एसटी कर्मचाऱ्याची रेल्वेखाली आत्महत्या #5मोठ्या बातम्या

फोटो स्रोत, Getty Images
विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्स यांचा घेतलेला आढावा.
1. एसटी कर्मचाऱ्याची आत्महत्या
एसटी संपामुळे आणखी एका कर्मचाऱ्याने जीव गमावला आहे. जळगाव जिल्ह्यातील यावल आगारात चालक म्हणून कार्यरत असलेल्या शिवाजी पाटील यांनी सोमवारी दुपारी रेल्वेखाली जीवन संपवलं. शिवाजी पंडित पाटील असं या कर्मचाऱ्याचं नाव आहे. एसटी संपामुळे पाटील गेल्या काही दिवसांपासून काळजीत होते. त्यातूनच त्यांनी टोकाचा निर्णय घेतला. 'लोकमत'ने ही बातमी दिली आहे.
शिवाजी पाटील तीन दिवसांपूर्वी जळगावात राहणाऱ्या बहिणीकडे आले होते. एसटी संपामुळे पगार मिळत नाही म्हणून आर्थिक परिस्थिती बेताचं झाल्याचं त्यांनी बहिणीला सांगितलं होतं. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी सुसाईड नोट लिहिली आहे. पोलिसांनी ती ताब्यात घेतली. शिवाजी हे मूळचे यावलचे. स्वत:ची शेती नाही, हक्काचं घर नाही अशी त्यांची स्थिती होती. पगार नसल्याने ते घरभाडंही भरू शकले नव्हते.
दरम्यान एसटी कर्मचाऱ्यांवर आमचा कोणताही राग नाही. हे कर्मचारी वेगवेगळ्या आवाहनांना बळी पडले आहेत. त्यांच्या मनात गैरसमज पसरवले जात आहेत. 31 मार्च 2022 पर्यंत एसटीच्या संपकरी कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हावं असं आवाहन परिवहन मंत्री अनिल परब यांनी केलं.
2. पराभवामुळे निराश होऊन पक्ष सोडू नका- गडकरींचं काँग्रेस नेत्यांना आवाहन
पराभवानंतर निराश होऊ नका आणि पक्षासोबत राहून काम करा. काँग्रेस मजबूत राहावी अशी माझी मनापासून इच्छा आहे. जे काँग्रेसच्या विचारसरणीचे पालन करतात, त्यांनी पक्षासोबत राहून खंबीर राहावे. पराभवाने खचून न जाता त्यांनी काम करत राहावे. पराभव झाला तर एक दिवस विजयही होणारच," असं म्हणत त्यांनी काँग्रेस नेत्यांना हिंमत दिली. 'लोकसत्ता'ने ही बातमी दिली आहे.

फोटो स्रोत, facebook
यावेळी बोलताना गडकरींनी भाजपाला संसदेत फक्त 2 जागा जिंकता आल्याची आठवणही सांगितली. ते म्हणाले, "पण कार्यकर्त्यांच्या मेहनतीने काळ बदलला आणि अटलबिहारी वाजपेयींच्या रूपाने आम्हाला पंतप्रधान मिळाला. अशा परिस्थितीत निराश होऊन आपली विचारधारा सोडू नये," असं आवाहन गडकरींनी काँग्रेस नेत्यांना केलं.
3. जाहीर कार्यक्रमात तलवारबाजीमुळे वर्षा गायकवाड, अस्लम शेख यांच्यावर गुन्हा
जाहीर कार्यक्रमात तलवार काढणं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि अस्लम शेख यांच्यासाठी अडचणीचं ठरलं आहे.
तलवार काढल्याप्रकरणी दोन्ही मंत्र्यांवर मुंबईत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप नेते मोहित कंबोज यांनी केलेल्या तक्रारीनंतर मुंबईतील वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 'लोकमत न्यूज18'ने ही बातमी दिली आहे.
मुंबईत काही दिवसांपूर्वी एक जाहीर कार्यक्रम पार पडला होता. या कार्यक्रमात शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख हे सहभागी झाले होते. याच कार्यक्रमात दोन्ही नेत्यांनी मंचावर आपल्या हातात तलवार घेतली होती.
या दोघांचे तलवारीसह फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले होते. त्यानंतर भाजपने या दोन्ही नेत्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.
मुंबई पोलिसांनी वर्षा गायकवाड आणि अस्लम शेख यांच्या विरोधात आर्म्स अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे. काही दिवसांपूर्वी मोहित कंबोज यांनीही तलवार नाचवली होती आणि त्यानंतर मुंबई पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर मोहित कंबोज यांनी या दोन्ही नेत्यांवर गुन्हा दाखल का नाही असा सवालही उपस्थित केला होता. तसेच पोलिसांत तक्रार दाखल केली होती.
