भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन मागे; विधिमंडळाच्या अधिकारात हस्तक्षेपाची भावना #5मोठ्या बातम्या

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्सवर प्रसिद्ध झालेल्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा

1. भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन मागे, राज्य सरकारची घोषणा

विधानसभेतल्या भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन मागे घेत असल्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची राजभवनात भेट घेतल्यानंतर विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी ही घोषणा केली आहे.

विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, उपसभापती नीलम गोऱ्हे आणि विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी राष्ट्रपतींची भेट घेतली.

सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय हा विधीमंडळाच्या अधिकारात हस्तक्षेप करणारा असल्याची भावना या तिघांनी राष्ट्रपतींकडे व्यक्त केल्याचं ई-सकाळने त्यांच्या बातमीत म्हटलंय.

पण नंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर राखत आपण हे निलंबन मागे घेत असल्याची घोषणा निंबाळकर यांनी पत्रकारांशी बोलताना केली.

2. गोव्याचा विकास झाला की कंत्राटदारांचा? आदित्य ठाकरेंचा सवाल

गोव्यात जगभरातून पर्यटक येतात पण स्थानिकांकडे दुर्लक्ष होतं, गोव्याचा विकास होताना पर्यावरणाची दुर्दशा झाल्याचं शिवसेना नेते आणि महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंनी म्हटलं.

गोव्यात सध्या निवडणुकीसाठीचा प्रचार भरात आहे. आदित्य ठाकरेंनी काल गोव्यात पहिली सभा घेतली.

'गोव्याची शान, धनुष्य बाण' अशी घोषणा आदित्य ठाकरेंनी दिलीय.

गेल्या 10 वर्षांत गोव्याचा विकास झाला की कंत्राटदाराचा असा सवाल विचारत आदित्य ठाकरेंनी भाजपवर टीका केली. गोव्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी शिवसेना रणांगणात उतरली असल्याचं त्यांनी म्हटलंय.

ABP माझाने ही बातमी दिली आहे.

3. अजित पवार म्हणतात, मास्क काढायची वेळ येईल तेव्हा पत्रकार परिषद घेऊन सांगू

राज्यात कोव्हिड रुग्णांची संख्या कमी होत असल्याने मास्क वापरण्यापासून सुटका होणार का याविषयी चर्चा होत आहेत. मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्कचा वापर थांबवण्याविषयी चर्चा झाल्याचं म्हटलं जात होतं.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याविषयी भाष्य केलंय.

अजित पवार म्हणाले, "मंत्रिमंडळात मास्कपासून मुक्ती मिळण्याबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. जोपर्यंत कोरोना जात नाही तोपर्यंत मास्क लावावाच लागेल असं मी या आधीही सांगितलेलं आहे. ज्यावेळी मास्क काढण्याची वेळ येईल तेव्हा आम्ही पत्रकार परिषद घेऊन सांगू, तोपर्यंत मास्क ठेवायचा म्हणजे ठेवायचा."

लोकसत्ताने ही बातमी दिली आहे.

4. सार्वजनिक निधीचा वापर स्वतःसाठी केला नाही - पत्रकार राणा अयुब

कोव्हिड 19च्या साथीच्या काळात सामाजिक कार्यासाठी देण्यात आलेल्या देणगीचा वापर खासगी कामांसाठी आपण केला नसल्याचं म्हणत पत्रकार राणा अयुब यांनी ED ने केलेले आरोप फेटाळले आहेत.

मनी लाँडरिंगचा आरोप ठेवत अंमलबजावणी संचालनालय - ईडीने राणा अयुब यांच्यावर 10 फेब्रुवारीला कारवाई केली होती. अयुब यांची 1.77 कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली आहे.

सोशल मीडियावर एक निवेदन प्रसिद्ध करत वॉशिंग्टन पोस्टच्या पत्रकार राणा अयुब यांनी हे आरोप फेटाळले आहेत.

मदत निधी म्हणून गोळा करण्यात आलेल्या देणगीचा कोणताही भाग खासगी खर्चासाठी वापरला नसल्याचं आपण ईडी आणि आयकर विभागाला दाखवून दिल्याचं राणा अयुब यांनी या निवेदनात म्हटलं आहे.

इंडियन एक्स्प्रेसनं ही बातमी प्रसिद्ध केली आहे.

5. वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत भारताला निर्भेळ यश, कर्णधार म्हणून पहिल्याच सीरिजमध्ये रोहित शर्माला यश

पूर्णवेळ कर्णधार म्हणून पहिल्यांदाच जबाबदारी निभावणाऱ्या रोहित शर्माच्या क्रिकेट संघाने वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत मोठं यश मिळवलंय.

टीम इंडियाने ही सीरिज 3-0 ने जिंकली. भारताने प्रथम फलंदाजी करताना 265 धावांची मजल मारली. श्रेयस अय्यरने 80 तर ऋषभ पंतने 56 धावांची खेळी केली. दीपक चहरने 38 तर वॉशिंग्टन सुंदरने 33 धावा केल्या. वेस्ट इंडिजतर्फे जेसन होल्डरने 4 विकेट्स घेतल्या.

प्रत्युत्तरादाखल खेळताना वेस्ट इंडिजचा डाव 169 धावांतच आटोपला. मोहम्मद सिराज आणि प्रसिध कृष्णा यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. श्रेयस अय्यरला मॅन ऑफ द मॅच तर प्रसिध कृष्णाला मॅन ऑफ द सीरिज पुरस्काराने गौरवण्यात आलं.

यापूर्वी भारताला एकदाही वेस्ट इंडिजविरुद्धच्या वन डे सीरिजमध्ये सगळे सामने जिंकता आले नव्हते. पण रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली खेळणाऱ्या टीमने हे यश मिळवलं.

त्यामुळे आता यानंतर होणाऱ्या टी-20 मालिकेमध्ये भारतीय संघ कशी कामगिरी करतो, याकडे सगळ्यांचं लक्ष असणार असल्याचं महाराष्ट्र टाईम्सने बातमीत म्हटलंय.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)