघळून खाली येई आणि कॅबिनेट्स खराब होत. म्हणून मग त्यांनी त्यात बदल केला आणि पाणी ओट्यावरून ओघळू नये म्हणून एक कड बसवली.
स्पेनमध्ये आयकियाच्या पाएया (Paella - एक प्रकारचा भात) करण्यासाठीचे पॅन्स मोठ्या प्रमाणावर विकले जातात, म्हणून आयकियाने तिथे ते तयार करून विकले. याच धर्तीवर भारतात त्यांनी इडलीचे स्टँड्स आणि कुकर आणले. भारतीयांना कामावर जातानाही व्यवस्थित मोठा डबा नेण्याची सवय आहे. म्हणून मग आयकियाने तीन डबे असणारा लंचबॉक्स आणि इतर काही प्रकारचे डबे आणि पाण्याच्या बाटल्या आणल्या.
बेडरूमसाठी उत्पादनं तयार करण्यातली आव्हानं वेगळीच होती. भारतीयांना काहीशा कडक गादीवर झोपायला आवडतं. म्हणून आयकिया आता इथेच तयार करण्यात आलेल्या आणि नारळाचा काथ्या असलेल्या गाद्या विकतं. 19 हजारांना विकली जाणारी क्वीन साईझ मॅट्रेस ही आयकियाच्या भारतातल्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या उत्पादनांपैकी एक आहे.
परदेशवारी करणाऱ्या भारतातल्या मध्यमवर्गीयांची संख्या वाढतेय. त्यामुळे लोकांची आयकिया आणि त्यांच्या उत्पादनांशीही ओळख होतेय. आयकियाचं फर्निचर जगभरात तुम्हाला स्वतःच असेंबल करावं लागतं. म्हणजे जोडावं लागतं. पण भारतात आयकियाने यासाठीची सोय उपलब्ध केलेली आहे. पण आता अशा ग्राहकांची संख्या वाढतेय जे दुकानातून टूलकिट घेऊन जातात आणि आयकियाची उत्पादनं आपण स्वतः असेंबल केल्याचं अभिमानाने सांगतात किंवा इन्स्टाग्रामवर त्याविषयी पोस्ट करतात.
आयकियाने त्यांच्या कॅफेमध्ये स्थानिक पदार्थांनाही जागा दिली. बिर्याणी, समोसे, शाकाहारी मीटबॉल्स हे त्यांच्या कॅफेतले लोकप्रिय पदार्थ आहेत. इतकंच नाही तर सामन (Salmon) माशाची करी आणि बिर्याणी यांच्यासाठीही मोठी मागणी असते.
"आम्ही त्याला स्विडीश देसी फूड म्हणतो," राव सांगतात.
आयकिया आता बंगळुरू आणि दिल्ली आणि उपनगरांमध्येही स्टोअर्स सुरू करणार आहे. भारतामध्ये आयकिया 1.5 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करतंय. आणि गेल्या काही दिवसांत आयकियाकडून खरेदी करणाऱ्यांची संख्याही कोट्यवधींच्या घरात गेलीय.
2019 मध्ये आयकियाने मुंबईत ऑनलाईन खरेदीची सुविधा द्यायला सुरुवात केली. कोणत्याही शहरात स्टोअर सुरू करण्यापूर्वी ऑनलाईन सेवा देण्याच आयकियाची पहिलीच वेळ होती.
आयकियाच्या एकूण विक्रीपैकी 25% विक्री ही ऑनलाईन होते. कंपनीच्या विक्रीत वाढ झालेली असली तरी अजून नफा मात्र दृष्टीपथात नाही. भारतीयांच्या सवयींविषयी आपल्याला अजून खोलात जाणून घ्यायचं असल्याचं कविता राव सांगतात. "हा प्रवास मोठा आहे. आणि आम्ही आता कुठे सुरुवात केलीय."
पण आयकियात जाऊन खरेदी करण्याचा उत्साह भारतीयांमध्येदिसून येतोय. हैदराबादमधल्या 67 वर्षांच्या गृहिणी जयश्री अनुमोलू त्यांच्या 95 वर्षांच्या आईला व्हीलचेअरवरून आयकियामध्ये घेऊन गेल्या होत्या. "ती इतकी उत्साहात होती!" अनुमोलू सांगतात. आयकिया स्टोअरमधून त्यांनी सुऱ्या, चमचे, भांडी, तवे, गिफ्ट बॉक्सेस आणि बाऊल्स विकत घेतले. "आम्ही आमच्यासाठी तर गोष्टी विकत घेतल्याच पण इतरांना भेट देण्यासाठीही घेतल्या."
अनुमोलू यांनी त्यांच्या टीनएजर नातीच्या खोलीसाठीही फर्निचर निवडलं. "त्यातल्या एका टेबलला 8 खण आहेत, 8!" दुसऱ्या शहरांतून त्यांच्या मैत्रिणी आल्या की त्यांना शहरातला ऐतिहासिक गोवळकोंडा किल्ला पाहण्याऐवजी आयकियामध्ये जाऊन तीन तास घालवायचे असतात..."आयकिया एक क्रेझ आहे!"
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)