SRK+ : शाहरूख खानचे OTT एंट्रीबाबत सूचक ट्वीट

Published
वाचन वेळ: 5 मिनिटे

बॉलिवुडचा प्रसिद्ध अभिनेता शाहरूख खान आता ओटीटीवर एंट्री करणार असल्याची चिन्हं आहेत. शाहरुख खान केवळ एखादी वेबसिरिज किंवा चित्रपट घेऊन येणार नाही तर स्वतंत्र ओटीटी प्लॅटफॉर्मच तो लॉंच करण्याची शक्यता आहे. याबाबत शाहरुख खाने सूचक ट्वीट केले आहे.

'कुछ-कुछ होने वाला है, ओटीटी की दुनिया में,' असं ट्वीट शाहरूख खानने केल्यानंतर या नव्या प्लॅटफॉर्मबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

सोशल मिडीया अॅप इंन्स्टाग्रामवर शाहरूखने 'SRK+' लवकरच..असा फोटो शेअर केलाय.

मात्र 'SRK+' नक्की काय असेल, याबाबत शाहरूखने माहिती सार्वजनिक केलेली नाही.

गेल्याकाही वर्षात भारतात OTT अॅप प्रसिद्ध झालेत. मात्र, या OTT प्लॅटफॉर्मचं आर्थिक गणित काय असतं? यावर पैसे कसे कमवतात? याबाबत जाणून घेऊया.

शाहरूखचं 'SRK+' काय आहे?

मंगळवारी सकाळी बॉलीवूड अभिनेता शाहरूख खानने आपल्या इंन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला.

या फोटोमध्ये शाहरूख आणि त्याच्या बाजूला 'SRK+' लवकरच...असं लिहिण्यात आलंय.

'कुछ कुछ होने वाला है, OTT की दुनिया मे' असा मेसेज किंग खान शाहरूखने आपल्या फॅन्सना दिलाय.

शाहरूखने शेअर केलेल्या या फोटोला काही तासातच लाखो लाइक्स मिळालेत.

पण, 'SRK+' नक्की काय आहे? ही माहिती शाहरूखने अजूनही गुलदस्त्यात ठेवली.

शाहरूखच्या चाहत्यांनी मात्र 'SRK+' नक्की काय असेल याबाबत सोशल मिडीयावर जोरदार चर्चा सुरू केलीये.

सलमान खानने 'SRK+' बाबत काय खुलासा केला?

शाहरूखने 'SRK+' बाबतचं गुपित अजूनही सार्वजनिक केलेलं नाही.

पण, सलमान खानने मात्र शाहरूखचं हे टॉप सिक्रेट फोडलंच.

'SRK+' हे OTT अॅप असल्याची माहिती सलमान खानने सार्वजनिक केली.

ट्विटरवर शाहरूखच्या पोस्टवर सलमान म्हणतो, "आज की पार्टी तेरी तरफ से. तुझ्या नवीन OTT अॅपबद्दल तुझं अभिनंदन."

OTT प्लॅटफॉर्म म्हणजे काय?

OTT चा फुल फॉर्म Over-the-top असा आहे.

सामान्यांच्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर, OTT एक व्हिडीयो स्ट्रिमिंग सर्व्हिस आहे.

ओटीटीला अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर मागणी होती. मात्र गेल्याकाही वर्षात भारतात मोठ्या संख्येने OTT प्लॅटफॉर्म सुरू होऊ लागलेत.

अॅमेझॉन, नेटफ्लि्स, सोनी, झी, डिझ्नी यांसारखे अनेक ओटीटी प्लॅटफॉर्म लोकांना सेवा पुरवण्यासाठी बाजारात आहेत. या ओटीटी प्लॅटफॉर्मवर आपण चित्रपट, वेब-सिरिज, टीव्ही-शो, डॉक्युमेंन्ट्री आणि इतर अनेक गोष्टी पाहू शकतो.

हे ओटीटी अॅप मोबाईल किंवा टीव्हीवर सुद्धा पहाता येतात.

OTT प्लॅटफॉर्मचं आर्थिक गणित काय असतं?

