You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोल्हापूर उत्तर पोटनिवडणूक: उद्धव ठाकरे सरकारविरुद्ध फडणवीस, एक जागा पण प्रतिष्ठा पणाला
- Author, स्वाती पाटील
- Role, बीबीसी मराठीसाठी, कोल्हापूर
- Published
- वाचन वेळ: 5 मिनिटे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावर ईडीची कारवाई झाल्यानंतर शिवसेना आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. तर याच वेळी कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीचे वारे वाहत आहे. सध्या सुरू असलेल्या या घडामोडींचा परिणाम या पोटनिवडणुकीवर होण्याची चिन्हं आहेत. त्यामुळे काँग्रेसचा उमेदवार असला तर पूर्णच महाविकास आघाडी सर्व ताकदीनिशी या मैदानात उतरणार अशी चिन्हं दिसत आहेत.
त्यावेळी उद्धव ठाकरे सरकार विरुद्ध देवेंद्र फडणवीस यांच्यातलाच सामना म्हणून या निवडणुकीकडे जाणकार पाहत आहेत. महाविकास आघाडी आणि फडणवीस यांची प्रतिष्ठा पणाला लागल्याचे बोलले जात आहे.
कोल्हापूर उत्तरचे आमदार चंद्रकांत जाधव यांचे कोरोनामुळे निधन झाले. त्यामुळं या जागेवर ही पोटनिवडणूक होतेय. गृहराज्यमंत्री आणि पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न केले होते. मात्र भाजपकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळं ही पोटनिवडणूक होत आहे.
कॉग्रेसकडून या मतदार संघात दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर भाजपकडून सत्यजित कदम यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
दरम्यान, सध्या राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आहे. ज्या जागेवर ज्या पक्षाचा आमदार होता. त्याच पक्षाकडे ती जागा कायम राहणार असल्याचं महाविकास आघाडी सरकारचं सुत्र आहे. असं असतानाही कोल्हापूर उत्तर मतदार संघात कॉंग्रेस विरुद्ध शिवसेना असा संघर्ष निर्माण होणार असल्याची चिन्ह होती. त्याचं कारण शिवसेनेचे माजी आमदार आणि राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी ही जागा कॉंग्रेसकडे जाण्यावरून नाराजी व्यक्त केली होती.
1990 पासून 2004 आणि 2019 चा अपवाद वगळता या जागेवर कायम शिवसेना निवडून आली आहे. 2014 मध्ये शिवसेनेच्या राजेश क्षीरसागर यांनीच काँग्रेसचे सत्यजित कदम यांचा पराभव केला होता. हेच कदम सध्या भाजपचे उमेदवार आहेत.
कोल्हापूर उत्तर मतदार संघ कॉग्रेसला सोडण्यावरून राजेश क्षीरसागर यांनी माध्यमांसमोर नाराजी व्यक्त केली होती. या मतदार संघात भाजपचा पराभव करण्यासाठी शिवसेनेचा उमेदवार असावा अशी मागणी करत शिवसेना समर्थकांनी क्षीरसागर यांच्या घरासमोर घोषणाबाजी केली. त्यानंतर राजेश क्षीरसागर यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणा असं सांगितल्याने या वादावर आता पडदा पडला आहे.
भाजपसाठी ही निवडणूक महत्त्वाची का आहे?
ही निवडणूक म्हणजे भाजपसाठी 2024 पुर्वीची लिटमस चाचणी असेल असं कोल्हापूरमधील ज्येष्ठ पत्रकार आणि महाराष्ट्र टाईम्सचे प्रतिनिधी सतिश घाटगे यांना वाटतं. त्याचं मुख्य कारण शिवसेनेला सोबत न घेता भाजप निवडणुकीच्या मैदानात किती यश मिळवते याची ही चाचपणी असणार आहे.
डिंसेबरमध्ये विधानपरिषद निवडणूक बिनविरोध करत भाजपने आपला उमेदवार मागे घेतला. पण या वेळी मात्र सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्या बिनविरोध करण्याच्या प्रयत्नाला भाजपने साथ दिली नाही. उलट सत्यजित कदम यांच्या रूपाने तुल्यबळ उमेदवार दिला. एकीकडे 4 राज्यांत मिळालेल्या यशामुळे भाजप जोमात आहे. त्यातच शिवसेनेतील कुरबुरीचा पडद्यामागून भाजपला फायदा होईल का हेही पाहावं लागेल, असं घाटगे सांगतात.
महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यावर होणाऱ्या कारवाई आणि आरोपांमुळे कॉंग्रेससह इतर पक्षांना अडचणीत आणण्याचे भाजपचे प्रयत्न सुरू आहेत. चार राज्यांतील विजयामुळं भाजपचा आत्मविश्वास दुणावला आहे. सध्या कोल्हापूर जिल्ह्यात विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघात भाजपच्या ताब्यात एकही जागा नाही त्यामुळं भाजपकडून ही निवडणूक जिंकण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले जाणार असं दिसतंय.
तर कॉंग्रेससाठीदेखील ही निवडणूक सोपी नाही असं दैनिक सकाळचे मुख्य प्रतिनिधी निवास चौगुले सांगतात. त्याचं कारण असं की, सत्ता आल्यानंतर कोरोनाच्या काळात कुणालाही फार ठोस कामगिरी करता आली नाही. त्यामुळं विकासाच्या मुद्द्यावर फार काही ठोस बोलण्यासारखे सध्या तरी मोठे मुद्दे नाहीत. त्यात भाजपची आक्रमक भूमिका धोक्याची घंटा आहे.
