सयाजी शिंदे यांच्या सह्याद्री देवराई प्रकल्पाला आग, 500 झाडं जळून खाक, #5मोठ्याबातम्या

सयाजी शिंदे

फोटो स्रोत, SayajiShinde

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर आज प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी #पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा :

1. सयाजी शिंदेंच्या सह्याद्री देवराईला आग, 500 झाडं जळून खाक

अभिनेते सयाजी शिंदे यांच्या संकल्पनेतून बीडमध्ये साकारण्यात आलेल्या सह्याद्री देवराईला भीषण आग लागल्यानं येथील जवळपास 2 एकरवरची 500 झाडं जळून खाक झाली आहेत. महाराष्ट्र टाईम्सनं याबाबतचं वृत्त दिलं आहे.

याठिकाणी लागलेल्या आगीमध्ये वड, लिंबू, पिंपळ अशा विविध प्रकारची झाडं जळाली आहेत. पण या आगीबाबत संशय व्यक्त केला जात असून ही आग कोणीतरी मुद्दाम लावल्याचं म्हटलं जात आहे.

या प्रकल्पासाठी काम करमारे सामाजिक कार्यकर्ते, वृक्षप्रेमी यांनी या घटनेनंतर दुःख व्यक्त केलं आहे. तसंच यामागे जे कोणी असेल त्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

चार वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी 14 फेब्रुवारीला या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली होती. त्यानंतर याठिकाणी पर्यटन केंद्रासारखा विकास होत होता. जगातलं पहिलं वृक्ष संमेलनही इथं झालं होतं.

बीड जिल्ह्यातली नेहमीची दुष्काळी परिस्थिती पाहता, हा प्रश्न सुटावा आणि याठिकाणी पर्यटन केंद्र तयार व्हावं या उद्देशानं हा उपक्रम सयाजी शिंदे यांनी सुरू केला होता.

2. फडणवीसांच्या बंगल्यासमोर आंदोलनाचा पटोलेंचा इशारा, लाड म्हणाले-'येऊन तर दाखव'

पंतप्रधान मोदींनी केलेल्या काँग्रेस विरोधी वक्तव्याच्या विरोधात नाना पटोलेंनी आज फडणवीस यांच्या बंगल्यासमोर आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यावरून भाजप आमदार प्रसाद लाड यांनी त्यांचा एकेरी उल्लेख करत प्रत्युत्तर दिलं. टीव्ही 9 मराठीनं याबाबत उत्तर दिलं आहे.

काँग्रेसमुळं देशभर कोरोनाचा प्रसार झाल्याचं वक्तव्य मोदींनी केलं होतं. त्याविरोधात आक्रमक झालेल्या काँग्रेसकडून भाजप नेत्यांच्या घरासमोर आंदोलन केलं जात आहे. त्याअंतर्गत सोमवारी फडणवीस यांच्या सागर बंगल्यासमोर आंदोलनाचा इशारा पटोलेंनी दिला.

नाना पटोले

मात्र, मुंबई भाजप अध्यक्ष मंगलप्रभात लोढा तसंच भाजप आमदार प्रसाद लाड यांनी यावर पटोलेंना प्रत्युत्तर दिलं. लाड यांनी पटोलेंचा एकेरी उल्लेख करत त्यांना इशारा दिला आहे.

"नाना, तुझ्या आव्हानाला प्रतिआव्हान देतोय. उद्या सकाळी 10 वाजता येऊनच दाखव, नाही तुला उलटा प्रसाद दिला तर आम्ही पण भाजपवासी नाही. सागरवर तू ये, पाहतो तू कसा परत जातो," असं लाड यांनी ट्विट केलेल्या व्हीडिओत म्हटलं आहे.

तर मंगल प्रभात लोढा यांनी भाजप कार्यकर्त्यांना पटोलेंच्या स्वागतासाठी सज्ज राहण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळं फडणवीसांच्या बंगल्यासमोर भाजप आणि काँग्रेस कार्यकर्ते आमने-सामने येण्याची शक्यता आहे.

