अरविंद केजरीवाल - ...मग कश्मीर फाइल्स यूट्यूबवर टाका #पाचमोठ्याबातम्या

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

विविध वेबसाईट्स आणि वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा

1. कश्मीर फाइल्स टॅक्स फ्री कशाला? यूट्यूबवर टाका - अरविंद केजरीवाल

"8 वर्षं देश चालवल्यानंतर जर कुठल्या पंतप्रधानांना विवेक अग्निहोत्रीच्या पायाशी लोळण घ्यावी लागली, तर त्याचा अर्थ होतो की 8 वर्षं त्या पंतप्रधानांनी काहीही काम केलेलं नाही," अशा शब्दांत केजरीवाल यांनी नरेंद्र मोदींवर हल्ला चढवलाय.

द कश्मीर फाइल्स हा चित्रपट काही भाजपशासित राज्यात करमुक्त करण्यात आलाय. दिल्लीतही भाजपकडून द कश्मीर फाइल्स करमुक्त करण्याची मागणी करण्यात आली. त्यावरुन विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान बोलताना आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार निशाणा साधला.

केजरीवाल म्हणाले, "कााश्मीर फाइल्स चित्रपट तुम्ही टॅक्स फ्री करण्याची मागणी का करत आहात? तुम्हाला एवढंच जर वाटत असेल तर दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींना सांगा, ते चित्रपट यूट्यूबवर टाकतील. मग सर्व लोकांना फुकट पाहता येईल. करमुक्त करण्याची गरजच काय?"

तसंच काश्मिरी पंडितांच्या नावावर कुणीतरी कोट्यवधींची कमाई करत आहे आणि भाजपावाल्यांना त्यांनी चित्रपटाचे पोस्टर लावण्याचं काम दिलं आहे, असाही टोला केजरीवालांनी लगावलाय.

अरविंद केजरीवाल यांनी यावेळी भाजप आमदारांना 'आप'मध्ये सामील होण्याचं आवाहन केलं. "तुम्ही आमच्यासोबत या. आम्ही तुम्हाला 'द काश्मीर फाइल्स'सारख्या खोट्या चित्रपटांचे पोस्टर लावण्याचं काम देणार नाही. आम्ही तुम्हाला चित्रपटाचं प्रमोशन करायला लावणार नाही. चांगलं काम देऊ, जनतेच्या भल्यासाठीचं काम देऊ," असं केजरीवाल म्हणाले.

हिंदुस्तान टाइम्स या वृत्तपत्राने ही बातमी दिलीय.

2. गुजरात निवडणुकीसाठी प्रशांत किशोर राहुल गांधींच्या संपर्कात?

आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाचं काम करण्यासाठी निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी राहुल गांधींशी संपर्क साधला असल्याची माहिती काँग्रेसच्या सूत्रांनी दिल्याचं वृत्त एनडीटीव्हीने दिलं आहे.

खरंतर, मागील वर्षी सप्टेंबरमध्ये काँग्रेस नेतृत्व आणि प्रशांत किशोर यांच्यात झालेल्या चर्चेनंतर दोघे वेगळे झाले होते. त्यानंतर काँग्रेसने किशोर यांच्या एका माजी सहाय्यकासोबत निवडणूक प्रचारासाठी करार केला, तर प्रशांत किशोर यांनी ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेससाठी रणनीती आखण्यास सुरुवात केली.

सूत्रांनी एनडीटीव्हीला दिलेल्या माहितीनुसार, किशोर यांनी गुजरात निवडणुकीसाठी फक्त वन टाइम काम करण्याची ऑफर दिली आहे. मात्र काँग्रेसने त्यांच्या प्रस्तावावर अद्याप कोणताही निर्णय घेतलेला

3. चीनचे परराष्ट्र मंत्री भारत दौऱ्यावर : आज घेणार जयशंकर, डोभाल यांची भेट

सीमावादावरून भारत चीन यांच्यातील संबंध ताणले गेले असताना चिनी परराष्ट्रमंत्री वांग यी भारत दौऱ्यावर दिल्लीत दाखल झाले आहेत. वांग यी यांची शुक्रवारी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर तसंच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्यासमवेत उच्चस्तरीय बैठक होईल.

पाकिस्तानातील ओआयसी परिषदेला हजेरी लावताना परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी जम्मू काश्मीरबाबत केलेल्या विधानावर भारतात संतप्त प्रतिक्रिया उमटली होती. भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये नाक खुपसण्याचा चीनला अधिकार नसल्याचं परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं होतं.

