You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
भावना मेनन : पाच वर्षांपूर्वी अपहरण, लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या अभिनेत्रीनं अखेर सोडलं मौन...
- Author, गीता पांडे
- Role, बीबीसी न्यूज, दिल्ली
- Published
- वाचन वेळ: 4 मिनिटे
मल्याळम चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री भावना मेननचं 2017 साली अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला होता. या घटनेला पाच वर्षं उलटल्यानंतर तिने या संदर्भातील मौन सोडलं आहे.
"पीडित स्त्री इथपासून ते अत्याचारावर मात केलेली स्त्री, इथवरचा प्रवास अवघड होता," असं ती म्हणते.
भावना मेननने दक्षिण भारतीय भाषांमध्ये ऐंशीहून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे आणि तिला अनेक प्रतिष्ठित पुरस्कारही मिळालेले आहेत. फेब्रुवारी 2017 मध्ये थिसूरहून कोचीकडे जात असताना पुकाहीजणांनी तिच्यावर सामूहिक अत्याचार केला होता.
मल्याळम चित्रपटसृष्टीतील सर्वांत बड्या अभिनेत्यांपैकी एक, आणि अर्धा डझन चित्रपटांमध्ये भावनाचा सहकलाकार राहिलेला दिलीप याचं नाव या घटनेतील एक आरोपी म्हणून समोर आलं आणि गुन्हेगारी कारस्थानाचाही आरोप त्याच्यावर लावण्यात आला. त्यानंतर ही बातमी आणखी मोठ्या प्रमाणात चर्चिली जाऊ लागली. दिलीपने त्याच्यावरील आरोप नाकारले, पण त्याला अटक होऊन तीन महिन्यांच्या कोठडीत ठेवण्यात आले. त्यानंतर त्याची जामिनावर सुटका झाली. सध्या या खटल्यावर न्यायालयात सुनावणी सुरू आहे.
"मी एक सर्वसाधारण, मौजमजा करणारी मुलगी होते. पण या घटनेने माझं आयुष्य उलटंपालटं करून टाकलं. मी समाजमाध्यमांवर हसऱ्या चेहऱ्याचे फोटो टाकते, तेवढंच बहुतांश लोकांना दिसतं. पण मी अत्यंत भयंकर परिस्थितीला सामोरं जाऊन परत इथे आलेय," बंगळुरूवरून माझ्याशी फोनवर बोलताना भावना म्हणाली.
"मी एक अत्याचार झालेली अभिनेत्री ठरले होते, पीडिता ठरले होते. हे माझ्याचसोबत का घडलं, असा प्रश्न मी स्वतःला बराच काळ विचारत राहिले. मी स्वतःला खूप दोषही दिला. पण त्यातून बाहेर पडण्याचा मार्गही मी शोधत होते," असं भावना म्हणते.
"या प्रकरणी 2020 साली सुनावणी सुरू झाली, न्यायालयात पुरावा सादर करण्यासाठी मी 15 दिवस घालवले. त्या वेळी गोष्टी बदलत गेल्या. मला ती घटना विसरून पुढे जायचं होतं, पण मला त्या प्रकरणातला प्रत्येक लहानसहान तपशीलही आठवून सांगावा लागला."
अत्याचार झाला त्या दिवशी मेनन तिचं घर असणाऱ्या थिसूरहून कोचीला जात होती. कोचीमध्ये दुसऱ्या दिवशी सकाळी एका चित्रपटासाठी तिला डबिंग करायचं होतं. पण वाटेत तिचं अपहरण झालं. हल्लेखोरांनी तिच्यावरील अत्याचाराचे व्हीडिओही तयार केले.
"त्यांना बहुधा मला ब्लॅकमेल करायचं होतं," ती मला म्हणाली.
भावना आणि आरोपी दिलीप दोघेही प्रसिद्धीच्या झोतात असल्यामुळे या खटल्याकडे प्रसिद्धीमाध्यमांनीही पुरेपूर लक्ष केंद्रित केलं. अचानक कोणत्याही दिवशी स्थानिक वृत्तवाहिन्यांवर भावनाच्या बाजूने व तिच्या विरोधात बोलण्यासाठी लोक बोलावले जात आणि त्यांची चर्चा जुंपत असे.
हे माझ्यासाठी प्रचंड वेदनादायी होतं
अनेकांनी समाजमाध्यमांवरून पीडितेलाच नावं ठेवायला सुरुवात केली. ती संध्याकाळी सात वाजता प्रवास का करत होती, असे प्रश्न विचारले गेले. तिच्या नैतिकतेवर प्रश्नचिन्ह उमटवण्यात आलं, काहींनी तिला शिवीगाळ केली, हे सगळं प्रकरण बनावट आहे आणि भावनानेच हे 'नाट्य रचलंय' असेही आरोप करण्यात आले.