कोरोना काळात हे OTT प्लॅटफॉर्म लोकांमध्ये चांगलेच लोकप्रिय झाले.

ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपट, सिरियल, वेब-सिरिज घरच्या घरी बसून पहाता येऊ शकतात. थिएटरमध्ये जावं लागत नाही, आजूबाजूला बसलेल्या लोकांची बडबड नाही, कोणताही त्रास नाही. त्यामुळे कोरोना काळात ओटीटी प्लॅटफॉर्म घराघरात पोहोचले.

ट्रेड अनलिस्ट कोमल नहाटा यांनी काही महिन्यांपूर्वी त्यांच्या बॉलिवूड बिझनेस कार्यक्रमात OTT प्लॅटफॉर्मचं आर्थिक गणित समजावून सांगितलं होतं. ते म्हणतात, आपल्याला आधी थिएटरमध्ये जाऊन चित्रपट पाहण्याची सवय असते. त्यानंतर काही महिन्यांनी आपण तो टीव्हीवर किंवा मग अमेझॉन नेटफ्लिक्ससारख्या OTT प्लॅटफॉर्मवर पाहतो.

पण आता OTT प्लॅटफॉर्म थेट चित्रपट खरेदी करतात. त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये स्पष्ट लिहिलेलं असतं, की या चित्रपटाचा प्रीमिअर रिलीज हा आमच्या प्लॅटफॉर्मवर होईल. प्रॉड्युसरला फिल्म विकल्यानंतर रिलीजच्या आधीच 'सेलिंग प्राइज' मिळून जाते. छोटया बजेटच्या, थिएटरच्या स्पर्धेत टिकू न शकणाऱ्या चित्रपटांसाठी हा पर्याय व्यवहार्य होता.

अर्थात, बिग बजेट चित्रपटांसाठी हा प्लॅटफॉर्म किती यशस्वी ठरेल, हे सांगता येत नाही. कारण चित्रपटाचं बजेट जास्त असेल, तर तो शंभर, दोनशे, तीनशे कोटीपर्यंतचा गल्ला जमवेल अशी अपेक्षा असते. चित्रपटाचा जो व्यवसाय होतो, त्याच्या पन्नास टक्के रक्कम ही प्रॉड्युसर किंवा चित्रपट डिस्ट्रीब्युटरने विकत घेतला असेल तर त्यांना मिळते.

म्हणजे एखाद्या चित्रपटानं तीनशे कोटींचा गल्ला जमवला, तर प्रोड्युसर किंवा डिस्ट्रीब्युटरला दीडशे कोटी मिळतात. स्वाभाविकपणे OTT प्लॅटफॉर्म एवढी रक्कम देऊ शकत नाहीत. त्यामुळे बिग बजेट चित्रपटांसाठी अजूनही हे प्लॅटफॉर्म अपेक्षित यश देतील, असं चित्र नसल्याचं कोमल नहाटा यांनी म्हटलं होतं.

'छोट्या बजेटच्या चित्रपटांना फायदा'

ओटीटी प्लॅटफॉर्म आर्थिक दृष्ट्या फायद्याचे आहेत का? हा प्रश्न आम्ही लेखक आणि चित्रपट अभ्यासकांना विचारला.

लेखक आणि चित्रपटांचे अभ्यासक अमोल उदगीरकर बीबीसीशी बोलताना म्हणाले होते, "OTT प्लॅटफॉर्म हा आर्थिकदृष्ट्या किती फायद्याचा आहे, हे निश्चितपणे सांगता येणार नाही. कारण बऱ्याचदा हे प्लॅटफॉर्म आपली आकडेवारी जाहीर करत नसतात. त्यांचे व्यवहार हे 'झाकली मूठ' प्रकारातील असतात. त्यामुळे त्यांचा फायदा-तोटा हा निश्चित सांगता येणार नाही,"

"पण छोट्या बजेटचे चित्रपटांच्या डील त्यांना नक्कीच फायद्याच्या ठरू शकतात. कारण लोकांना मनोरंजन हवं आहे. भारतीयांसाठी सिनेमा हा सगळ्या समस्यांपासून काही काळ दूर जाण्याचा पर्याय आहे. अशावेळी चांगला, नवीन सिनेमा ते OTT वर नक्की बघतील. पण त्याचा प्रेक्षक मर्यादित असेल. कारण आजही ग्रामीण, निमशहरी भागात अमेझॉन प्राइम, नेटफ्लिक्स, हॉटस्टार फारसं पाहिलं जात नाही. इंटरनेट स्पीड, लोड शेडिंग, लँग्वेज बॅरिअर अशा अनेक कारणानं हा प्रेक्षक वर्ग OTT प्लॅटफॉर्मपासून दूर आहे," असं उदगीरकर यांनी म्हटलं.