सीमावादावर तोडगा शोधण्यासाठी दोन्ही देशांमध्ये राजनैतिक त्याचप्रमाणे लष्करी पातळीवरील वाटाघाटींच्या 14 फेऱ्या गेलया काही दिवसांमध्ये झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून चिनी परराष्ट्र मंत्र्यांच्या भारत दौऱ्याविषयीची चर्चा सुरू होती. त्या पार्श्वभूमीवर चीनचे परराष्ट्रमंत्री भारतात दाखल झाले आहेत.

इंडियन एक्स्प्रेसने ही बातमी दिली आहे.

4. कोल्हापुरात उपचारादरम्यान माझ्या हत्येचा कट रचला- नितेश राणे

संतोष परब यांच्यावरील हल्लाप्रकरणी भाजपाचे आमदार नितेश राणे यांना अटक झाल्यानंतर कोल्हापुरला नेण्यात आलं होतं. त्यावेळी 'उपचारादरम्यान माझ्या हत्येचा कट रचला होता' असे गंभीर आरोप नितेश राणे यांनी राज्यसरकारवर केले आहेत. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ते बोलत होते.

राणे म्हणाले, "सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीनंतर मला एका प्रकरणात गोवण्यात आलं. यावेळी कोल्हापूरच्या शासकीय रुग्णालयात मला दाखल केलं होतं. त्यावेळी डॉक्टरांनी मला सिटी अँजिओग्राफी करण्याचा आग्रह केला. त्यावेळी माझं ब्लड प्रेशर लो होते ते मला कळत होतं. तरीही डॉक्टरांनी सिटी एन्जो करायला सांगितली.

तिथं सगळेच सरकारच्या बाजूचे नव्हते. काही आमच्याही ओळखीचे होते. तिथल्या कर्मचाऱ्यांनी येऊन सांगितले की सिटी अँजिओग्राफी करु नका. कारण त्यानिमित्ताने इंक शरिरात टाकायला लागते. इंक टाकून तुम्हाला मारुन टाकण्याची योजना आहे. असं तिथल्या कर्मचाऱ्याने सांगितल. त्यांनी यासाठी होकार देऊ नका असंही सांगितल."

"माझे ब्लडप्रेशर, शुगर लेव्हल लो दाखवत असतानाही रात्री पोलीस मला घेऊन जाण्यासाठी पाठवण्यात आले. पोलिसांना रात्री अडीच वाजता येऊन माझी अवस्था खराब असल्याचं पाहिल्यानंतर तेव्हा ते बाहेर गेले. तरीही वारंवार दबाव येत होता आणि मुंबई कलानगरच्या परिसरातून फोन येत होते. अशा प्रकारचे व्यवहार त्यावेळी सुरु होते. विरोधी पक्षातल्या नेत्यांना जीवंतच ठेवायचं नाही असा प्रकार राज्यात सुरु आहे," असे आरोप नितेश राणेंनी केले.

लोकसत्ता ने ही बातमी दिली आहे.

5. मुंबईत आमदारांसाठी कायमस्वरुपी 300 घरं बांधण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबईतील कष्टकऱ्यांना घरं बांधून देण्यासंबंधी राज्य सरकार गांभिर्याने विचार करत असल्याचं सांगत, आमदारांसाठीही मुंबईत हक्काच घर असणार असल्याची घोषणा उद्धव ठाकरेंनी विधानसभेत केली आहे.

यावेळी मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, "1995 साली युतीची सत्ता आल्यानंतर झोपडपट्टीयांना घरं मिळावीत, यासाठी बाळासाहेबांनी प्रयत्न केले. मुंबईचा विचार हा अनेकदा सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणून करण्यात आला. मुंबईचा एवढा गांभीर्यानं विचार माझ्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांएवढा कुणी केला नाही. आता त्या कष्टकऱ्यांना घरं मिळवून देण्यासाठी राज्य सरकारने गांभिर्याने विचार केला आहे."

"सर्वसामान्य लोकांचं झालं, आता लोकप्रतिनीधींचं काय? तर आपण जवळपास 300 आमदारांसाठी मुंबईत घरे देणार आहोत, अशी घोषणाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विधानसभेत केली. सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींना ही घरं देण्यात येतील. ही घरं आमदारांना कायमस्वरुपी देत आहोत," असंही त्यांनी स्पष्ट केलं.

लोकमत या वृत्तपत्राने ही बातमी दिली आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)