You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
व्यंकय्या नायडू- शिक्षणाचे भगवीकरण झाले तर त्यात चूक काय? #5मोठ्याबातम्या
विविध वेबसाईट्स आणि वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा...
1. शिक्षणाचे भगवीकरण झाले तर त्यात चूक काय? - व्यंकय्या नायडू
"आपल्यावर शिक्षणाचे भगवीकरण केल्याचा आरोप आहे. पण मग भगव्यामध्ये काय चूक आहे?" असा सवाल भारताचे उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडूंनी केला आहे.
व्यंकय्या नायडूंनी शनिवारी (19 मार्च) देशातील लोकांना त्यांची 'वसाहतवादी मानसिकता' सोडण्यास आणि त्यांच्या ओळखीचा अभिमान बाळगण्यास शिकण्यास सांगितले.
तसेच, त्यांनी यावेळी सांगितले की, "देशातील लोकांना स्वतःच्या अस्मितेचा अभिमान हवा. मेकॉले शिक्षण पद्धतीला संपूर्णपणे नाकारले पाहिजे. मेकॉले शिक्षण पद्धतीने देशात शिक्षणाचे माध्यम म्हणून परदेशी भाषा लादली आणि शिक्षण उच्चभ्रू लोकांपर्यंत मर्यादित केलं, त्यामुळे ही पद्धती नाकारण्याचं आवाहनही नायडू यांनी केलं आहे."
"सर्वे भवनतु सुखिनः (सर्व सुखी रहा) आणि वसुधैव कुटुंबकम (जग एक कुटुंब आहे), जे आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये समाविष्ट असलेले तत्वज्ञान आजही परराष्ट्र धोरणाचा भाग आहेत, ही भारताची मार्गदर्शक तत्त्वे आहेत," असं उपराष्ट्रपती नायडू म्हणाले.
ते पुढे म्हणाले, "आपल्या वारशाचा, आपल्या संस्कृतीचा, आपल्या पूर्वजांचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. आपण आपल्या मुळांकडे परत जायला हवे. आपण आपली वसाहतवादी मानसिकता सोडून दिली पाहिजे आणि आपल्या मुलांना त्यांच्या भारतीय अस्मितेचा अभिमान बाळगायला शिकवले पाहिजे. आपण शक्य तितक्या भारतीय भाषा शिकल्या पाहिजेत. आपण आपल्या मातृभाषेवर प्रेम केले पाहिजे. ज्ञानाचा खजिना असलेले आपले धर्मग्रंथ जाणून घेण्यासाठी आपण संस्कृत शिकली पाहिजे."
लोकसत्ता या वृत्तपत्राने ही बातमी दिली आहे.
2. आपण लवकरच द्वेष आणि रागाच्या क्रमवारीत अव्वल स्थानी असू - राहुल गांधी
भारत लवकरच 'द्वेष आणि राग' या क्रमवारीत सर्वोच्च स्थानावर पोहोचण्याची शक्यता आहे, असे म्हणत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी (19 मार्च) केंद्र सरकारला टोला लगावला आहे.
त्यांनी 'वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट'चा हवाला दिला, ज्यामध्ये भारत 136 व्या क्रमांकावर आहे.
संयुक्त राष्ट्राने शुक्रवारी (18 मार्च) जगातील आनंदी देशांची यादी जाहीर केली. याचा आधार घेत राहुल गांधी यांनी ट्वीट केले की, "भूकेच्या यादीत 101 वा, स्वातंत्र्य यादीत 119 वा आणि आनंदाच्या यादीत भारत 136 व्या क्रमांकावर आहे. परंतु, आम्ही लवकरच द्वेष आणि रागाच्या क्रमवारीत अव्वल स्थानी असू शकतो."
आनंदाचा निर्देशांक मोजण्यासाठी त्या देशातील लोकांचे वैयक्तिक पातळीवरील समाधान, त्या देशातील लोकांचं चांगलं राहणीमान, देशाचा जीडीपी आणि त्या देशातील आयुर्मानाचा विचार केला जातो. या सर्व गोष्टींचे मुल्यमापन करून तो देश किती आनंदी आहे हे ठरवले जाते. जगातील दीडशे देशांचे या सर्व गोष्टींच्या आधारे मुल्यमापन केले जाते आणि त्यामधून देशांना क्रमांत दिले जातात. यंदा 146 देशांचे मूल्यांकन करण्यात आले आहे. यामध्ये भारत 136 व्या स्थानी आहे
NDTV या वृत्तवाहिनीने ही बातमी दिली आहे.
