भगवद्गीता शाळांमध्ये शिकवण्याचा निर्णय गुजरात सरकारने घेतला कारण...

Published
वाचन वेळ: 4 मिनिटे

गुजरात सरकारने नवीन शालेय वर्षापासून माध्यमिक आणि उच्च-माध्यमिक शाळांच्या अभ्यासक्रमात भगवद्गीतेचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे येत्या काळात वादांचं 'वादळ' निर्माण होईल, अशी भीती अनेकांना वाटते आहे.

गुजरात सरकारने या संदर्भातील निर्णयाची घोषणा केल्यानंतर, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी असं सुचवलं की, गुजरातप्रमाणे सर्वच राज्य सरकारांनी शाळांमध्ये भगवद्गीता शिकवण्याचा विचार करावा.

एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत जोशी म्हणाले, "भगवद्गीता आपल्याला नैतिकता शिकवते. सामाजिक कल्याणासंदर्भातील आपली जबाबदारी शिकवणारा हा ग्रंथ आहे. त्यातील अनेक नीतिकथा आपल्या विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरतील. राज्य सरकारांनी या निर्णयाचा विचार करावा."

गुजरातमधील शालेय अभ्यासक्रमात भगवद्गीतेचा समावेश करण्याचा निर्णय जाहीर झाल्यानंतर कर्नाटक सरकारसुद्धा अशाच निर्णयाचा विचार करतं आहे.

'इकनॉमिक टाइम्स'मध्ये आलेल्या बातमीनुसार, या संदर्भात सध्या कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याशी चर्चा सुरू असल्याचं तिथले शिक्षण मंत्री बी. सी. नागेश म्हणाले.

पुढील शालेय वर्ष सुरू होण्यापूर्वी पहिल्या इयत्तेपासून इंग्रजी हा विषय अनिवार्य करण्यात येईल आणि सहाव्या इयत्तेपासून अभ्यासक्रमात भगवद्गीतेचा समावेश असेल, अशी घोषणा गुजरातचे शिक्षण मंत्री जीतू वाघानी यांनी गुरुवारी विधानसभेत केली. शिक्षणासाठी करण्यात आलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीसंदर्भात चर्चा सुरू असताना त्यांनी हे सांगितलं.

सरकारच्या निर्णयानुसार अभ्यासक्रमात गीतापठण आणि वाचन या दोन्हींचा समावेश असेल.

गुजरातचे शिक्षण सचिव विनोद राव 'इंडियन एक्सप्रेस'शी बोलताना म्हणाले की, राज्यातील माध्यमिक आणि उच्च-माध्यमिक शाळांमध्ये टप्प्याटप्प्याने गीता शिकवली जाईल.

भगवद्गीतेचा कोणताही स्वतंत्र विषय नसेल, तर विविध विषयांमध्ये तिच्या शिकवणुकीचा समावेश केला जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.

परंतु, सरकारच्या या निर्णयाचा मुलांच्या मानसिकतेवर परिणाम होईल आणि धार्मिक भावनांच्या मुद्द्यावरून वाद उफाळेल, अशी शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.

मुलांच्या मनांवर परिणाम

सरकारच्या या निर्णयाचा मुलांवरील संभाव्य परिणाम स्पष्ट करताना शिक्षणतज्ज्ञ प्रफुल्ल गढवी म्हणाले, "मुलांना गीतेमधील श्लोक शिकवण्यात काही चुकीचं नाही, पण त्यातून वाद उद्भवू शकतो आणि त्याचा मुलांच्या अभ्यासावर विपरित परिणाम होईल."

"अशा निर्णयामुळे इतर धर्मांमधील मुलांना दुय्यम किंवा कमी महत्त्वाचं असल्यासारखं वाटू शकतं," असं गढवी म्हणतात.

"वादामुळे मुलांमध्ये स्वतःच्या धर्माविषयी गोंधळ निर्माण होऊ शकतो. बालपणीच धार्मिकतेची बिजं रोवली गेली तर, ते भारतीय असण्याबाबत विचार करण्याऐवजी हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन वा जैन अशा संदर्भात विचार करू लागण्याची शक्यता आहे."

'नैतिकते'चे धडे

'बीबीसी गुजराती'शी बोलताना शिक्षण मंत्री जितू वाघवानी यांनी भगवद्गीतेच्या शिक्षणाचा निर्णय कसा अंमलात आणला जाईल याचा खुलासा केला.

ते म्हणाले, "सहाव्या इयत्तेपासून आठव्या इयत्तेपर्यंत भगवद्गीतेमधील गोष्टी सांगितल्या जातील आणि नववीपासून बारावीपर्यंतच्या पाठ्यपुस्तकांमध्ये गीतेचा समावेश असेल. शाळांमध्ये भगवद्गीतेसंदर्भात नाट्यस्पर्धा, निबंधस्पर्धा, श्लोकपठणस्पर्धा, इत्यादी आयोजन केलं जाईल"

या निर्णयामागील कारण स्पष्ट करताना ते म्हणाले, "मुलांमध्ये मूल्यं, भारतीय संस्कृती आणि 'नैतिकता' रुजावी, ही यामागील संकल्पना आहे."

परंतु, काँग्रेसचे प्रवक्ते हेमांग रावल 'बीबीसी गुजराती'शी बोलताना म्हणाले, "गीतेमधील शिकवणीचा समावेश करण्यात काही गैर नाही, पण मुलांना नैतिकता शिकवण्याच्या नावाखाली भाजप भाबडेपणा करते आहे."

