You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
झुंडच्या रॅपसाठी विपीन तातडेला संधी कशी मिळाली?
- Author, नितेश राऊत
- Role, बीबीसी मराठीसाठी
- Published
- वाचन वेळ: 4 मिनिटे
"बालपणापासून झोपडपट्टीतील परिस्थिती अनुभवली म्हणून कदाचित नागराज मंजुळे सरांनी मला झुंड चित्रपटात रॅप म्हणण्याची संधी दिली असावी. चित्रपटातील प्रत्येक सीनमध्ये मी स्वतःला शोधत असतो. हा चित्रपट आमचा आहे," झुंड चित्रपटात रॅप म्हणणारा विपीन तातडे सांगत होता.
नागराज मंजुळे दिग्दर्शित झुंड सिनेमात विपीनने रॅप सॉंग म्हटलंय. या रॅप साँगमुळे तो चर्चेत आलाय.
आपल्या रॅप सॉंगच्या माध्यमातून विपीन समाजातील सामाजिक विषमता समाजासमोर मांडतोय.
कोण आहे विपीन तातडे?
विपीन तातडे मूळचा विदर्भातील अमरावतीचा.
अमरावतीच्या सिद्धार्थनगर झोपडपट्टीतून झुंड चित्रपटापर्यंतचा विपिनचा प्रवास मोठा संघर्षमय आहे. ज्या वस्तीत विपीन रहातो, त्याला इतरांकडून गलिच्छ वस्ती म्हणून हिणवलं जातं.
गल्लीबोळातून, अरुंद रस्त्यातून वाट काढत विपीनच्या पोहचावं लागतं. 24 वर्षांचा विपीन पत्रकारितेचं शिक्षण घेतोय. वडील हॉस्पिटलच्या आवारात चहाची टपरी चालवतात. आई घरगुती किराणा दुकान सांभाळते. बहिणीचे लग्न झालंय, तर भाऊ कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये पुढील शिक्षणासाठी गेलाय.
विपीनसोबत गप्पा मारताना, दोन्ही बाजूला असलेली उच्चभ्रू वस्ती आणि मधोमध असणारी ही झोपडपट्टी अनेकांच्या डोळ्याला खुपणारी आहे.
विपीन म्हणतो, "झोपडपट्टीतल जगणं सोप्पं नाही. त्यामुळेच आमच्या आयुष्यात आलेल्या अडचणी रॅपच्या माध्यमातून मांडणं सहज शक्य होतं."
विपीन रॅपर कसा बनला?
त्यावेळचं घर वजा झोपडी वाचवण्यासाठी सुद्धा मोठा संघर्ष करावा लागला होता, त्यातूनच रॅपिंगची प्रेरणा मिळाल्याचं विपीन सांगतो.
"आम्ही जिथे राहतो त्याच्या दोन्ही बाजूला सुशोभित चांगली वस्ती आहे. पण आमच्या वस्तीत तुडुंब भरलेल्या नाल्या, घाणीने भरलेली शौचालयं आणि सकाळी त्यासाठीही लागलेली लाईन, हे सगळं वेदनादायी आहे," तो पुढे सांगतो.
"आमच्या वस्तीलाच लागून असलेल्या परिसरात सगळ्या सुखसोयी उपलब्ध आहेत. त्यांना कुठलीच समस्या नाही. मग आमच्या झोपडपट्टीत समस्यांनी सकाळ होते तर ती झोपेपर्यंत सुटत नाही. हा भेदभाव कशासाठी?" विपीनला प्रश्न पडतो.
सामाजिक आणि दैनंदिन भेडसावणाऱ्या प्रश्नावर विपीन रॅपच्या माध्यमातून प्रहार करतो. तथाकथित पुढारलेल्या सामाजव्यवस्थेवर त्याने तयार केलेलं रॅप युवकांमध्ये प्रभावी माध्यम ठरत असल्याचं त्याला वाटतं.
तो सांगतो, "झोपडपट्टीतल्या प्रश्नांवर 'समस्या' नावाचं रॅप साँग तयार केलं. त्यात गल्लीत अवैध देशी दारू विकणाऱ्यांपासून, बेरोजगारी पर्यंतच्या समस्या मांडल्या. कारण, आमच्या भागात सुलभ शौचालय अजूनही स्वच्छ केले जात नाही.
"तुम्ही त्या परिसरात उभं राहिलात तर ओकारी आल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती सार्वजनिक शौचालयाची आहे. इतर भागात असणारी चकचक स्वच्छता या परिसरात शोधूनही सापडणार नाही," विपीन म्हणाला.
समाजाबाबत विपीनचं म्हणणं काय?
"समाजाचा आमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हीन दर्जाचा असतो," विपीन सांगत होता.
"एखाद्या वेळी पोलीस स्टेशनमध्ये आमची तक्रार झाली, किंवा आम्ही तक्रार द्यायला गेलो तर पोलिसांची आमच्याबाबत असलेली वागणूक गुन्हेगारासारखीच असते. हा लक्षात येणारा भेदभाव आहे," विपीन आपला अनुभव सांगत होता.