सबस्क्रिप्शन रेट वाढवणं परवडेल?

भारतात जवळपास 150 अब्ज रुपये ($2bn)एवढं मोठं स्ट्रिमिंग मार्केट आहे. हे मार्केट 10 कोटींवर सबस्क्रिप्शन असलेलं आहे, असं मीडिया पार्टनर्स एशिया या मीडिया कन्सल्टन्सीचं म्हणणं आहे.

स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मचं आर्थिक गणित हे सबस्क्रीप्शनवरच अवलंबून असतं. पण भारतासारख्या देशात सबस्क्रीप्शन रेट वाढवणं तितकं सोपं नाहीये. कारण भारत हे प्राइस सेन्सिटिव्ह मार्केट आहे. बरेचसे ग्राहक हे अधिक किंमत देऊन सबस्क्राईब करतील की नाही, याबद्दल अनेक ट्रेड अनॅलिस्टच्या मनात शंका आहेत.

गेल्या वर्षी जून महिन्यात ग्लोबल अकांउटिंग फर्म प्राइस वॉटरहाऊस कूपर्स इंडियानं एक सर्व्हे प्रसिद्ध केला होता. या सर्व्हेनुसार भारतात व्हीडिओ स्ट्रीमिंग इंडस्ट्री ही अतिशय वेगाने वाढेल आणि 2023 पर्यंत या उद्योगाची उलाढाल ही 11 हजार 977 कोटींची होईल. येत्या चार वर्षात एकूणच मीडिया आणि मनोरंजन इंडस्ट्रीची वाढ ही 11.28 टक्क्यांनी होईल आणि या क्षेत्राची आर्थिक उलाढाल ही 4 लाख 51 हजार 405 कोटींची होईल.

ट्रेड मॅगझिन कम्पलीट सिनेमाचे संपादक अतुल मोहन यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं, की स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मलाही वर्षभराचं बजेट ठरवून देण्यात आलेलं असतं. त्यामुळे डिजिटल प्लॅटफॉर्मसाठी चित्रपट विकताना त्याच्या किमती एकदम अचानक वाढणार नाहीत. त्याऐवजी स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म विकत घ्यायच्या चित्रपटांचं प्रमाण कमी करतील.

ओटीटीबाबत केंद्राची नियमावली?

ओटीटी प्लॅटफॉर्मची वाढती लोकप्रियता आणि यावर कोणाचाही अंकूश नसल्याने. यावर सरकारचं नियंत्रण हवं अशी मागणी जोर धरू लागली.

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने 2021 मध्ये ओटीटीबाबत नवीन नियमावली लागू केली.

सोशल मीडिया तसंच डिजिटल प्लॅटफॉर्मवरील कंटेंटवर कुणाचंच नियंत्रण नाही. याबाबत अनेक तक्रारी येत असल्याने यावर नियमावली लागू करत असल्याचं केंद्रीय मंत्र्यांनी सांगितलं. केंद्राच्या या नियमावलीबाबत अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती.

याबाबत बोलताना माजी केंद्रीय मंत्री प्रकारश जावडेकर म्हणाले होते, "OTT संदर्भात अनेकांच्या तक्रारी येत आहेत. OTT कंपन्यांना 100 दिवसांची मुदत देऊनही त्यांनी नियम बनवले नाहीत." त्यामुळे आम्हीच OTT प्लॅटफॉर्मसाठी तीन स्तरीय नियम बनवले आहे. OTT प्लॅटफॉर्म्सनी आता सर्व माहिती सरकारला द्यावी.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)