"भाजपची राजवट येण्यापूर्वी आम्ही शिकलो, तेव्हा आमच्या अभ्यासक्रमात महाभारत आणि रामायणातल्या गोष्टींचा समावेश होता. त्यातून नीतिमूल्यं शिकवली जात होती. शिवाय, त्यावेळी आठवीमध्ये संस्कृत अनिवार्य होतं आणि दहावीत हा विषय पर्यायी ठेवण्यात आला होता," असं रावल म्हणाले.

भाजप सत्तेत आल्यानंतर या सर्व नीतिकथा आणि साहित्य अभ्यासातून वगळण्यात आलं, असा आरोप त्यांनी केला.

शिक्षणतज्ज्ञ हसमुख ख्रिश्चन यांच्या मते, अप्रत्यक्ष रितीने अभ्यासक्रमात धार्मिक अभ्यासाचा समावेश करून विद्यार्थ्यांचा प्रयोगासाठी वापर केला जातो आहे.

जितू वाघवानी यांच्या विधानासंदर्भात बोलताना हसमुख म्हणाले, "शिक्षण मंत्री गीतेच्या अभ्यासाद्वारे विद्यार्थ्यांना नैतिकता शिकवण्याबाबत बोलत आहेत. मग आत्तापर्यंत मुलांना नैतिकता शिकवण्यात आली नव्हती काय?"

हसमुख पुढे म्हणतात, "केवळ भगवद्गीतेमध्येच नैतिक धडे आहेत का? कुराण, बायबल किंवा गुरुग्रंथसाहिब यांमध्ये नैतिक शिकवण नाही का?"

नैतिकतेच्या नावाखाली शिक्षणात धर्म आणण्याबाबत हसमुख चिंता व्यक्त करतात. "अशा प्रकारे निर्णय घेऊन आपण पुढील पिढीला धर्माच्या नावाखाली विकासाची वाट दाखवत नसून विध्वंसाची वाट दाखवतो आहे."

प्रफुल्ल गढवी यांच्या मते, एका धर्मातील शिकवणूक प्रचाराच्या उद्देशाने शिक्षणव्यवस्थेत समाविष्ट केली जात असेल, तर ते असांविधानिक आहे.

ते पुढे म्हणतात, "मुलांना भगवद्गीता शिकवली गेली, तर इतर धर्मांचे लोक त्याला विरोध करतील किंवा त्यांच्या धार्मिक शिकवणुकीचाही समावेश अभ्यासक्रमात करावा अशी मागणी होईल. कदाचित हे प्रकरण न्यायालयातसुद्धा जाऊ शकते." संविधानानुसार भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे, त्यामुळे या मुद्द्याला आंतरराष्ट्रीय पातळीवरही आव्हान दिलं जाऊ शकतं, असं त्यांना वाटतं.

हसमुख ख्रिश्चन यांच्या मते, भारतात १६ हजार ख्रिस्ती शाळा आणि सुमारे ४०० ख्रिस्ती महाविद्यालयं आहेत. अल्पसंख्याक म्हणून त्यांना धर्म शिकवण्याचा अधिकार आहे, पण ते तसं करत नाहीत, कारण त्यांच्या संस्थेत इतर धर्मांचेही विद्यार्थी असतात आणि शिक्षणाचा उद्देश कोणत्याही धर्माला प्राधान्य देणं हा नाही.

अहमदाबाद शालेय शिक्षण मंडळाचे माजी सदस्य इलियास कुरेशी 'बीबीसी गुजराती'शी बोलताना म्हणाले, "भगवद्गीता शिकवण्याला आमची हरकत नाही, पण इतर धर्मांच्या शिकवणुकीचाही समावेश अभ्यासक्रमात करायला हवा."

गीता जे शिकवते, तेच कुराण आणि बायबल आणि गुरुग्रंथसाहिब यांमधूनही शिकवलं जातं, असं ते म्हणतात.

अहमदाबाद महानगरपालिकेतील नगरसेविका आणि एआयएमआयएम पक्षाच्या नेत्या झैनाब शेख याबाबत सहमती दर्शवतात. "शाळांमध्ये गीतेची शिकवण द्यावी, पण इतर धर्मांच्या शिकवणुकीचाही त्यात समावेश करावा."

अभ्यासक्रमात केवळ भगवद्गीतेचा समावेश करण्यामागचा उद्देश मुलांच्या मनात हिंदू धर्माचं वर्चस्व ठसवणं हा आहे, असा आरोप कुरेशी आणि शेख करतात.

अहमदाबाद शिक्षण मंडळाचे सल्लागार झंकृत आचार्य यावर असहमती दर्शवत म्हणतात, "शिक्षण विभागाला उशिरा जाग आली आहे. त्यांनी आधीच गीतेमधील शिकवणुकीचा समावेश अभ्यासात करायला हवा होता. गीतेमध्ये व्यवस्थापनाचे धडे आहेत, त्यामुळे मुलांना लहान वयातच ही शिकवण मिळाली तर त्यांना आयुष्यातील लढ्यांना अधिक सहजतेने सामोरं जाता येईल."

या निर्णयावर होत असलेल्या टीकेबद्दल ते म्हणाले, "लोकांनी भगवद्गीतेकडे धर्मनिरपेक्ष ग्रंथ म्हणून पाहावं, धर्मग्रंथ म्हणून पाहू नये. यातून मुलांना चांगलं शिक्षण मिळू शकेल."

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)