'देवेंद्र फडणवीसांना केंद्रात मंत्री केलं जात नाही, तोपर्यंत भाजपचा महाराष्ट्रामध्ये सत्तेवर येण्याचा प्रयत्न चालू राहील'

योगी आदित्यनाथ, नाथ संप्रदाय, गोरक्षधाम, भाजप, युवा हिंदू वाहिनी, उत्तर प्रदेश

फोटो स्रोत, Getty Images

Published
वाचन वेळ: 8 मिनिटे

पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीत भाजपला चार आणि आम आदमी पक्षाला एका राज्यात सत्ता मिळवता आली. उत्तर प्रदेश आणि पंजाबच्या निवडणुकीची विशेष चर्चा झाली. यूपीत योगींनी सत्ता राखली, तर पंजाबमध्ये अरविंद केजरीवालांच्या 'आप'नं सत्तांतर घडवून आणलं.

या पाचही राज्यांच्या निकालाचे अर्थ काय आणि आगामी काळात या निकालाचे देशातल्या राजकारणवार, तसंच महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होतील, या प्रश्नांची उत्तरं बीबीसी मराठीचे संपादक आशिष दीक्षित यांनी ज्येष्ठ राजकीय विश्लेषक सुहास पळशीकर यांच्याशी झूम अॅपवर चर्चा करून जाणून घेतली. त्याची लिंक येथे देत आहोत. या लिंकवर तुम्ही मुलाखत पाहू शकता.

Facebook पोस्टवरून पुढे जा

मजकूर उपलब्ध नाही

Facebookवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

Facebook पोस्ट समाप्त

प्रश्न - उत्तरप्रदेशमध्ये मिळालेलं हे यश मोदींचं यश आहे की योगी आदित्यनाथ यांचं? भाजपला या चार राज्यांमध्ये जे यश मिळालं, त्याची कारणं काय असू शकतात?

सुहास पळशीकर - चार राज्यांमध्ये यश मिळालं त्याची प्रत्येक ठिकाणची कारणं वेगळी आहेत. गोव्याचंच उदाहरण द्यायचं झालं तर इथं जे नवे पक्ष आले जसं की तृणमूल काँग्रेस आणि आप, या सगळ्यामुळे तिथे मत विभागली गेली. आणि त्यामुळे या पाच राज्यांमध्ये राज्यांपैकी गोवा हे असं एकच राज्य आहे की जिथे खऱ्या अर्थाने आपण म्हणू मल्टी पार्टी अशा स्वरूपाची स्पर्धा झाली.

थोडक्यात बहुपक्षीय स्पर्धा झाली. मणिपूरमध्ये काही प्रमाणात बहुपक्षीय स्पर्धा होती. तिथे मोठे तीन गट होते अस आपण म्हणू. त्यामुळे राज्यनिहाय कारणं असू शकतात. पण ही एका अर्थाने पळवाट झाली.

राज्यनिहाय कारणं आपण जेव्हा शोधायला लागतो, तेव्हा एका वाक्यात सांगायचं झालं तर, गेल्या सात आठ वर्षांमध्ये आपल्या समाजाची जी एकूण राजकारणाकडे बघण्याची आणि राजकारणाला समजून घेण्याची दृष्टी आहे किंवा ज्याला आपण तांत्रिक परिभाषेमध्ये राजकीय संस्कृती म्हणतो. ही राजकीय संस्कृती मोठ्या प्रमाणावर बदलल्यामुळे भारतीय जनता पक्षाला यश आलं. म्हणजे पक्षाची अनेक अपयशच झाकली जातात. अनेक कच्चे दुवे झाकले जातात. हे शक्य झालेलं आहे हे उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत दिसत.

प्रश्न - उत्तर प्रदेशमधील जनेतेनं योगींना की मोदींना बघून मतदान केलं?

सुहास पळशीकर - योगींची एकूण कामाची पद्धत ही काहीशी जास्त आग्रही आहे. त्यांना कौतुकाने बुलडोझर बाबा असं जे म्हणतात ते त्यांच्या दोषाच प्रतीक आहे. ते एक बुलडोजर असल्यासारखे वागतात असं त्यांचे टीकाकार म्हणतील. आणि त्यामुळेच मोदी आणि योगी यांची जर तुलना करायची झाली तर इथे उत्तर प्रदेशातल्या मतदारांनी मोदींना पुढे ठेवून मतदान केलं असण्याची शक्यता सगळ्यात जास्त आहे.

