You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पाकिस्तान : पेशावरच्या मशिदीत स्फोट, 20 जणांचा मृत्यू
पाकिस्तानच्या पेशावर शहरातल्या किस्सा ख्वानी बाजार परिसरातल्या मशिदीत शुक्रवारी स्फोट झाला. या स्फोटात 20 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाल्याचं वृत्त आहे.
ख्वानी बाजार परिसरातल्या कुचा-ए-रिसालदार या भागातील जामा मशिदीत ही घटना घडली आहे.
या घटनेतील जखमींची संख्या खूप असून सध्या 15 रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
घटनास्थळी मदतकार्य सुरू आहे आणि स्थानिक अधिकाऱ्यांनी घटनास्थळी नियंत्रण मिळवलं आहे.
हा एक आत्मघातकी हल्ला असल्याचं एसएसपी ऑपरेशन्सच्या हारून रशीद यांनी जीयो न्यूजला सांगितलं आहे.
त्यांनी सांगितलं की, "हल्लेखोरानं आधी गेटवरील सुरक्षारक्षकांवर हल्ला केला. या हल्ल्यात एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झालाय."
अनेक जण जखमी
लेडी रीडिंग हॉस्पिटलचे प्रवक्ते सांगतात की, अनेक जखमींची तब्येत खालावली आहे.
अली हैदर नावाच्या प्रत्यक्षदर्शीनं माध्यमांना सांगितलं की, सर्वजण मशिदीत शुक्रवारच्या नमाजाची तयारी करत होते. तेव्हाच एक व्यक्ती बंदूक घेऊन आत आला आणि त्यानं गोळीबार सुरू केला. त्यानंतर त्यानं स्फोट घडवून आणला.
पाकिस्तानचे गृहमंत्री शेख राशीद अहमद यांनी ट्वीट करत हल्ल्याचा निषेध केला आहे.
त्यांनी ट्वीट केलंय की, "पेशावरमधील हल्ल्याचा मी निषेध करतो. या घटनेचा सविस्तर अहवाल खैबर पख्तूनख्वाचे मुख्य सचिव आणि आयडी यांच्याकडून मागवला आहे. घटनेत मृत्यू झालेल्या लोकांप्रती माझ्या सहवेदना आहे."
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)