सुप्रिया सुळे म्हणतात, मी जर काही चूक केली असेल तर मला विजय चौकात फाशी द्या #5मोठ्याबातम्या

सुप्रिया सुळे

फोटो स्रोत, Getty Images

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

विविध वेबसाईट्स आणि वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा

1. धाडी पडणार हे भाजपच्या नेत्यांना आधीच कसं समजतं? सुप्रिया सुळेंचा सवाल

महाराष्ट्रामध्ये मागील काळात महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांच्या धाडी पडल्या आहेत. त्यामध्ये कारवाई होऊन अनिल देशमुख आणि नवाब मलिक हे मंत्री आता तुरुंगात आहेत. नुकतंच ईडीने मुख्यमंत्र्यांचे मेव्हणे श्रीधर पाटणकर यांच्यावर कारवाई करत त्यांची 6.45 कोटींच्या संपत्तीवर टाच आणली आहे. ईडीची ही कारवाई म्हणजे थेट ठाकरेंना आव्हान असल्याचं सांगितलं जातंय.

यामुळे राज्यामध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये केंद्रीय तपास यंत्रणांच्या मुद्द्यावरुन वाद सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनीही यावरुन भाजपवर टीका केली असताना दुसरीकडे खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत हा मुद्दा उपस्थित केला.

ईडी आणि सीबीआय यांच्या स्वातंत्र्यावर प्रश्नचिन्ह उभारतोय. या संस्था जर स्वतंत्र असतील तर महाराष्ट्रातील कोणता नेता तुरुंगात जाणार हे भाजपच्या नेत्यांना आधीच कसं समजतं? भाजप नेते याबद्दल आधीच कसं ट्वीट करतात? असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी यावेळी केला.

तसेच यासंबंधी माहिती लीक होते, त्याबद्दल केंद्र सरकारने खुलासा करावा असं ही त्या यावेळी म्हणाल्या.

ABP माझा या वृत्तवाहिनीने ही बातमी दिलीय.

2. मुंबईत फडणवीस तर दिल्लीत नवनीत राणांकडून पेनड्राईव्हद्वारे पुरावे सादर

राज्यात ईडी, सीबीआय, पेनड्राईव्ह बॉम्ब सुरू असतानाच दिल्लीतही यावरून राजकारण तापत आहे. आता दिल्लीच्या राजकारणातही पेनड्राईव्ह बॉम्बने एन्ट्री घेतलीय. अमरावीतच्या खासदार नवनीत राणा यांनीही संसदेत पेनड्राईव्ह सादर करत प्रशासकीय अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यांच्या या आरोपांनी संसदेतही वातावरण तापल्याचे दिसून आलं.

आरती सिंह या महिला अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे, असे म्हणत नवनीत राणा संसदेत हा पेनड्राइव्ह सादर केला. लोकसभा अध्यक्षांनी या पेनड्राईव्हची आणि आरोपांची दखल घेतली असल्याचा दावा नवनीत राणा यांनी केला आहे. या पेनड्राइव्ह आणि फोटोच्या माध्यमातून माझ्यावर झालेल्या अन्यायाचे मी पुरावे दिले, अशी माहिती यावेळी नवनीत राणा यांनी दिली आहे. आता या पेनड्राव्ह मध्ये नेमकं काय आहे? असा सवाल विचारला जात आहे.

TV9 या वृत्तवाहिनीने ही बातमी दिली आहे.

3. अनिल अंबानींनी दोन मोठ्या कंपन्यांचे संचालकपद सोडले

अनिल धीरुभाई अंबानी ग्रुपचे चेअरमन अनिल अंबानी यांनी शुक्रवारी रिलायन्स पॉवर आणि रिलायन्स इफ्रास्ट्रक्चरच्या संचालकपदाचा राजीनामा दिला आहे. सेबीच्या अंतरिम आदेशाचे पालन करत अनिल अंबानी रिलायन्स पॉवरच्या बोर्डामधून बाजूला झाले आहेत.

अनिल अंबानी

फोटो स्रोत, Getty Images

बाजार नियामक सेबीने दिलेल्या आदेशांनंतर त्यांना कुठल्याही सूचिबद्ध कंपनीशी संबंधित राहण्यास मनाई करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी हे पाऊल उचलले आहे.

