'नाणार प्रकल्प पुनरुज्जीवनाच्या वाटेवर'- धर्मेंद्र प्रधान #5मोठ्याबातम्या

Published
वाचन वेळ: 4 मिनिटे

विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्स यांचा घेतलेला आढावा

1. नाणार प्रकल्प पुनरुज्जीवनाच्या वाटेवर- धर्मेंद्र प्रधान

नाणार येथील तेलशुद्धीकरण प्रकल्पामध्ये महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत लाखो कोटी रुपयांचे आणि रोजगाराचे योगदान देण्याची क्षमता आहे. गेली काही वर्षं विरोधामुळे तो प्रकल्प रखडला असला तरी आता महाराष्ट्र सरकारचे मनपरिवर्तन होत असल्याचे दिसत असल्याने नाणार प्रकल्पाच्या पुनरुज्जीवनाची आशा असल्याचे सूतोवाच केंद्रीय शिक्षण व कौशल्य विकासमंत्री धर्मेद्र प्रधान यांनी 'लोकसत्ता'च्या व्यासपीठावरून केले.

लोकसत्ता तरुण तेजांकित' पुरस्कारांचे वितरण धर्मेद्र प्रधान यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. 'लोकसत्ता'चे संपादक गिरीश कुबेर यांनी त्यांच्याशी संवाद साधला, तर 'इंडियन एक्स्प्रेस' समूहाचे कार्यकारी संचालक अनंत गोएंका यांनी धर्मेद्र प्रधान यांचा परिचय करून दिला.

"संयुक्त अरब अमिरात आणि सौदी अरेबिया यांच्या सहकार्याने कोकणच्या किनारपट्टीवर 60 लाख टन क्षमतेचा नाणार तेल शुद्धीकरण प्रकल्प उभारण्याचे नियोजन करण्यात आले होते, मात्र दुर्दैवाने त्याला विरोध झाला. त्यात बहुमूल्य वेळ वाया गेला आहे. पण आता महाराष्ट्र सरकारचे मतपरिवर्तन होत असल्याचे संकेत मिळत आहेत. प्रकल्पाचा आकार कमी करून तो कोकणातच उभारण्याचा विचार सुरू आहे. 'देर आए लेकिन दुरुस्त आए' या न्यायाने सरकारच्या मतपरिवर्तनाचे स्वागतच केले पाहिजे", असे सांगत धर्मेद्र प्रधान यांनी नाव न घेता शिवसेनेला चिमटा काढला.

"या तेलशुद्धीकरण प्रकल्पामुळे लाखो कोटी रुपये पुढील काही वर्षांत महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत येतील. या प्रकल्पाशी निगडित पूरक उद्योग उभे राहतील आणि त्यातूनही मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती होईल. देशालाही पेट्रोकेमिकल क्षेत्रातील या मोठ्या प्रकल्पामुळे ऊर्जा सुरक्षिततेचे ध्येय गाठण्यासाठी मदत होईल," असे धर्मेद्र प्रधान यांनी स्पष्ट केलं.

2. देवाच्या चरणी तरी खरे बोला- सामनातून फडणवीसांवर टीका

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिर्डीत साईबाबांचं दर्शन घेतलं. तिथे ते म्हणाले, "राजकारण गेलं चुलीत, इथलं गव्हर्नन्स ठीक राहिलं पाहिजे. त्याला बट्टा लागला आहे. ही अवस्था महाराष्ट्रात कधीही पाहिली नव्हती."

त्यांच्या या वक्तव्याला उत्तर देताना सामनाने म्हटले, "महाराष्ट्राची इज्जत आणि गव्हर्नन्स चुलीत घालण्याचं काम ते स्वत:च करत आहेत. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही असं देवाच्या चरणी जाऊन बोलता हा महाराष्ट्रद्वेष म्हणजेच तुमचा गुड गव्हर्नन्स मानायचा का?

"देवाच्या चरणी तरी खरं बोला. देशातील भाजपशासित राज्यात चांगल्या प्रशासनाचा जो खेळखंडोबा चालला आहे त्याकडे एकदा डोळे उघडून पाहा म्हणजे महाराष्ट्रातील स्थितीविषयी सत्य समजायला मदत होईल," असं सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.

भाजपने काय करावं हा त्यांचा प्रश्न आहे. पण त्यांनी महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेशी खेळू नये. नवनवीन पद्धतीने आरोप करून सरकारची प्रतिमा मलिन करण्याचं काम सुरु असल्याची खंत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केली. राज्यातल्या प्रत्येक मराठी माणसाची हीच खंत आहे. विरोधी पक्षाच्या बेबंद वृत्तीमुळे राज्य बदनाम व्हावे व त्या बदनामीचा आनंदोत्सव साजरा करावा हे चांगले नाही.