मग यशाची जर वाटणी करायची झालीचं तर ते मोदींमुळे जास्त झालं असं मानावं लागेल. योगी आदित्यनाथ हे एका अर्थाने संपूर्ण वाहनाचं मागच एक छोट चाक म्हणून वावरताना दिसतात. त्यामुळे आदित्यनाथ यांच्या चुका खपून गेल्या, त्यांचे अतिरेक खपून गेले. कारण लोकांनी असा विचार केला की मोदी हे असं नेतृत्व आहे की ज्याच्यावर आपण विसंबून राहू शकतो."

प्रश्न - उत्तर प्रदेशमध्ये योगीं विषयी नाराजी होती. मात्र मोदींविषयी नाराजी नव्हती. अगदी खेड्यापाड्यातल्या शहरातल्या अनेक जातींच्या लोकांना मोदींबद्दल एक प्रकारे विश्वास वाटतो. हा विश्वास वाटण्यामगे मोदींना यश कसं काय आलं?

सुहास पळशीकर - स्वतःची प्रतिमा निर्मिती हे मोदींच्या राजकारणातल्या यशातलं एक महत्त्वाचं गमक आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता प्रतिमा निर्मिती होते याचा अर्थ असा नाही की हे सगळं खोटं असतं. पण सत्य असं आहे की, आहे त्याच्यापेक्षा जास्त प्रत्यक्षाहून मोठी प्रतिमा करायची हे कौशल्य आहे. आणि ते मोदींच्या राजकारणातलं वैशिष्ट्य आहे.

मोदींनी नेहमीच स्वतःला गटातटाच्या वर असल्याची प्रतिमा निर्माण केली. जातींच्या तटबंदी पेक्षाही मी वर आहे. मी फक्त देशाचा आणि राष्ट्राचा विचार करतो हे जे मोदी सांगतात ते टीकाकारांना पटत नाही. पण सामान्य माणूस हे ऐकतो तेव्हा मोदींवर विश्वास ठेवतो.

उदाहरणादाखल नोटबंदीवेळीही अशीच फसगत झाली होती. नोटबंदी ही एका अर्थाने फसली होती. मात्र लोकांपर्यंत असं गेलं की नोटबंदी काळा पैशाच्या विरोधात होती. मोदींच यात कोणताही हित नव्हतं. त्यामुळे मोदी यशस्वी झाले."

प्रश्न - मोदींनी कामापेक्षा जास्त प्रचार केला का?

सुहास पळशीकर - त्यांनी काम केलं नाही का? तर पाच वर्ष टिकणारं कुठलं सरकार अजिबात काहीच काम करत नाही असं होतच नाही. म्हणजे अगदीच लोकांना न आवडणार मनमोहन सिंगांच दुसऱ्या टर्ममधलं सरकार जरी तुम्ही घेतलं तरीही काम झालीच आहेत. पण दोन गोष्टी, त्या कामांमधील परिणाम क्षमता जी आहे ती काम लोकांपर्यंत जाणं परिणाम क्षमता मोदींच्या काळात वाढलेली असण्याची शक्यता नक्कीच जास्त आहे.

योगी आदित्यनाथ, नाथ संप्रदाय, गोरक्षधाम, भाजप, युवा हिंदू वाहिनी, उत्तर प्रदेश

फोटो स्रोत, Getty Images

याची आकडेवारी उपलब्ध नाही याचं कारण असं की, यावर अभ्यास झालेले नाही. उदाहरणार्थ मनरेगामध्ये पूर्वी किती लोकांना काम मिळत होतं आणि आता किती लोकांना मिळतं याची आकडेवारी उपलब्ध होईल. त्यावेळी आपल्याला याचा नीट अभ्यास करता येईल की मोदींनी नक्की काय केलं. पण इथं महत्वाचं आहे ते महत्वकांक्षी योजना आखणं आणि त्या योजना लोकांच्या घरापर्यंत पोहोचतील याची काळजी घेणं. आणि त्यामुळे मोदींमुळे हा विश्वास निर्माण झाला.