सहानुभूतीच्या मुद्द्यावर किती यश
या निवडणूकीत सहानुभूतीचा फायदा कॉग्रेसला होईल असं घाटगे यांना वाटतं. चंद्रकात जाधव यांच्या अकाली निधनाने त्यांची अपूर्ण कामे पूर्ण करण्याची साद कॉंग्रेसकडून घातली जाईल. या सहानुभूतीला खास करून महिला वर्ग प्रतिसाद देईल असं चित्र आहे असं घाटगे यांना वाटतं.
चंद्रकांत जाधव यांना अण्णा म्हणून ओळखलं जायचं. कोरोना काळात आरोग्य सुविधांसाठी जीव धोक्यात घालणाऱ्या जाधव यांच्या राजकीय आणि सामाजिक कार्याचा दाखला देत कॉंग्रेसक़डून भावनिक आवाहन केलं जाईल. यासाठी अण्णांच्या माघारी आता आपली जबाबदारी अशी टॅगलाईन प्रचाराचे आकर्षण आहे.
पण चौगुले यांच्या मते मात्र जाधव यांच्या निधनामुळे सहानुभूतीच्या जोरावर विजय मिळण्याबद्दल ठाम सांगणं अवघड आहे. यामागं राष्ट्रवादी कॉंग्रेसचा पंढरपूर मध्ये झालेल्या पराभवाचा अनुभव लक्षात घ्यावा लागेल.
मंगळवेढा मतदार संघात दिवंगत आमदार भारत भालके यांच्या मुलाचा भाजपने पराभव केला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार भारत भालके यांचं या मतदार संघात मोठं नाव होते. त्यांनी तिथं कामंही केली होती. असं असताना भालके यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत भगीरथ भालके यांचा भाजपच्या समाधान आवताडे यांनी पराभव केला. हा अनुभव पाहता कोल्हापूर उत्तरची पोटनिवडणूक कॉंग्रेससाठी अटितटीची लढाई असणार आहे.
एकीकडे महाविकास आघाडीतील सर्व पक्ष विरूद्ध भाजप असा संघर्ष सुरू असताना ही पोटनिवडणूक होतेय. त्यामुळं सर्वच पक्ष ताकदीने निवडणूक मैदानात उतरणार असल्याचं चित्र आहे. शरद पवार, आदित्य ठाकरे यांच्यासह सरकारमधले मंत्री, आमदार इथं प्रचाराला येणार आहेत. तर भाजपकडून देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्यावर विजय मिळणवण्याची जबाबदारी असणार आहे.
नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
ही निवडणूक बऱ्याच बाजूंनी चर्चेची आणि चुरशीची असेल यात वाद नाही. मविआ सरकार विरुद्ध भाजप या सोबतच पालकमंत्री सतेज पाटील विरुद्ध भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांच्यात ही चुरस असणार आहे. तर कोल्हापूरमधील पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाटील आणि महाडिक गटासाठी देखील ही निवडणूक चुरशीची असणार आहे.
शिवसेना, कॉग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची मतांची आकडेवारी मोठी असणार यात शंका नाही. या मतदारसंघात शिवसेनेचा मोठा वर्ग आहे. हा वर्ग कॉंग्रेसच्या उमेदवाराला मतदान करतोय की नोटाला मतदान करून भाजपला फायदा करून देईल हे निकालानंतर स्पष्ट होईल. पण आजवरचा इतिहास पाहता कट्टर शिवसैनिक कॉंग्रेसला पाठिंबा देणार का हा महत्वाचा मुद्दा आहे असं घाटगे सांगतात.
कोणते मुद्दे प्रचारात येणार
मविआ सरकारमधील मंत्री आणि आमदार यांच्यासह लोकसभा खासदारांनी कोल्हापूरसाठी आणलेल्या निधीचा प्रचारात उल्लेख होईल. कॉंग्रेसकडून रस्ते, पाणी योजना असे विकासाचे मुद्दे पुढे केले जातील. तर भाजपकडून भ्रष्ट कारभारावर टिका करण्यातयेईल. शिवसेनेच्या हिंदुत्वाच्या मुद्द्याचा पुरेपूर वापर करण्यात येईल असं जाणकारांना वाटतं.
केंद्रातली सत्ता, चार राज्यातील विजय, शेतकरी कायदे, इडी सारख्या यंत्रणांचा वापर अशा अनेक मुद्यांमुळे भाजप आक्रमक आहे. त्यात भाजप म्हणजे मोदी यावर विश्वास ठेवून होणारं मतदान हे उमेदवाराला न पाहता कमळ या चिन्हाला पाहून मतदान होते असा अनुभव असल्याने कॉंग्रेससाठी हा विजय सोपा नसल्याचं चित्र दिसतंय असं घाटगे सांगतात.
भाजपचे उमेदवार सत्यजित कदम हे महापालिका राजकारणातील अभ्यासू नेते म्हणून ओळखले जातात. कदम यांच्या घराण्याला कित्येक वर्षांचा राजकीय इतिहास आहे. 2014 च्या निवडणुकीत कदम हे कॉंग्रेसचे उमेदवार होते. त्यावेळी त्यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. शिवसेनेच्या राजेश क्षीरसागर यांनी कदम यांचा पराभव केला होता.
कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या या जागेसाठी 12 एप्रिलला मतदान होणार असून 16 एप्रिलला मतमोजणी होईल. या जागेसाठी आपकडून उमेदवार उतरवला जाईल. सोबतच करुणा शर्मा, अभिजीत बिचुकलेही निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. दरम्यान, 26 मार्च ही अर्ज माघारीची अंतिम मुदत आहे. त्यानंतर चित्र आणखी स्पष्ट होईल.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)