3. जय शाह पुन्हा एकदा आशियाई क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी
बीसीसीआयचे सचिव जय शाह यांची पुन्हा एकदा आशियाई क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी एकमताने निवड झाली आहे. श्रीलंकेत शनिवारी (19 मार्च) झालेल्या आशियाई क्रिकेट परिषदेच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत जय शाह हे 2024 पर्यंत ACC चे अध्यक्ष राहतील असा निर्णय घेण्यात आला.
यासंदर्भातील माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने दिली असून आशियाई क्रिकेट परिषदेचे (ACC) अध्यक्ष म्हणून निवड झालेले ते सर्वांत तरुण प्रशासक आहेत. जय शाह यांनी 2021 मध्ये जानेवारीच्या अखेरीस आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्षपद स्वीकारले होते.
आगामी आशिया चषक श्रीलंकेत खेळवला जाणार आहे. ही स्पर्धा 27 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर या कालावधीत खेळली जाईल.
सकाळ या वृत्तपत्राने ही बातमी दिली आहे.
4. भविष्यात जम्मू काश्मीरमध्ये CRPF तैनात करण्याची आवश्यकता राहणार नाही - अमित शाह
येत्या काही वर्षांत जम्मू काश्मीरमध्ये सीआरपीएफ तैनात करण्याची आवश्यकता राहणार नसल्याचं वक्तव्य गृहमंत्री अमित शाह यांनी केले आहे. जम्मू येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाचा 83 वा स्थापना दिन साजरा झाला. यावेळी केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
यावेळी जवानांना संबोधित करताना गृहमंत्री शाह म्हणाले की, "देशाला आणि देशातील नागरिकांच्या सुरक्षेला स्वत:पेक्षा महत्व आणि प्राधान्य देण्याची परंपरा सीआरपीएफ ने कायम ठेवली आहे. हीच त्याग आणि बलिदानाची परंपरा, त्याच समर्पित वृत्तीने या दलाचे जवानही पुढे नेतील, अशी मला खात्री आहे. देशातील युवा पिढीला देखील या जवानांचे समर्पण आणि त्यागाविषयी मोठा आदर आहे."
ते पुढे म्हणाले की, "जिथे कुठेही संकटाची परिस्थिती असते, तिथे सीआरपीएफचे जवान पोहोचतात. तेव्हा लोकांना पूर्ण विश्वास वाटतो की आता ते परिस्थिती नियंत्रणात आणतील. या दलांचे कित्येक वर्षांचे परिश्रम आणि त्यांचा गौरवास्पद इतिहास यातूनच त्यांच्याविषयी हा विश्वास निर्माण झाला आहे.
"2014 मध्ये नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान झाल्यानंतर जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती सुधारली आहे. पुढील काही दिवसांत येथे सीआरपीएफ तैनात करण्याची आवश्यकता राहणार नाही."
दैनिक भास्कर या वृत्तपत्राने ही बातमी दिली आहे.
5. एमआयएमला महाविकास आघाडीत सामावून घेण्याबाबत नाना पटोलेंच सूचक वक्तव्य
एआयएमआयएम अर्थात 'ऑल इंडिया मजलीस ए इत्तेहादूल मुसलमीन'चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा खासदार इम्तियाज जलील यांनी शनिवारी (19 मार्च) महाविकास आघाडीत सामील होण्यास तयार असून, तसा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री राजेश टोपे यांच्यासमोर मांडल्यांचं सांगितलं. त्यावरून राज्यात चर्चांना उधाण आलं आहे.
राजकीय वर्तुळात ही उलटसुलट प्रतिक्रिया उमटू लागल्या. यावर भाजपने शिवसेनेवर निशाणा साधला. तर शिवसेनेने एमआयएमला भाजपची 'बी टीम' म्हटलं. तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी एमआयएमच्या या भूमिकेचं स्वागत केलं. यातच आता महाविकास आघाडीचा सदस्य असलेल्या काँग्रेसनंही सकारात्मक भूमिका मांडली.
महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एमआयएमला महाविकास आघाडीत सामावून घेण्याबाबत सूचक विधान केलं आहे
एमआयएमच्या भूमिकेबद्दल बोलताना नाना पटोले म्हणाले, "एमआयएमचा प्रस्ताव अद्याप कांग्रेसला आला नाही. आल्यावर विचार करू. इम्तियाज जलील यांचा प्रस्ताव काय आहे? त्यांचं मत काय आहे, हे जाणून घेऊ त्यांचं मत सेक्युलर व काँग्रेस विचारांशी सहमत असेल, तर नक्कीच विचार केला जाईल."
मुंबई तक या वृत्तवाहिनीने ही बातमी दिली आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)