4. वीज कर्मचाऱ्यांवर संपाप्रकरणी मेस्माअंतर्गत कारवाई?
उर्जा मंत्री नितीन राऊत यांच्याशी होणारी महावितरण कर्मचाऱ्यांसोबतची उद्याची बैठक रद्द झाल्याची माहिती समोर आली आहे.
ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी हा निर्णय घेतल्याचं समजतंय. संप मागे घेण्याचं आवाहन करूनही कर्मचारी संघटनांकडून प्रतिसाद न मिळाल्यानं हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळतेय. सर्व वीज कर्मचारी संघटनासोबत ही बैठक पार पडणार होती. 'सकाळ'ने ही बातमी दिली आहे.
वीज कर्मचारी आपल्या काही मागण्या घेऊन आंदोलन करणार आहेत. कर्मचारी संघटनांनी हा इशारा दिला आहे. त्यामुळे कर्मचारी संघटनांशी बैठक घेऊन मार्ग सोडवण्याच्या विचारातून ही बैठक आयोजित करण्यात आली होती.
कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करू मात्र, त्यांनी संप मागे घ्यावा असं आवाहन नितीन राऊत यांनी केलं होतं. मात्र कर्मचारी संघटनांनी संप मागे घेण्याची भूमिका न घेतल्याने ही बैठक रद्द झाली आहे.
5. प्रवीण दरेकरांची अटकपूर्व जामिनासाठी हायकोर्टात याचिका, मंगळवारी सुनावणी
बोगस मजूर प्रकरणी परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकरांनी अटकपूर्व जामीनासाठी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर मंगळवारी सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती अनुजा प्रभूदेसाई यांच्यासमोर यावर सुनावणी होणार आहे. 'एबीपी माझा'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
डिसेंबर 2017 मध्ये नागपूर अधिवेशन सुरू असताना मजूर म्हणून काम केल्याचा परतावा कसा घेतला? 2017 च्या नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये काम केल्याबद्दल दरेकरांनी 25 हजार 700 रूपयांची मजुरी घेतल्याची नोंद आहे. त्यामुळे एकाचवेळी दरेकर दोन्ही ठिकाणी उपलब्ध कसे होते? त्यामुळे यात प्रथमदर्शनी खोटी माहिती देऊन फसवणूक केल्याचं कोर्टानं आपल्या निकालांत स्पष्ट केलं आहे.
राज्य सरकारने प्रवीण दरेकरांच्या याचिकेला जोरदार विरोध करत फसवणुकीच्या या प्रकरणात त्यांना ताब्यात घेऊन चौकशी करण्याची गरज असल्याची भूमिका घेतली होती. काही वर्षांपूर्वी मजूरी करणाऱ्या दरेकरांकडे कोट्यावधींची मालमत्ता कशी आली?
याचीही चौकशी होणं गरजेचं असल्याची विशेष सरकारी वकीलांनी मागणी केली होती. मात्र, 2017 मधील नागपूर अधिवेशन हे अवघे काही दिवसच चाललं होतं. त्यातही दरेकरांनी तिथं पूर्ण हजेरी लावली नव्हती, असा दावा या याचिकेतून करण्यात आला आहे.
20 वर्षे मजूर प्रवर्गातून मुंबै बँकेच्या संचालक मंडळावर निवडून येणारे प्रवीण दरेकर हे मजूर नाहीत. अशी तक्रार आम आदमी पक्षाचे नेते धनंजय शिंदे यांनी ऑक्टोबर 2021 मध्ये केली होती. त्यावर झालेल्या सुनावणीअंती 3 जानेवारी 2022 रोजी विभागीय सहनिबंधकांनी प्रवीण दरेकर यांना मजूर संस्थेचे सदस्य म्हणून अपात्र ठरवलं.
त्यानंतर शिंदे यांच्या तक्रारीवरून मुंबई पोलिसांनी एमआरए मार्ग पोलीस ठाण्यात दरेकरांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. त्याविरोधात दरेकरांनी हायकोर्टात धाव घेत गुन्हा रद्द करत अटकेपासून संरक्षण देण्याची मागणी केली होती. मात्र, दरेकरांना अटकेपासून कोणताही दिलासा देण्यास नकार देत त्यांना रितसर अटकपूर्व जामीनासाठी मुंबई सत्र न्यायालयात दाद मागण्याचे निर्देश दिले होते.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)