"मी उद्ध्वस्त झाले होते, स्वतःचे लाखो तुकडे झाल्यासारखं वाटत होतं. ते सगळंच माझ्यासाठी प्रचंड वेदनादायी होतं. काही वेळा मला अगदी आतून किंकाळी फोडावी असं वाटायचं," असं भावनाने 'मोजो स्टोरी' या डिजीटल मंचाला मुलाखत देताना सांगितलं. "माझी प्रतिष्ठा हिरावून घेण्यात आली होती आणि पीडिता म्हणून उलट मलाच नावं ठेवली जात होती."
भारतीय कायद्यानुसार लैंगिक अत्याचार झालेल्या व्यक्तीची ओळख कोणत्याही परिस्थितीत उघड करायची नसते, पण आपल्या बाबतीत मात्र सुरुवातीपासूनच हल्ला कोणावर झालाय हे सर्वांना माहीत झालं होतं, असं भावना म्हणते.
"मी प्रस्थापित अभिनेत्री होते आणि सुरुवातीच्या बातम्यांमध्ये केवळ माझं अपहरण झाल्याचंच सांगितलं जात होतं, त्यामुळे काही वृत्तवाहिन्यांनी माझे फोटो दाखवले. नंतर लैंगिक अत्याचाराचा तपशील समोर आल्यावर त्यांनी माझं नाव आणि फोटो काढून टाकले. पण तोवर सर्वांना या घटनेमधील पीडित मीच असल्याचं कळलं होतं."
पाच वर्षांपूर्वी भावना या 'दुःस्वप्ना'ला सामोरी गेली, त्यानंतर पहिल्यांदाच, जानेवारी 2022 मध्ये तिने इन्स्ट्राग्रामवर पोस्ट लिहून या अत्याचावर मात करून आपण पुढे आल्याचं, म्हणजे 'सर्व्हायव्हर' असल्याचं मान्य केलं.
"हा प्रवास सोपा नव्हता. पीडित (व्हिक्टिम) स्त्री मानलं जाण्यापासून एक 'सर्व्हायव्हर' म्हणून परिस्थितीवर मात करण्यापर्यंतचा हा प्रवास होता. पाच वर्षं माझं नाव आणि माझी ओळख माझ्यावरच्या अत्याचाराखाली दडपली गेली होती," असं ती म्हणाली.
भावनाची पोस्ट मल्याळम चित्रपटसृष्टीमधील मोहनलाल व मामुट्टी यांच्यासह अनेक मोठ्या अभिनेत्यांनी व अभिनेत्र्यांनी शेअर केली. हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक अभिनेत्र्यांनीही तिला समर्थन दिलं.
'द न्यूज मिनिट' या संकेतस्थळाच्या मुख्य संपादक धन्या राजेंद्रन म्हणतात, भावनाने या संदर्भात मोकळेपणाने बोलण्याचा निर्णय घेऊन "अत्यंत धाडसी" पाऊल उचललं, पण हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे तिने पुरेशी सावधगिरीही बाळगली आहे.
"शारीरिक अत्याचाराचा मुद्दा आहेच, पण ती एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व असल्यामुळे तिला प्रचंड सार्वजनिक सत्वपरीक्षेला सामोरं जावं लागतं. शिवाय समाजातून आणि चित्रपटउद्योगातून प्रतिक्रिया दिल्या जातात. न्यायालयात खटला सुरूच आहे. शिवाय या अत्याचाराचा व्हीडिओही करण्यात आलेला असल्यामुळे तो कधीही प्रसिद्ध केला जाण्याची भीती कायमच असते."
आपण प्रसिद्ध व्यक्तिमत्व असल्यामुळे विशेषाधिकारी स्थानी आहोत, याची जाणीव आपल्याला कायमच होती, असं भावना सांगते.
तिला तिच्या नवऱ्याचा आणि कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा आहे. हा खटला लढण्यासाठीची आर्थिक ताकदही तिच्यामध्ये आहे. पण तरीही गेल्या पाच वर्षांचा काळ सोपा नव्हता, असं ती म्हणते.
"किमान शंभर वेळा तरी मला हे प्रकरण सोडून द्यावं असं वाटलं असेल. तक्रार वगैरे मागे घेऊन मी काळ मागे नेऊ शकते का, असं मी माझ्या मित्रपरिवाराला, कुटुंबियांना आणि अगदी माझ्या वकिलांनाही अनेक वेळा विचारलं. देश सोडून दुसऱ्या कुठेतरी जावं आणि नव्याने सुरुवात करावी, असंही विचार मी केला होता. स्वतःचा जीव घ्यायचाही विचार मी अनेकदा केला."
अशा परिस्थितीत तिला कशातून उमेद मिळत होती, असं मी विचारलं.
"हताश वाटलं तरी प्रत्येक वेळी, 24 तासांनी माझे विचार बदललेले असायचे. कारण, इथे माझी प्रतिष्ठा पणाला लागलेली होती, मला स्वतःचा निरपराधपणा सिद्ध करायला हवा, मी काहीही चुकीचं केलेलं नाही हे मला सिद्ध करायचं आहे."
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)