प्रश्न - यावेळी प्रचारात हिंदू मुस्लिम हा मुद्दा फारसा दिसला नाही. योगी आदित्यनाथांच्या किंवा मोदींच्या भाषणांमध्ये हिंदू मुस्लिम हा मुद्दा आला नाही. पण तो लोकांच्या बोलण्यात होता. तर आता हा मुद्दा भाजपच्या दृष्टीने तेवढा महत्त्वाचा उरलेला नाही का ? त्यांना त्याची गरज वाटत नाही? का आता त्याच्यापलीकडे गोष्टी सरकल्या आहेत?

सुहास पळशीकर - हिंदू मुस्लीम ही विभागणी आता बऱ्यापैकी पक्की झालेली आहे. आपला देश हिंदूंचा आहे, इथे मुसलमानांना अशाप्रकारे मोकळीक असता कामा नये, आपण हिंदू म्हणून राजकीय दृष्ट्या एकत्र होण्यामध्ये काही गैर नाही आता हे साध्य झालं आहे.

मोदी किंवा योगी यांनी त्यांच्या भाषणात हिंदू किंवा मुस्लिम यांचा उल्लेख फारच कमी केला. कारण इन्टेन्सिटी वॉर फेअर असतं तसं इन्टेन्सिटी प्रचार गेली पाच वर्ष सुरुच आहे. उत्तर प्रदेशात तर तो मोठ्या प्रमाणावर चालला होता. उत्तर प्रदेशात त्याला साठच्या दशकापासूनचा इतिहास आहे. त्याच सगळ्याचा फायदा घेत गेली पाच वर्ष लो इन्टेन्सिटी प्रचार सुरू होता आणि त्यामुळे निवडणुकीच्या वेळेला त्यामध्ये वेगळा गाजावाजा करण्याची गरज उरली नाही. आता ही विभागणी नको करायला असं वाटत नसून ती विभागणी व्यवहारातून, बोलण्यातून आपोआप होतच आहे. त्यामुळे यावेळी आपल्याला उत्तर प्रदेशात हिंदू मुस्लीम मुद्द्यांना हात घातल्याचं दिसला नाही.

प्रश्न - आदमी पार्टीला हिणवलं जायचं की ही दिल्ली पुरती पार्टी आहे आणि केजरीवाल महापौर आहेत. आणि आता त्यांना पंजाबसारख्या मध्यम आकाराच्या राज्यात सत्ता मिळाली आहे. त्यामुळे आता आम आदमी पार्टीला राष्ट्रीय राजकारणात पाहायला हवं का ?

सुहास पळशीकर - याची दोन उत्तर आहेत. पहिलं म्हणजे दिल्लीसारखं केंद्र सरकार जिथे बसलेलं आहे, तेच सरकार यांच्यात ताब्यात आहे. त्याला अधिकार असो नसो पण ते तिथे पुन्हा निवडून आलेले आहेत. आता पंजाबमध्ये आता इतर अनेक कारणांबरोबरच शीख आणि हिंदू असं पोलरायजेशन व्हायच्या दरम्यान असलेले हे राज्य आहे.

अशा राज्यांमध्ये आम आदमी पार्टीचे सरकार येणे या अर्थाने त्यांना गांभीर्याने घेण्याची वेळ आलेली आहे. आता दुसरं म्हणजे त्यांना गांभीर्याने घ्यायचे की नाही हे त्यांनीच ठरवायचं. ज्या पद्धतीने ते दिल्ली पुरते संकुचित राहिले, गेली काही वर्ष दिल्लीतली आरोग्य शिक्षण आणि वीज याच्या मध्ये ते गुंतून पडले.

हे जर पाहिलं तर आपल्याला दिसतं की, त्यांच्याजवळ राष्ट्रीय पातळीवर ऑपरेट होण्यासाठी लागणारी दृष्टी नव्हती. आता पंजाब मध्ये सरकार आल्यानंतर कदाचित त्यांना ती दृष्टी स्वीकारावी लागेल. आणि त्यांच्या समर्थकांकडून असं म्हंटलं जातं की पंजाब गुजरात या ठिकाणी आम्ही केव्हाच सुरुवात केली होती.

