संजय राऊत : 'एक पुतिन दिल्लीत बसलेत, ते आमच्यावर रोज मिसाईल सोडतात' #5मोठ्याबातम्या

फोटो स्रोत, Getty Images
विविध वेबसाईट्स आणि वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा.
1. एक पुतिन दिल्लीत बसलेत, ते आमच्यावर रोज मिसाईल सोडतात- संजय राऊत
"एक पुतिन दिल्लीत बसलेत. ते आमच्यावर रोज मिसाईल सोडत आहेत. ईडीच्या माध्यमातून हे मिसाईल सोडले जात आहेत. पण तरीही आम्ही डगमगलो नाही. आम्ही त्यांच्या हल्ल्यापासून वाचलो आहोत," अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर तोफ डागली.
लोकमततर्फे देण्यात येणाऱ्या पत्रपंडित पां. वा. गाडगीळ स्मृती आर्थिक-विकासात्मक लेखन आणि पत्रमहर्षी म. य. उपाख्य बाबा दळवी स्मृती शोधपत्रकारिता पुरस्कार वितरण सोहळ्यात राऊत बोलत होते.
ते पुढे म्हणाले, "कालपर्यंत आम्हाला वाटत होतं की ही वेगळीच गडबड आहे. रशिया-युक्रेन यांच्या युद्धातील सत्य आपल्याला समजलं. आपल्या देशात युद्ध नसेल, पण आमच्यासारखे लोक रोज युद्धाचा अनुभव घेत असतात.
दिल्लीमध्ये पुतिन बसलेले आहेत आणि आमच्यावर मिसाईल सोडतायेत. ईडी असेल, सीबीआय असेल, इन्कम टॅक्स असेल. बॉम्ब सोडतायेत, मिसाईल सोडतायतं. त्यातून आम्ही वाचलेलो आहोत. रोज एक मिसाईल येतं आम्ही ते वाचवतो.
कारण महाराष्ट्रावर अशाप्रकारचे हल्ले करणं. कोणत्याही राज्यामध्ये, ज्या राज्यामध्ये आपलं सरकार नाही त्या राज्यांशी अधिक सन्मानाने वागलं पाहिजे हे आम्हाला पंडित नेहरुंकडून शिकायला मिळालं," असा निशाणा संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदी यांचं नाव न घेता अप्रत्यक्षपणे साधला आहे.
2. मोदी कधीच सुडाचं राजकारण करत नाहीत - फडणवीस
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या मालमत्तेवर ईडीने टाच आणल्यानंतर राज्यात राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. या कारवाईनंतर शिवसेनेतून तीव्र प्रतिक्रिया उमटली, तर भाजपने कारवाईचं समर्थन केलं.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कधीच सूडाचं राजकारण करीत नसल्याचं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात पत्रकारांशी बोलताना म्हटलं.

फोटो स्रोत, Getty Images
त्यावेळी त्यांनी म्हटलं, "देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कधीच सूडाचं राजकारण करीत नाहीत. त्यांच्या राज्यात तरी कोणतीही सेंट्रल एजन्सी सूडाच्या भावनेने राजकारण करत नाही. पण प्रविण दरेकरांवर मात्र अशी कारवाई सुरू आहे. नसलेल्या गोष्टी कशा तयार होत आहेत. आमच्या सर्वांविरोधात यांचे वकील मंत्र्यांसोबत बसून कसे षड्यंत्र करत आहेत या गोष्टीही महत्त्वाच्या आहेत. त्या गोष्टी या नेत्यांनी पाहाव्यात."
पुढारीनं ही बातमी दिली आहे.
3. बंडातात्या कराडकर यांची प्रवचनातून महात्मा गांधींच्या अहिंसेच्या तत्वावर टीका
स्वातंत्र्यासाठी साबरमती के संत तुने कर दिया कमाल, मिली हमे आजादी बिना खड्ग बिना ढाल… असं म्हणणं म्हणजे झाशीच्या राणीसह 350 क्रांतीकारकांचा अपमान असल्याचं वक्तव्यं कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी केलं आहे.
हुतात्मा राजगुरू यांच्या स्मृतीस्थळावर दिलेल्या प्रवचनात बंडातात्यांनी महात्मा गांधींच्या अहिंसेच्या तत्वावर टीका केलीय.