"या गोष्टी आम्ही कुणाला सांगायच्या, शेवटी ऐकणारं कुणी लागेल ना. 'रोज मरे त्याला कोण रडे' या म्हणीप्रमाणे आम्हीही स्वतःचे प्रश्न स्वतःच मांडत असतो."
मुलांनी शिक्षण घेऊन मोठं व्हावं अशी इच्छा विपीनच्या वडिलांची होती. त्यासाठी त्यांनी मुलांना इंग्रजी शाळेत दाखल केलं. विपीन सांगतो "त्यावेळी कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी वडील खूप मेहनत घ्यायचे. पण तरीही आमच्या शिक्षणासाठी पैसा अपुरा पडायचा. इंग्रजी शाळेतून बाहेर काढण्याईतके वाईट ते दिवस होते. त्यातून मार्ग काढत आम्ही शिकलो".
झोपडपट्टीच्या हक्कांसाठी अनेक आंदोलनात विपीनच्या वडिलांचा सहभाग होता असं विपीन सांगतो.
नंतरच्या काळात प्रश्न तेच होते. पण आंदोलनाची धार कमी होत गेली. समाज सुधारणेसाठी लोकांना वेगळ्या माध्यमातून प्रभावी विचार मांडता येतात. मग ते कोणते माध्यम असेल हा प्रश्न त्याला पडायचा.
रॅप सॉंगमधून साध्य काय करायचंय?
'रॅप टोळी' नावाचं आमचं युट्युब चॅनल आहे. पण यातून पैसे कमावण्याचा आमचा उद्देश कधीच नसतो.
विपीन सांगतो "समस्येवरचा रॅप खूप गाजला. त्यानंतर महिला दिनावर एक रॅप केला."
"आमची काम आटोपून आम्ही हे सगळं करत असतो. माझ्या सोबत काम करणारे कुणी सफाई कामगार आहेत. तर कुणी रोजंदारीवर जाणारे. यातून वेळ काढून ज्याला जस जमतं तसं काम करत असतो.
"मी कोणाला पैसे देऊ शकत नाही. पण एक सामाजिक उपक्रम म्हणून सगळे सोबत असतात."
विपीनने घरीच छोटासा स्टुडिओ तयार केला आहे. इथेच रॅपची रेकॉर्डिंग होते.
झुंडमध्ये एन्ट्री कशी झाली?
झुंड चित्रपटात झालेली एंट्री लॉटरी पेक्षा कमी नाही असं त्याला वाटतं.
"कोरोना काळात नोकरीसाठी पुण्यात गेलो. त्यावेळी हाथरस प्रकरण देशभर गाजलं होत. दरम्यान, या प्रकरणाविरोधात गुडलक चौकात आंदोलन सुरू होत. मी तिथे रॅप म्हटलं. बाजूलाच झुंडचं स्कोअरिंग सुरू होतं. झुंडसाठी बॅकग्राउंड स्कोअर देणारे साकेत साकेत कानेटकर यांनी माझं रॅप तिथेच ऐकलं आणि मला स्टुडिओत बोलावून घेतलं," विपीन सांगत होता.
विपीनच्या रॅपला झुंडमध्ये एंट्री मिळाली खरी, पण काही दिवसातच रॅप रद्द केल्याचा त्यांना फोन आला. तो म्हणाला, "रॅप रद्द झाल्याची बातमी कळताच मी नाराज झालो. पण पोस्टर रिलीज झाल्याच्या सहा दिवसांपूर्वी चित्रपटात रॅप आहे आणि ते रेकॉर्ड करून पाठव असा कॉल आला आणि माझ्या रॅपला झुंड मध्ये जागा मिळाली," विपीन म्हणाला.
चित्रपटाचा शेवट त्याच्या रॅपने होतोय. त्यामुळं संपूर्ण चित्रपटाचा सारांश त्या रॅपमध्ये येणार होतं. ही मोठी जबाबदारी असल्याचं विपीनला माहित होतं.
संपूर्ण सारांश 30 सेकंदात सांगणं अवघड होतं. तरीही त्याने लिहायला सुरवात केली.
झोपडपट्टी म्हणजेच भिंतीच्या अलीकडे एक भारत आहे. त्यांना संधी दिली तर ते त्याचं सोनं करू शकतात. ही मधली भिंत तोडायला पाहिजे. त्यांना संधी दिली, नाही दिली तरी ते स्वतः ती भिंत तोडून स्वतःच व्यक्तिमत्त्व सिद्ध करू शकतात. या ओळींवर चित्रपटाचा शेवट आहे.
विपीनच आयुष्य आणि झुंडची कहाणी मिळती जुळती आहे. झोपडपट्टीतून झुंड चित्रपटाचा मोठा पल्ला त्याने गाठला आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)