अरविंद केजरीवाल

फोटो स्रोत, Facebook

ते जर खरे असेल तर आता गुजरातचा नंबर लागेल. गुजरातमध्ये मागच्या काही वेळेला त्यांनी पूर्ण प्रयत्न केला होता. यावेळी कदाचित ते जास्त वेगाने प्रयत्न करतील. आणि जिथे भाजप मुळात सत्ताधारी पक्ष आहे आणि इतका की सत्ताधारी पक्ष साध्या लोकशाहीच्या न्यायाने कधीतरी जाणारचं. पण त्याला रिप्लेस करण्यासाठी तिथे फक्त काँग्रेस आहे आणि काँग्रेसची अशी परिस्थिती आहे की सगळ्या पक्षांनी जरी काँग्रेसला सपोर्ट केलं तरी तिथे निवडून येण्याची शक्यता नाही. अशा राज्यांमध्ये आपला हस्तक्षेप कसा करता येईल याची योजना जर आखली आणि तर आप तिथे मोठा पक्ष म्हणून जरी उदयाला आला तरी त्यांना 2024 च्या राष्ट्रीय राजकारणात गांभीर्याने पाहावं लागेल.

मग जेव्हा असं दिसून येईल की भाजपला पर्याय म्हणून कोणता राष्ट्रीय पक्ष टिकू शकत नाही. आणि आपला संधी मिळाली तर भारतीय जनता पक्षाला शह बसू शकतो.

प्रश्न - राहुल गांधी, प्रियंका गांधींसारखे नेते उत्तर प्रदेशमध्ये सपशेल फेल गेले, तर येणाऱ्या काळामध्ये कॉंग्रेसचे पुनरुज्जीवन होईल का?

सुहास पळशीकर - काँग्रेसची गंमत म्हणजे काँग्रेस संपत ही नाही आणि वाढतही नाही. अशी गेली दहा वर्ष परिस्थिती आहे. आणि त्याला कारणं अनेक आहेत. म्हणजे त्याचं सेक्युलॅरिझमशी काही संबंध नाही. त्यांचा नेतृत्व कौशल्याचा मुद्दा आहे. आणि ज्या पक्षाला मुळात नेतृत्वच नाही तो पक्ष उत्तुंग नेतृत्व असलेल्या पक्षाशी टक्कर कशी घेऊ शकेल?

त्यात आणि जिथं काँग्रेसची ताकद ऐंशी-नव्वदच्या दशकात संपली आहे त्या राज्यात म्हणजे उत्तर प्रदेश मध्ये ताकद खर्ची घालण्याचे कारण नव्हतं. त्यापेक्षा त्यांनी सत्ता असलेल्या पंजाब मध्ये गोव्यासारख्या छोट्या राज्यांमध्ये, मणिपूरमध्ये आपली ताकद लावली असती किंवा उत्तराखंड की जिथे त्यांना सत्ता मिळण्याची संधी उपलब्ध होती. अशा छोट्या युनिटमध्ये प्रयत्न करणं आणि आपले प्रयत्न, ताकद आपल्या कार्यकर्त्यांना देणं अशा गोष्टी काँग्रेसकडून अपेक्षित होत्या. अशा परिस्थितीमध्ये काँग्रेसचे पुनरुज्जीवन व्हायचं म्हणजे कसं व्हायचं.

प्रश्न - भाजपला उत्तर प्रदेशमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर यश मिळाल्यानंतर जे काही प्रादेशिक नेते होते जसं की ममता बॅनर्जी, केसीआर, स्टॅलिन एकत्र येण्याच्या प्रयत्नांना आता खीळ बसेल का?

सुहास पळशीकर - दोन धडे मिळतील. एक तर काहीही करून भाजपचा प्रतिकार केला पाहिजे. आणि दुसरा म्हणजे जसं समाजवादी पक्ष भाजपशी टक्कर देऊन, अत्यंत कडवा प्रचार करून ज्या पद्धतीने पुढे आलं त्या पद्धतीत यायला हवं. ममता बॅनर्जी, केसीआर यांना हा धडा मिळेल. प्रादेशिक पातळीवर सत्तेची जी अवकाश शिल्लक आहेत आणि त्यामुळे त्यांच्या प्रयत्नांना आता बळ येईल.

राहुल गांधी, स्टॅलिन

फोटो स्रोत, Twitter

पक्षांच्या युतीचे काही मार्ग असतात. त्यात एक मार्ग असतो तो निवडणूक पूर्व आघाड्या करणे. तो यांच्या बाबतीत शक्य नाही कारण प्रत्येक जण आपापल्या राज्यात अडकलाय. आणि दुसरा मार्ग जो तो असतो तो निवडणुकीनंतर सगळ्यांनी एकमेकांशी जमवून घेणे. आणि तिसरा 1989 साली व्ही पी सिंग यांच्या काळात तयार झालेला मार्ग म्हणजे, महासंघाच्या रूपात विरोधी पक्षांनी एकत्र येऊन आघाडी करायची. आणि सध्याची परिस्थिती बघता ममता बॅनर्जी केसीआर यांचा तो प्रयत्न चालू असल्याचे दिसतात."