3.सत्ता नसल्यानं वैफल्य आल्यानेच फडणवीसांची सरकारवर टीका- आदित्य ठाकरे

देवेंद्र फडणवीस यांना सत्ता नसल्यामुळं वैफल्य आलं आहे. डोळे बंद करून फिरणाऱ्याला सरकार कसं दिसेल अशी टीका पर्यावरण मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केली आहे. लोकसत्तानं याबाबतचं वृत्त दिलं आहे.

आदित्य ठाकरे

फोटो स्रोत, Aaditya thackerey/ social media

आदित्य ठाकरे रविवारी चंद्रपूर दौऱ्यावर असताना फडणवीसांकडून महाविकास आघाडी सरकारवर होत असलेल्या टीकेबाबतच्या प्रश्नाला उत्तर देताना आदित्य ठाकरेंनी अशा शब्दांत हल्ला चढवला आहे.

राज्यात कुठंही सरकार दिसत नसल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. त्यावर आदित्य ठाकरेंनी त्यांना प्रत्युत्तर दिलं.

देवेंद्र फडणवीस यांना सातत्यानं आपलं सरकार परत येईल आणि मी पुन्हा मुख्यमंत्री होईन, असं वाटत असतं. ही त्यांची उद्विग्नता आहे, असंही आदित्य ठाकरे म्हणाले.

4. इस्रोचं या महिन्यातलं पहिलं सॅटेलाईट लाँच मिशन

इस्रोनं सोमवारी पोलार सॅटेलाइट लाँच व्हेईकल (PSLV-C52)मिशन सतीश धवन अंतराळ केंद्रातून लाँच केलं. इस्रोचं या वर्षातलं हे पहिलं मिशन आहे. सोमवारी सकाळी 5.59 ते लाँच करण्यात आलं.

इस्रोनं सोमवारी PSLV-C52 मिशन अंतर्गत 3 सॅटलाईट लाँच केल्याची माहिती दिली आहे. त्यात एक EOS-04 रडार इमॅजिंग असल्याचं सांगण्यात आलं आहे. आज तकने याचं वृत्त दिलं आहे.

या रडारच्या माध्यमातून कृषी, वनीकरण, वृक्षारोपण, मातीची आर्द्रता, जल विज्ञान आणि पूर, हवामान या संबंधीच्या परिस्थितीत हाय रेझोल्युशन असलले फोटो पाठवले जाणार आहेत.

इस्रोनं या लाँचमध्ये EOS-04 सह दोन लहान सॅटेलाईटही लाँच केले आहेत. ते सॅटेलाईट त्यांच्या कक्षेमध्ये पोहोचले असल्याची माहिती देण्यात आली आहे.

5.हिजाब वाद : कर्नाटकच्या उडपीमध्ये शाळा-महाविद्यालय परिसरात कलम 144 लागू

हिजाब प्रकरणामुळं निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकातील उडपी प्रशासनानं जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरात कलम 144 लागू केलं आहे. दिव्य मराठीनं याबाबतचं वृत्त दिलं आहे.

हिजाब

फोटो स्रोत, Getty Images

14 फेब्रुवारी ते 19 फेब्रुवारी या दरम्यान शाळा महाविद्यालयाच्या 200 मीटर परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. मोर्चे-आंदोलनं करण्यावरही बंदी असणार आहे.

सोमवारपासून शाळा पुन्हा सुरू होणार आहेत. त्यामुळं विद्यार्थ्यांनी पुन्हा निदर्शने करू नये या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून कलम 144 लागू करण्यात आलं आहे.

दरम्यान, हिजाब वादावर सुनावणी करताना कर्नाटक हायकोर्टानं गुरुवारी अंतिम आदेशापर्यंत धार्मिक चिन्हं वापरण्यास परवानगी नाकारली होती.

ISWOTY

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)