या आई-वडीलांना आपल्या मृत मुलाचे शुक्राणू पाहिजेत

फोटो स्रोत, Aleksandr Zubkov/Gettyimages
- Author, सुशिला सिंह
- Role, बीबीसी संवाददाता
- Published
- वाचन वेळ: 4 मिनिटे
दिल्ली हायकोर्टात एका दाम्पत्याने अनोखी याचिका दाखल केली आहे. न्यायालयानं सर गंगाराम रुग्णालयाला त्यांच्या मृत मुलाचे शुक्राणू त्यांना सुपूर्द करण्याचे निर्देश द्यावे अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे.
पण एका मृत आणि अविवाहित व्यक्तीचे शुक्राणू कसे द्यायचे असं गंगाराम रुग्णालयानं हायकोर्टात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे. त्यासाठी असिस्टेड रिप्रोडक्टिव अॅक्ट ( ART ACT), सरोगेसी बिल किंवा आयसीएमआरच्या दिशानिर्देशांमध्ये काहीही म्हटलेलं नाही.
रुग्णालयाकडून तीन फेब्रुवारीला प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आलं होतं. तर चार फेब्रुवारीला सुनावणी झाली होती.
प्रकरण नेमकं काय?
ज्यांचे शुक्राणू मागितले जात आहेत ते जून 2020 मध्ये या रुग्णालयात दाखल झाले होते, त्यांना कर्करोग झाला होता.
ते विवाहित नव्हते. किमोथेरपीच्या पूर्वी रुग्णाचे शुक्राणू संवर्धन करण्याचा सल्ला देण्यात आला होता, कारण उपचारादरम्यान रेडिएशनमुळं शरीरावर नकारात्मक प्रभाव होऊ शकतात. त्यामुळे वंध्यत्व येण्याची शक्यता होती. त्यानंतर त्यांचं वीर्य संवर्धित करण्यात आलं होतं. नंतर या रुग्णाला दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

फोटो स्रोत, Peter Dazeley/Gettyimages
सप्टेंबर 2020 मध्ये या रुग्णाचा मृत्यू झाला होता.
या रुग्णाच्या मृत्यूनंतर त्यांच्या आई-वडिलांनी सर गंगाराम रुग्णालयात संवर्धन करण्यात आलेले शुक्राणू त्यांना द्यावे अशी विनंती रुग्णालयाला केली होती. पण रुग्णालयानं त्याला नकार दिला होता. त्यानंतर हे प्रकरण कोर्टात पोहोचलं.
"'आमच्याकडे मृताची ही एकच निशाणी आहे. रुग्णालय मुलाचं वीर्य न देऊन आमच्या अधिकारांचं उल्लंघन करत असल्याचं याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे," असं वकील कुलदीप सिंह हे या प्रकरणी म्हणाले.
या याचिकेत असंही म्हटलं आहे की, याचिकाकर्त्यांना मृत मुलाचं वीर्य (सिमेन) मिळवून त्या माध्यमातून त्याचा वारसा पुढं न्यायचा आहे.
या प्रकरणी उच्च न्यायालयानं दिल्ली सरकार आणि सर गंगाराम रुग्णालयाला नोटीस बजावत उत्तर मागितलं होतं.