फोटो स्रोत, Getty Images
त्यांनी म्हटलं, "महात्मा गांधींचा अहिंसावाद आणि हिंदुत्व दोन्ही तशी पक्षपाती आहेत. 1947 च्या देशाला मिळालेलं स्वातंत्र्य अहिंसेच्या मार्गानं मिळालेलं नाही, तर 1942ला जी क्रांतिकारक चळवळ उभी राहिली. चले जाव.. क्विट इंडिया… त्यामध्ये गावोगावी पोलीसांचं कार्यालय, सरकारी कचेऱ्या जाळणं, रेल्वेचे रुळ उखडणं, या ज्या घटना घडत गेल्या त्याचा बोध इंग्रजांनी घेतला की आता हा देश सोडण्याशिवाय पर्याय नाही."
बंडातात्या पुढे म्हणाले की, "शहीद भगतसिंग यांच्या मनात महात्मा गांधींची छाप होती. गांधीजींचा अहिंसावाद त्यांच्या मनात ठसला होता. आपल्याला हे स्वातंत्र्य अहिंसक मार्गाने मिळवायचं आहे. पण हा भगतसिंग यांचा भ्रमाचा भोपळा तीन वर्षातच फुटला. कारण 1922ला एक हत्याकांड झालं. त्या हत्याकांडाला समर्थन देण्यासाठी म्हणून महात्मा गांधींनी नकार दिला. त्यावेळी भगतसिंग महात्मा गांधींवर नाराज झाले."
टीव्ही9 मराठीनं ही बातमी दिली आहे.
4. निर्मला सीतारामन यांची पंडित नेहरूंच्या धोरणावर टीका
"कश्मीरचा मुद्दा हा भारताचा अंतर्गत विषय होता. मात्र या मुद्द्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर घेऊन जाण्याचं काम काँग्रसने केलं," असं म्हणत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कश्मीरच्या मुद्यावरुन भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या धोरणावर टीका करत काँग्रेला लक्ष्य केलं. त्या राज्यसभेत बोलत होत्या.

फोटो स्रोत, Getty Images
यावेळी बोलताना त्यांनी म्हटलं, "पाकव्याप्त कश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे, असा ठराव 1991 मध्ये मंजूर करण्यात आला. हा भारताशी संबंधित मुद्दा होता. मात्र काँग्रेसने हा मुद्दा संयुक्त राष्ट्रामध्ये नेला. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू या मुद्द्याला संयुक्त राष्ट्रामध्ये घेऊन गेल्याचं अभ्यास केल्यानंतर समोर येते. त्यांनी असं का केलं?"
"अभ्यास केल्यानंतर समजलं की, 1947 च्या डिसेंबरमध्ये ब्रिटिशांनी नेहरुंना हा मुद्दा संयुक्त राष्ट्रामध्ये घेऊन जाण्याचा सल्ला कदाचित दिला असावा. काश्मीरचा मुद्दा आंतरराष्ट्रीय बनवण्यात आला. पाकिस्तान त्याचा दुरुपयोग करत आहे. हा मुद्दा जागतिक स्तरावर जायला नको होता," असंदेखील निर्मला सीतारामन म्हणाल्या.
आजतकने ही बातमी दिली आहे.
5. नाहीतर शिवसेनेवर बहिष्कार टाकू : ब्राह्मण समाजाचा इशारा
'शेंडी जानव्याचं हिंदुत्व आम्हाला मान्य नाही,' असं वक्तव्य शिवसेनेचे प्रवक्ते विनायक राऊत यांनी केल्याने ब्राह्मण समाज समन्वय समितीने त्यावर आक्षेप घेतला आहे. हे वक्तव्य करून समस्त ब्राह्मण समाजाचा आणि हिंदू धर्माचा घोर अपमान केल्याचा आरोप ब्राह्मण समाज समन्वय समितीने केलाय.
याप्रकरणी शिवसेनाचे प्रवक्ते विनायक राऊत यांनी आठ दिवसांत ब्राह्मण समाजाची माफी मागावी अन्यथा 'मातोश्री' वर मोर्चा काढू असा इशारा ब्राह्मण समाज समन्वय समितीने दिला आहे.
मंगळवारी (22 मार्च) औरंगाबादमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत विनायक राऊत यांनी शेंडी जानव्याचं हिंदुत्व आम्हाला मान्य नाही, असं वक्तव्य केलं.
"शिवसेना पक्षातर्फे आणि शिवसेनेच्या शिर्षस्थ नेत्यांतर्फे असा उल्लेख करण्याची ही पहिली वेळ नाही. याआधी देखील महाराष्ट्राच्या विधानसभेत जाहीर सभेत तसंच पत्रकार परिषदेमध्ये अनेकदा हे वक्तव्य शिवसेनेच्या नेत्यांतर्फे करण्यात आले आहे," असं ब्राह्मण समाज समन्वय समितीने म्हटलंय.
शेंडी-जानव्याचं हिंदुत्व शिवसेनेला मान्य नाही मग टोपी-बुरख्याचं हिंदुत्व शिवसेनेला मान्य आहे का? शेंडी जाणव्याचं हिंदुत्व मान्य नाही पण शेंडी जाणव्याचं मतदान शिवसेनेला मान्य आहे अशी दुटप्पी भूमिका कशी? हा वाक्यप्रचार वापरायचा पायंडा पाडत आहात का? असे प्रश्न ब्राह्मण समाज समन्वय समितीने शिवसेनेला विचारले आहेत.
लोकसत्तानं ही बातमी दिलीये.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
























