युक्रेन-रशिया युद्ध : रशियाची युद्धनौका उद्ध्वस्त केल्याचा युक्रेनचा दावा

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

युक्रेनच्या बर्दीयान्स्क बंदरात रशियाची युद्धनौका आणि आणखी दोन जहाजं नष्ट केल्याचं युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. या बंदरावर रशियाने कब्जा केला आहे.

युक्रेनच्या सैन्याने 24 मार्चला सकाळी एक व्हीडिओ पोस्ट केला आणि म्हटलं की ओर्स्क नावाची रशियाच्या युद्धनौकेवर त्यांच्या सैन्याने हल्ला केला. या व्हीडिओत युद्धनौका जळताना दिसतेय.

कशामुळे हा स्फोट झाला आणि जहाजावर आग लागली हे अजून स्पष्ट झालेलं नाही. बर्दीयान्स्क हे रशियाच्या ताब्यात गेलेल्या मारिओपोल शहराच्या पश्चिमेला असणारं बंदर आहे. युक्रेनवर हल्ला केल्यानंतर चार दिवसांनी ते रशियाने ताब्यात घेतलं होतं.

रशियाचं म्हणणं आहे की ते आपल्या सैन्यासाठी लागणाऱ्या सामग्रीची ने-आण करायला या बंदराचा वापर करायचे.

गेल्या आठवड्यात जेव्हा ओर्स्क ही युद्धनौका बर्दीयान्स्क बंदारात आली तेव्हा रशियन आर्मी टिव्हीने या घटनेचं वर्णन 'अभुतपूर्व घटना' असं केलं.

रशियाच्या सरकारी चॅनलचे प्रतिनिधी मुराद गाझडिव्ह यांनी जे ड्रोन फुटेज शूट केलं त्यात खास शस्त्रांनी सज्ज अशा गाड्या ओर्स्कमधून बंदरावर उतरताना दिसत होत्या.

या गाड्या रशियन सैन्याच्या मदतीसाठी आल्या आहेत असंही या रिपोर्टमध्ये म्हटलं.

युक्रेनच्या नौदलाने गुरुवार, 25 मार्चला स्थानिक वेळेनुसार सकाळी 7 ला आणि GMT नुसार सकाळी 5 ला पोस्ट केलेल्या व्हीडिओत या युद्धनौकेवर स्फोट झालेले आणि आग लागलेली दिसत आहे.

ओर्स्क पूर्णपणे नष्ट झाल्याचं म्हटलं जातंय तर अजून दोन जहाजांना आगी लागल्याचं म्हटलं जातंय. बंदरावरच्या शस्त्रागाराला आणि इंधन भरण्याच्या जागेलाही आग लागल्याचं कळतंय. घटनास्थळीच्या व्हीडिओमध्ये दोन जहाजं बंदरातून वेगाने बाहेर पडताना दिसत आहेत.

युक्रेनचे उपगृहमंत्री हॅना मॅलयार यांनी युक्रेनियन टीव्हीला सांगितलं की आपल्या सैन्याने 'एका मोठ्या लक्ष्यावर' आघात केलाय. 20 रणगाडे, 45 सशस्त्र गाड्या आणि 400 सैन्याच्या तुकड्या वाहून नेण्याची या युद्धनौकेची क्षमता होती.

पण या दाव्याची बीबीसी स्वतंत्रपणे चाचपणी करू शकलेलं नाही. याआधी रशियाच्या सरकारी टीव्हीसाठी काम करणारे पत्रकार गाझडिव्ह यांनी म्हटलं होतं की युक्रेनची क्षेपणास्त्र सतत बर्दीयान्स्क बंदराला लक्ष्य करत आहेत. पण यातलं प्रत्येक क्षेपणास्त्र निकामी करण्यात रशियाला यश आलेलं आहे.

बर्दीयान्स्क बंदर रशियासाठी खूप महत्त्वाचं आहे, कारण हे बंदर क्रायमिया आणि आता रशियाच्या ताब्यात असलेल्या मारिओपोल शहराच्या मधोमध आहे. इथे अजूनही 1 लाख लोक अडकलेले आहेत आणि रशियाच्या बॉम्बहल्ल्यांना तोंड देत आहेत.

काही लोक मारिओपोलमधून पळून बर्दीयान्स्कमध्ये आलेले आहेत आणि युक्रेनच्या उपगृहमंत्र्यांनी म्हटलंय की त्यांना देशातल्या आतल्या भागातल्या झॅपोरिझिआ या शहरात घेऊन जाणार आहेत.

बर्दीयान्स्क आणि मारिओपोल या शहरांवर ताबा मिळवणं रशियासाठी धोरणात्मकदृष्ट्या फार महत्त्वाचं होतं, कारण त्यांना क्रायमिया ते रशियाची सीमा यामध्ये सरळ मार्ग मिळाला असता आणि पुढे झॅपोरिझिआपर्यंत जाण्याचा त्यांचा मार्ग मोकळा झाला असता.

बर्दीयान्स्कच्या रहिवाशांनी रशियाने हे शहर ताब्यात घेतल्यानंतर निदर्शनं केली. सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या एका व्हीडिओत रशियन सैन्य या निदर्शकांनी निघून जावं म्हणून मारहाण करताना दिसतंय.

युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी म्हटलंय की ओर्स्क या युद्धनौकेवर झालेल्या हल्ल्याला एक प्रतिकात्मक महत्त्वही आहे. कारण रशियाने पहिल्यांदा, 2014 मध्ये क्रायमियावर हल्ला केला होता तेव्हा ही युद्धनौका त्या हल्ल्याचा भाग होती. या नौकेचे प्रमुख आणि यावर काम करणाऱ्या लोकांना जी पदकं दिली आहेत त्यावरून हे स्पष्ट होतं असं त्यांचं म्हणणं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)