उद्धव ठाकरेंच्या भाषणातील 10 मुद्दे: 'हिंमत असेल तर मर्दासारखे लढा'

फोटो स्रोत, Getty Images
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभेत भाषण केले.
सध्या महाराष्ट्रात ईडीच्या धाडी आणि तपाससंस्थांच्या राजकीय गैरवापराचा मुद्दा तापल्याचं दिसून येतं. अशातच केंद्रीय तपास संस्था या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यापर्यंत येऊन पोहोचल्या.
दरम्यान, भाजप नेते किरीट सोमय्या यांनीही मुख्यमंत्र्याचे पुत्र आणि राज्यातील कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर अनेक आरोप केले आहेत.
या सगळ्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आजच्या विधानसभेतील भाषणाकडे सर्वांचं लक्ष होतं. 'उभं राहून बोलल्याशिवाय जोर पण येत नाही. पण बसून बोललो तरी जोर गेलाय असं कोणी समजू नये. जितकं शक्य आहे तितकं उभं राहून बोलतो. वाटलं तर बसतो.' अशाप्रकारे उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली आणि आपल्या आरोग्याबद्दलच्या चर्चांना उत्तर दिले.
1) तेच ते आणि तेच ते-
राज्यपालांच्या अभिभाषणापासून जर आपण सुरूवात केली. राज्यपालांच्या अभिभाषणावेळी जो गोंधळ घातला तो अशोभनीय होता. महिनाभर दाऊदचा उल्लेख होता. तेच ते तेच ते... महिनाभर आपण तेच करतोय. असे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल देवेंद्र फडणवीस यांनी वाचलेल्या कवितेचा उल्लेख केला.
2) काही जणांचा जीव मुंबईत-
रावणाची तोंड उडवली तरी पिक्चरमध्ये दिसत तसं नवीन तोंड येतं. मग नंतर कळतं रावणाचा जीव बेंबीत आहे. काहींना केंद्रात सरकार मिळालं तरी बेंबीत नाही तर मुंबईमध्ये असतो.
3) राज्यपालांचं भाषण ऐकायला हवं होतं-
राज्यपाल राष्ट्रगीतालाही थांबू शकले नाहीत. देशात असा अपमान कोणी केला नव्हता.राज्यपालांचं अभिभाषण ऐकलं असत तर कळलं असतं. राज्याची यंत्रणा जेव्हा सतर्क होती त्याचा मला अभिमान आहे. फक्त पर्यावरण पर्यावरण म्हणून तुम्ही टीका करत आहात. पण स्कॉटलंडचा पुरस्कार देशात फक्त महाराष्ट्राला मिळाला. त्याचाही अभिमान आहे.
4) मध्यप्रदेशला मद्य प्रदेश म्हणणार का?-
हे सरकार महाराष्ट्राला मद्यराष्ट्र बनवण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोप विरोधकांनी केला होता. त्यालाही उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिलं. ते म्हणाले, 'वाईन सुपर मार्केटमध्ये मिळणार आहे. किराणा दुकानात नाही. सुधीरभाऊ तुम्ही मद्य विकास आघाडी म्हटलं. मध्यप्रदेशात काय चाललय सांगितलं तर मध्यप्रदेशला मद्य प्रदेश म्हणणार का?'
5) कांजूरच्या जागेला केंद्राची परवानगी नाही-
मेट्रोसाठी कांजूरमार्गच्या जागेला केंद्राने अजून परवानगी दिली नाही असे सांगताना ठाकरे म्हणाले, "आरेची जागाही वादग्रस्त आहेच. आपण केंद्राकडे कांजूरमार्गची जागा मागितली आहे. पण केंद्राने परवानगी दिलेली नाही. तरीही आपण पर्यायी जागा शोधलेली आहे. 10 हजार कोटींच्या वाढीचा प्रस्ताव कुठून आला. त्याची एकनाथजी चौकशी लावा. पाणी कुठे मुरतंय हे बघावं लागेल." केंद्र सरकारने निःपक्ष भूमिका मांडली पाहीजे. पण ते कोणाची बाजू घेत आहेत हे दिसतंय, असंही ते म्हणाले.
6) पंतप्रधानांनी सर्वांना मदत केली-
कोरोना काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांना मदत केली असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. ते म्हणाले, कोरोनात महापालिकेने चांगलं काम केलं. माननीय पंतप्रधानांनी सर्व राज्यांना चांगली मदत केली. महापालिकेने इतकं उत्तम काम केलं. Epidemic act मध्ये अश्या पध्दतीने टीका करता येत नाही. तरीही कोव्हीड काळात भ्रष्टाचार केला म्हणतात याचं दुख: आहे. धारावीला वाचवलं हे सर्वात मोठं काम केलं. केंद्राचं पथक थरथरायला लागायचं. धारावीको बचाओ असंच हे सांगायचे. पण महापालिकेने उत्तम काम केलं. कुठे झाला भ्रष्टाचार?
7) दाऊदच्या मागे आपण फरपटत चाललो आहोत-
दाऊदचं नाव सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात सतत येत आहे. त्याबद्दल बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, "नवाब मलिकांचा राजीनामा... बघू ना ते दोषी ठरलं तर.. तथ्यहीन आरोप करायचे. तीन-तीन वेळा नवाब मलिक निवडणून येतायेत. मंत्री होतायेत. दाऊदशी संबंध असलेल्या मंत्री तुम्हाला आता कळतोय इतके वर्ष तेव्हा केंद्रीय यंत्रणा झोपल्या होत्या. मग केंद्रीय यंत्रणांचं काम काय? टाळ्या आणि थाळ्या वाजवायचं. दाऊद कुठे आहे? माहिती आहे का? इतके दिवस राम मंदीराच्या नावावर मतं मागितली. आता दाऊदच्या नावावर मतं मागतायेत. ओबामाने काय ओसामाच्या नावाने मतं मागितली होती का? गोपीनाथ मुंडे म्हणाले होते की, दाऊदला फरफटत आणू... आता आपण त्याच्या मागे फरफटत चाललो आहोत."
8) मी कडवट हिंदुत्ववादी-
"मी कडवट हिंदुत्ववादी आहेच आणि राहणार, महबूबा मुफ्ती ज्या अफझल गुरूला फाशी देऊ नका म्हणाल्या होत्या. तेव्हा तुम्ही त्यांच्यासोबत सरकारमध्ये बसला होता."
9) मर्दासारखे लढा-
"तुम्ही आमच्या कुटुंबीयांची बदनामी करतात. ही अत्यंत नीच, विकृती आहे. हिंमत असेल तर समोर येऊन मर्दासारखे लढा. नितीन गडकरी म्हणाले होते की आमच्याकडे वाल्याचा वाल्मिकी होतो. ईडी चं ह्युमन लॉंडरींग सुरू केलेलं आहे का?"
10) मला टाका तुरुंगात-
'तुम्हाला सत्ता पाहीजे ना.. मी येतो तुमच्यासोबत... टाका मला तुरुंगात', सत्तेसाठी नाही.. पेनड्राईव्ह गोळा करण्याचं काम करू नका. एवढाच जर जीव जळत असेल तर टाका मला तुरुंगात, पण आर्थर रोड वगैरे नाही. बाबरीसारखं कृष्णाच्या जेलमध्ये जाऊन मी कृष्ण जन्माची वाट बघेन.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
