3. कोरोनाची ट्यून बंद होणार

देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होताच या साथीच्या आजाराबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी सरकारने विविध पावले उचलली होती. गेल्या दोन वर्षांपासून प्रत्येक फोनमध्ये कोरोनाची कॉलर ट्यून ऐकू येत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने आता ही ट्यून बंद करण्याचा सरकारचा विचार आहे. 'न्यूज18'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.

सरकारला असे अनेक अर्ज प्राप्त झाले आहेत. ज्यामध्ये असे म्हटले आहे की, या कॉलर ट्यूनचा उद्देश पूर्ण झाला आहे. काहीवेळा आपत्कालीन परिस्थितीत महत्त्वाचे कॉल्स करताना या कॉलर ट्यूनमुळे उशीर होतो. याबाबत माहिती देताना अधिकृत सूत्रांनी सांगितले की, दूरसंचार विभागाने (DoT) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला पत्र लिहून ही कॉलर ट्यून काढून टाकण्याची विनंती केली आहे. त्यात सेल्युलर ऑपरेटर असोसिएशन ऑफ इंडिया (CoA) तसेच मोबाइल ग्राहकांकडून प्राप्त झालेल्या अर्जांचा उल्लेख आहे.

4. भाजपच्या सत्ता काळात काश्मिरी पंडित बाहेर गेले- पवार

काश्मीर मधून काश्मीर पंडित बाहेर पडले त्यावेळी सत्तेत काँग्रेस पक्ष नव्हता. त्यावळी व्ही. पी. सिंह यांची सत्ता होती. भाजपचे त्यांना सहकार्य होते. म्हणजे भाजपच्या सत्तेच्या काळात काश्मिरी पंडित बाहेर गेले, असा टोला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपला लगावला आहे.

माजी आमदार जगन्नाथबापू शेवाळे यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या अभिष्टचिंतन सोहळ्यात शरद पवार बोलत होते. 'एबीपी माझा'ने यासंदर्भात ते बोलत होते.

शरद पवार म्हणाले, "विरोधकांना टीका करण्याचा अधिकार आहे. परंतु, टीका करताना त्यात उद्वेष नसायाला हवा. मात्र अलीकडे ते पाहायला मिळत आहे. राजकारण चुकीच्या दिशेला जातंय की काय? असं वाटत आहे. काश्मीरमधील एक घटक निघून गेला.

"त्यावर एक सिनेमा आला, त्यानंतर काँग्रेसवर टीका झाली. परंतु, यामुळे मन जोडण्याऐवजी मन तोडण्याचं काम झालं, समाजात विद्वेष पसरायला मदत केली जाते. पंतप्रधानांकडून त्यावर भाष्य केले जाते. या चित्रपटाच्या माध्यमातून महात्मा गांधींवर टीका टिप्पन्नी केली जाते. मतभेद, मतभिन्नता असू शकते. मात्र, परस्परांबाबत सन्मान असण्याची गरज आहे."

5. देशातील 10 राज्यात हिंदू अल्पसंख्याक- सर्वोच्च न्यायालय

राज्य सरकारे आपल्या राज्याच्या हद्दीतील हिंदूसह धार्मिक आणि भाषिक समुदायांना अल्पसंख्याक म्हणून घोषित करू शकतात, अशी माहिती केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला दिली आहे.

वकील अश्विनी कुमार उपाध्याय यांनी दाखल केलेल्या याचिकेला उत्तर देताना केंद्र सरकारने हा युक्तिवाद केला आहे. उपाध्याय यांनी राष्ट्रीय अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था कायदा, 2004 च्या कलम 2 (एफ) च्या वैधतेला आव्हान दिले आहे. त्यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. 'टीव्ही9 मराठी'ने ही बातमी दिली आहे.

'live law' या कायदेविषयक वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार मिझोराम, नागालँड, मणिपूर, मेघालय, अरुणाचल प्रदेश, पंजाब, लक्षद्वीप, लडाख, काश्मीर इत्यादी राज्यांतील हिंदूंना अल्पसंख्याक दर्जा मिळावा, अशी विनंती याचिकेतून केली आहे. त्यावर केंद्र सरकारने आपली बाजू मांडली आहे. ज्या राज्यांमध्ये हिंदू अल्पसंख्याक आहेत, त्या राज्यांतील हिंदूंना संबंधित राज्य सरकारांद्वारे अनुच्छेद 29 आणि 30 मधील तरतुदींन्वये अल्पसंख्याक म्हणून अधिसूचित केले जाऊ शकते, असे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयापुढे स्पष्ट केले आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)