You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
IPL Auction 2022: जोफ्रा आर्चर एका सिझनसाठी उपलब्ध नसूनही मुंबई इंडियन्सची 8 कोटींची बोली
एका सिझनसाठी उपलब्ध नसूनही मुंबई इंडियन्सने जोफ्रा आर्चरवर 8 कोटींची बोली लावली आहे. इंडियन प्रीमिअर लीग लिलावाच्या दुसऱ्या दिवशी आपल्या डावपेचांनी अनेक मोठ्या खेळाडूंना खरेदी केल्याचं दिसून आलं.
इंग्लंडचा वेगवान गोलंदाज असलेल्या जोफ्रा आर्चरला 8 कोटी देऊन मुंबईने आपल्या संघात सहभागी करून घेतलं आहे.
इंग्लंडच्या लायम लिव्हिंगस्टोनसाठी पंजाब किंग्जने 11.5 कोटींची बोली लावत ताफ्यात समाविष्ट केलं.
पंजाब किंग्जनेच वेस्ट इंडिजच्या ओडियन स्मिथला 6 कोटी रुपये खर्चत संघात समाविष्ट केलं.
इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेच्या लिलावाचा आजचा दुसरा दिवस आहे. बेंगळुरूत लिलावाची प्रक्रिया सुरू आहे.
गुजरात टायटन्सने जयंत यादव, विजय शंकर आणि डॉमिनिक ड्रेक्स यांना संघात घेतलं.
कोलकाता नाईट रायडर्स संघाने अजिंक्य रहाणेला बेस प्राईजला अर्थात 1 कोटी रुपये देऊन संघात समाविष्ट केलं.
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरोन फिंच, भारताचा भरवशाचा मधल्या फळीतील खेळाडू चेतेश्वर पुजारा, सौरभ तिवारी, इंग्लंडचा कर्णधार आयोन मॉर्गन तसंच डेव्हिड मलान यांच्यासह ऑस्ट्रेलियाचा मार्नस लबूशेन यांना कोणत्याही संघाने विकत घेतलं नाही.
शनिवारी काय घडलं?
धडाकेबाज यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशन याच्याकरिता मुंबई इंडियन्सने 15 कोटी 25 लाखांची बोली लावली. लिलावाच्या पहिल्या दिवशी सर्वाधिक बोली इशानसाठी लागली.
मुंबईने रिटेन न केल्याने इशानचं नाव लिलावात होतं. इशानला संघात घेण्यासाठी अनेक संघ शर्यतीत होते मात्र मुंबईचा संघ इशानला घेण्यावर ठाम होता.
कोलकाता नाईट रायडर्स संघाने श्रेयस अय्यरसाठी 12.25 कोटी रुपयांची बोली लावत ताफ्यात घेतलं. कोलकाताला कर्णधाराची आवश्यकता होती.
चेन्नई सुपर किंग्सने अष्टपैलू खेळाडू दीपक चहरसाठी 14 कोटींची विक्रमी बोली लावली. तामिळनाडूचा फलंदाज शाहरुख खान याला पंजाब किंग्ज संघाने 9 कोटींना विकत घेतलं.
राहुल तेवतिया याला गुजरात टायटन्सकडून 9 कोटींची बोली मिळाली. राहुल त्रिपाठीला सनरायझर्स हैदराबादकडून 8 कोटी 50 लाखांची रक्कम मिळाली.
आवेश खानला लखनऊ संघाने 10 कोटींची बोली लावून विकत घेतलं.
'गब्बर' नावाने प्रसिद्ध शिखर धवनला पंजाब किंग्ज संघाने 8 कोटी 25 लाख रुपये खर्चून ताफ्यात समाविष्ट केलं.
अनेक वर्षानंतर डेव्हिड वॉर्नरचं दिल्ली संघात पुनरागमन झालं आहे. दिल्लीने 6.25 कोटी रुपये देत वॉर्नरला विकत घेतलं.
चेन्नईची साथ सोडून फाफ डू प्लेसिस आता रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूकडून खेळणार आहे. बेंगळुरूने डू प्लेसिससाठी 7 कोटी रुपये मोजले.
नवीन संघ लखनौ सुपरजायंट्सने क्विंटन डी कॉकसाठी 6.75 कोटी रुपये खर्चत बोहनी केली.
भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला गुजरात टायटन्स संघाने 6.25 कोटींची बोली लावून विकत घेतलं.
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सला कोलकाता नाईट रायडर्सने 7.25 कोटी रुपये खर्चून पुन्हा ताफ्यात समाविष्ट केलं. कमिन्सच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडविरुद्धची अॅशेस मालिका जिंकली होती.
दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाला पंजाब किंग्जने 9.25 कोटी रुपये देऊन संघात घेतलं.
राजस्थान रॉयल्सने 8 कोटी रुपयांची बोली लावत न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टला संघात सामील केलं.
मनीष पांडेसाठी लखनौने 4.6 कोटी रुपये मोजले. शिमोरन हेटमायरसाठी प्रचंड चुरस पाहायला मिळाली. राजस्थान रॉयल्सने हेटमायरला 8.5 कोटी रुपये देऊन घेतलं.
जेसन रॉयला गुजरात टायटन्सने 2 कोटी रुपयांनाच विकत घेतलं. देवदत्त पड्डीकलसाठी राजस्थानने 7.75 कोटी रुपये खर्चत संघात समाविष्ट केलं.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)