प्रश्न - महाराष्ट्रात आता एक सरकार आहे जे कधीही पडेल. त्याच्या तारखा विरोधक देत असतात. तर भाजप तरी सांगत आहे की आम्ही कोणतेही प्रयत्न करीत नाही. मात्र पत्रकार म्हणून आम्हाला या गोष्टीची कल्पना आहे की नक्कीच विविध पातळ्यांवर सरकार पाडून आपले सरकार कसे येऊ शकेल यासाठी भाजप प्रयत्न करत आहे. गेल्या काही काळापासून त्या प्रयत्नांमधली आक्रमकता आजच्या निकालानंतर वाढू शकते का?

सुहास पळशीकर - जोपर्यंत देवेंद्र फडणवीस यांना केंद्रामध्ये मंत्री केलं जात नाही, तोपर्यंत हे स्पष्ट आहे की भाजपचा एक पक्ष म्हणून महाराष्ट्रामध्ये सत्तेवर येण्याचा प्रयत्न चालू राहील. आणि असं करण्यामध्ये काही गैरही नाही. कारण तुम्ही राजकीय पक्ष असाल तर तुम्हाला सतत सत्तेवर येण्यासाठी प्रयत्नशील राहावं लागतं.

भाजपकडे तशी जिद्द दिसते आणि जेव्हा तीन पक्ष सत्तेवर आलेले असतात तेव्हा सरकार पाडणं अशक्यही नाही. आणि असं करतच महाविकास आघाडीने दोन वर्ष काढली हेच मुळात वैशिष्ट्यपूर्ण ठरतं. कारण भाजपाला हे केव्हाच करता आलं असतं. त्यांच्याकडे असलेली ताकद लक्षात घेता आणि त्याच्यामध्ये रडीचा डाव खेळायची त्यांची तयारी आहे. तपास यंत्रणा वापरून ते त्यांच्या विरोधकांना ब्लॅकमेल करून पाठिंबा द्यायला भाग पाडू शकतात.

देवेंद्र फडणवीस

फोटो स्रोत, Getty Images

आर्थिकदृष्ट्या संपन्न असा हा पक्ष आहे. आणि त्यामुळे त्यांना हे सहज शक्य आहे. पक्षांतर बंदी कायद्याचा आधार घेऊन काही आमदार फोडणं त्यांना सहज शक्य आहे. मात्र ते आमदार निवडून येतील का नाही याची खात्री नाही.

त्यामुळे त्यांना कोणत्यातरी पक्षात मोठी दुफळी पाडावी लागेल. हे शक्य दिसत नाही. त्यांचा पहिला प्रयत्न असा दिसतो की या तीनमधला कोणतातरी एक पक्ष कंटाळून आपल्यासोबत येईल आणि तो एक पक्ष म्हणजे राष्ट्रवादीच असू शकतो. कारण शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये एकमेकांना इतकं दुखावलं गेलं आहे की त्यांची युती होणे शक्य नाही.

आणि त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पर्याय आहे म्हणून ते सर्वात जास्त दबाव राष्ट्रवादी काँग्रेसवर आणताना दिसून येत आहे. आणि ते नाही झालं तर कोणत्यातरी पक्षात दुफळी पाडणे जे कोणत्याही पक्षामध्ये पडणं इतकं सोपं नाही. कारण काँग्रेसमधल्या ज्यांना भाजपमध्ये जायचं होतं ते निवडणुकीआधीच गेलेले आहे. आता फारसे कोणी उरलेले नाही आणि त्यामुळे भारतीय जनता पक्षा पुढील पेच असा आहे की त्यांना इथे सत्ता तर हवी आहे, पण त्याचे मार्ग कसे खुले होतील हे त्यांना समजत नाहीये. म्हणून आंदोलनाच्या मार्गाने पक्षांना बदनाम करण्याच्या मार्गाने हे त्यांचे प्रयत्न चालू राहतील.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)