यावर स्पष्टीकरण देताना रिलायन्स पॉवरने बीएसई फायलिंगमध्ये सांगितले की, "अनिल अंबानी, गैर कार्यकारी संचालक, सेबी यांच्या अंतरिम आदेशाचे पालन करत रिलायन्स पॉवरच्या बोर्डामधून बाजूला झाले आहेत."

आर-पॉवर आणि आर-इन्फ्राच्या संचालक मंडळाने शुक्रवारी राहुल सरीन यांना पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी स्वतंत्र संचालकाच्या रूपात अतिरिक्त संचालक नियुक्त केले आहे. मात्र ही नियुक्ती सर्वसाधारण सभेमध्ये सदस्यांच्या मान्यतेच्या अधीन आहे.

लोकमत या वृत्तपत्राने ही बातमी दिली आहे.

4. युक्रेनमधील युद्धामुळे कच्च्या तेलाचे दर वाढले - अर्थमंत्री निर्मला सीतारामन

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी लोकसभेत 'वित्त विधेयक 2022' मांडले होते. दिवसभराच्या चर्चेनंतर हे विधेयक मंजूर करण्यात आले.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन

फोटो स्रोत, ANI

यावेळी तेलाचे दर वाढल्याच्या मुद्द्यावर स्पष्टीकरण देताना सीतारामन म्हणाल्या, "नेहरूंच्या काळात जग एकमेकांशी जोडले गेले नव्हते. तरी देखील अमेरिका वा कोरियातील संघर्षांचा देशातील वस्तूंच्या किमतींवर थेट परिणाम होतो, असे नेहरू म्हणाले होते. आता आपण जागतिकीकरणानंतरच्या काळात वावरत असून कुठल्याही संघर्षांचा थेट परिणाम चलनवाढीवर होतो. युक्रेनमध्ये युद्ध होत असून तिथल्या परिस्थितीमुळे कच्च्या तेलाचे दर जगभर वाढले आहेत, त्याचा परिणाम देशातील महागाईवर होणार."

तसेच जनसामान्यांना कमीत कमी करांचा भार सहन करावा लागेल, या दृष्टीने केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. करोनाच्या आपत्तीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला जबरदस्त फटका बसला, त्यातून अर्थव्यवस्थेला आधार देण्यासाठी लोकांवर नवा कर लादला गेला नसल्याचा युक्तिवाद ही केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी लोकसभेत केला.

द हिंदू या वृत्तपत्राने ही बातमी दिली आहे.

5. सीमाप्रश्न सुटेपर्यंत भारत - चीनदरम्यानचे संबंध सुधारणार नाहीत - परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर

पूर्व लडाखमध्ये सुमारे दोन वर्षांपासून भारत आणि चीन मध्ये तणाव सुरु होता. सीमेवर मोठ्या संख्येने सैन्य तैनात केल्यामुळे भारत आणि चीनमधील संबंध सध्या सामान्य राहिलेले नाहीत. सीमेवर सैन्य जमविणे हे दोन्ही देशांदरम्यानच्या कराराचे उल्लंघन आहे. त्यामुळे जोपर्यंत सीमाप्रश्न निकाली निघत नाही, तोपर्यंत दोन्ही देशांदरम्यानचे संबंध सुरळीत होणे शक्य नाही, असे प्रतिपादन परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केले.

पूर्व लडाखमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी उच्चस्तरीय भेटीसाठी भारतात आले. त्यांनी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याशी चर्चा केली. यानंतर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी माध्यमांना त्यांच्या दरम्यान चर्चा झालेल्या मुद्यांविषयी माहिती दिली.

ते म्हणाले, "पूर्व लडाखमधील सीमा वाद प्रश्नावर आम्ही चर्चा केली. पण आमच्यात सर्व ठीक झाले, असे म्हणू शकत नाही. जोपर्यंत सीमा वादचा प्रश्न कायम आहे तोवर सर्व काही ठिक होऊ शकत नाही, या वादाला कसे सोडवावे, याविषयी आम्ही चर्चा केली. चर्चेच्या 15 फेऱ्या झाल्या आहेत."

या निमित्ताने अफगाणिस्तान आणि युक्रेनसह प्रमुख आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा करण्याची संधी मिळाली. सोबतच आम्ही आमच्या द्विपक्षीय संबंधांवरही चर्चा केल्याची माहिती एस जयशंकर यांनी दिली.

हिंदुस्तान टाईम्स या वृत्तपत्राने ही बातमी दिली आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)