मराठी आईची व्यथा: 'रशिया-युक्रेन युद्धात माझा एकुतला एक मुलगा अडकलाय'

फोटो स्रोत, NITIN NAGARKAR
- Author, राहुल गायकवाड
- Role, बीबीसी मराठीसाठी
- Published
- वाचन वेळ: 3 मिनिटे
''काल माझं त्याच्याशी बोलणं झालं होतं. माझा एकुलता एक मुलगा आहे. मला खूप भीती वाटतीये, जीव एकदम घाबरतोय माझा. त्याचं कसं होईल काय होईल काही कळत नाही.''
पुण्यातल्या शिरुर तालुक्यातील टाकळी हाजी गावातील सुशांत शितोळे युक्रेनमध्ये अडकलाय. विमानसेवा बंद झाल्याने त्याचे भारतात परतण्याचे मार्ग बंद झालेत.
युक्रेनवर रशियाने लष्करी कारवाई सुरु केल्याने आता सुशांतची आई वंदना शितोळे इकडे काळजीत पडली आहे. आपला मुलगा तिकडे परदेशात सुरक्षित असेल ना याची काळजी त्यांना वाटतेय.
शिरुरमधील अनेक विद्यार्थी हे युक्रेनमध्ये एसबीबीएसच्या शिक्षणासाठी गेले आहेत. याआधी देखील या भागातून विद्यार्थी युक्रेनमध्ये शिक्षण घेऊन आले आहेत. युक्रेनमध्ये एमबीबीएसचं शिक्षण चांगलं आहे. त्याचबरोबर भारताच्या तुलनेत कमी खर्च लागतो असं पालकांचं म्हणणं आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना तिकडे शिक्षणासाठी पाठवलं जातं.
शिरुर तालुक्यातील आठ विद्यार्थी सध्या युक्रेनमध्ये शिक्षणासाठी गेले आहेत. हे आठही विद्यार्थी युक्रेनमध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये अडकून पडले आहेत.
सध्या हे विद्यार्थी तात्पुरत्या व्हीसावर तेथे राहत आहेत. त्यांनी शिक्षणासाठीच्या व्हीसासाठी अर्ज दिला आहे. या विद्यार्थ्यांनी एक मार्चचे विमानाचे तिकीटही काढले होते. परंतु विमानसेवा बंद झाल्याने युक्रेनमधून बाहेर पडण्याचे त्यांचे मार्ग बंद झाले आहेत.
यातील बहुतांश मुलं ही शेतकरी कुटुंबातील आहे. थोडेथोडे पैसे जमवून त्यांच्या पालकांनी त्यांना शिक्षणासाठी परदेशात पाठवलं होतं.
डिसेंबरमध्येच हे विद्यार्थी युक्रेनला गेले होते. विद्यार्थी पालकांच्या संपर्कात आहेत. परंतु तिथली परिस्थिती सातत्याने बदलत असल्याने पालक आता चिंतेत आहेत.

फोटो स्रोत, NITIN NAGARKAR
विशाल उचाळे हा देखील एमबीबीएसचं शिक्षणासाठी युक्रेनमध्ये आहे. त्याचे आई वडील शेती करतात.
विशालची युक्रेनमधील परिस्थिती सांगताना त्याचे वडील विलास उचाळे म्हणाले, ''विशाल 7 डिसेंबरला एसबीबीएसचं शिक्षण घेण्यासाठी युक्रेनला गेला होता. युक्रेनमध्ये युद्धाची परिस्थिती निर्माण झाल्याने त्याने व त्याच्या मित्रांनी आठ दिवस पुरेल इतकं समान आणून ठेवलं आहे. त्याला हॉस्टेलमधून बाहेर पडू नका असं सांगण्यात आलंय.
''आम्ही जेव्हा त्याच्याशी बोललो तेव्हा तो राहत असलेल्या शहराच्या जवळ ब्लास्टचे आवाज आले होते असं तो सांगत होता. त्यांच्या शहरात लोक आता वस्तू खरेदी करण्यासाठी गर्दी करतायेत. भारतीय विद्यार्थ्यांना एका स्टोरमधून सामान घ्यायला अडवण्यात आलं. त्यांनी कसंबसं आठ दिवस पुरेल इतकं सामान घेऊन ठेवलंय. आमची मुलं लवकर परत यावीत असंच आम्हाला वाटतंय.''

फोटो स्रोत, NITIN NAGARKAR
विशालच्या आईलासुद्धा त्याची काळज वाटतेय. फोनवर तिचं बोलणं होतंय पण मुलगा एवढ्या लांब आहे त्यात तिकडे युद्धजन्य परिस्थिती असल्याने त्या घाबरुन गेल्यात. त्या म्हणाल्या, ''सकाळी बोलणं झालं माझं विशालसोबत. तेव्हा म्हणाला, काळजी करु नका पण काळजी वाटतेच ना. शिक्षणासाठी देशाबाहेर जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. अशी परिस्थिती झाल्याने भीती वाटतीये.''
आम्ही जेव्हा या विद्यार्थ्यांच्या घरी गेलो तेव्हा त्यांच्या पालकांनी विद्यार्थ्यांना व्हीडिओ कॉल केला. आम्ही देखील त्या विद्यार्थ्यांशी व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून संवाद साधला. सुशांतने आम्हाला तिकडच्या परिस्थितीची माहिती दिली.

फोटो स्रोत, Sushant shitole
सुशांत म्हणाला, ''काही मिनिटापूर्वी आम्हाला बॉम्बचे आवाज आले होते. इथून जवळच असलेल्या हॉस्टेलमध्ये आमचे काही मित्र राहतात. त्यांना लांब धूर दिसत असल्याचं त्यांनी सांगितलं. कॉलेजने आता लेक्चर ऑनलाईन केलेत. हॉस्टेच्या बाहेर पडू नका, युक्रेनमध्ये कुठे प्रवास करु नका असं आम्हाला भारतीय दुतावासाकडून सांगण्यात आलंय.''
''सकाळी लष्करी कारवाया सुरु झाल्यानंतर आम्ही आठवडाभर लागेल इतकं सामान घेऊन ठेवलं आहे. गरज पडल्यास मेट्रोच्या टनेलमध्ये जाण्यास आम्हाला सांगण्यात आलं आहे. भारतातले जवळजवळ 18 हजार विद्यार्थी युक्रेनमध्ये आहेत. तर 4 हजार विद्यार्थी हे खारकीव्हमध्ये आहेत. त्यातले हजार एक विद्यार्थी घरी परतले परंतु इतर विद्यार्थी इकडे अकडून पडले आहेत. सध्या आमचं घरच्यांशी बोलणं होतंय परंतु इंटरनेट बंद झालं तर आमचं घरच्यांशी देखील बोलणं होऊ शकणार नाही.'' असं देखील सुशांत म्हणाला.

हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)