फोटो स्रोत, Jill Lehmann Photography/Gettyimages
"दिल्ली सरकारनं कोर्टाचा निर्णय मान्य असेल, असं म्हटलं होतं. पण सर गंगाराम रुग्णालयानं प्रतिज्ञापत्र दाखल करत सीमेन देणं शक्य नसल्याचं सांगितलं आहे," असं याबाबत वकील कुलदीप सिंह म्हणाले.
एका अविवाहित मृत व्यक्तीच्या सीमेनवर कायदेशीररित्या कुणाचा अधिकार आहे याबाबत ART रेग्युलेशन अॅक्ट 2021, आयसीएमआरचे दिशानिर्देश आणि सरोगेसी बिलमध्ये काहीही म्हटलं गेलेलं नाही, असं सर गंगाराम रुग्णालयाकडून असं सांगण्यात आलं आहे.
ART तंत्रज्ञानामध्ये आयव्हीएफ, इन्ट्रासायटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शन म्हणजे अंडाणूमध्ये शुक्राणूंमध्ये इंजेक्शन देऊन फलन करणं, शुक्राणू आणि ओवम (अंडाणू) यागद्वारे प्रयोगशाळेत भ्रूण तयार करणं आणि महिलेच्या शरीरात त्यांचं रोपण करणं किंवा सोडणं अशा प्रक्रियांचा समावेश आहे.
तर, सरोगसीमध्ये मुलं नसलेलं किंवा मुलं जन्माला घालण्यास सक्षम नसलेलं दामप्त्य हे एका दुसऱ्या महिलेची मदत घेतात त्या महिलेला सरोगेट मदर म्हटलं जातं. या सरोगेट मदर आयव्हीएफ तंत्राच्या मदतीनं मुलं जन्माला घालतात.
दिशानिर्देश काय आहेत?
भारतात ART क्लिनिक्सला दिलेल्या दिशानिर्देशांनुसार सीमेन बँक एखाद्या व्यक्ती किंवा दात्याचे वीर्य साठवतात. या सीमेनचा वापर त्यांच्या पत्नी किंवा दात्यानं सांगितलेल्या महिलेसाठी करता येऊ शकतो.

फोटो स्रोत, Getty Images
या साठवणुकीसाठी बँक फी घेत असते. जर वीर्यदाता जीवंत असताना त्यांनी ही फी जमा केली नाही, तर अशा परिस्थितीत बँकेला वीर्य नमुना नष्ट करण्याचा किंवा प्रमाणित संस्थांना देण्याचा अधिकार असतो.
जर वीर्यदात्याचा मृत्यू झालेला असेल तर त्यावर कायद्यानुसार वारसदार किंवा दात्याकडून नामंकित करण्यात आलेल्या व्यक्तीला अधिकार असतो. दात्याने कागदपत्रांमध्ये वीर्यनमुना देताना ज्याचं नाव लिहिलेलं असेल, त्यालाच ते मिळतं. पण हा व्यक्ती या वीर्याचा वापर त्याला पाहिजे त्या महिलेला देऊन करू शकत नाही. मृत्यूनंतर वीर्याचा कोणी दावेदार नसेल तर बँक ते नष्ट करू शकते किंवा संशोधनासाठी एखाद्या संस्थेला देऊ शकते.
हायकोर्टापर्यंत पोहोचलेलं हे प्रकरण हा एक भावनिक मुद्दा आहे. त्यात आई वडिलांनी स्वतःचा मुलगा गमावलेला आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या विकासामुळं जी दाम्पत्य आई-वडील बनू शकत नाहीत, किंवा एखाद्याला सिंगल पॅरेंट बनायचं असेल तर त्यांच्यासाठी ART कायदा किंवा सरोगसी कायद्यात तरतूद आहे.
ART च्या सेवा घेण्यासाठी महिला आणि पुरुषांसाठी वयाची मर्यादाही घालून देण्यात आलेली आहे. महिलांसाठी विवाहाचं कायदेशीर वय 18 वर्ष आणि पुरुषांचं 21 वर्षांपेक्षा अधिक असायला हवं आणि दोघांचं वय 55 वर्षांपेक्षा कमी असायला हवं.

फोटो स्रोत, ©fitopardo/Gettyimages
तर शुक्राणू देणाऱ्यांबाबतच्या कायद्यात असं म्हटलं आहे की, केवळ 21-55 वर्षे वय असलेल्या पुरुषांचंच वीर्य घेतलं जाऊ शकतं. तर 23-35 वयोगटातील महिलांचे अंडाणू घेता येऊ शकतात.
"या दाम्पत्यासाठी हा विषय उर्वरित आयुष्यासाठीच्या आशांशी संबंधित आहे. त्यांची नातवंड असती पण आता मुलगाच नाही तर ती अपेक्षाही राहिलेली नाही. अशा परिस्थीतत या दाम्पत्याला मृत मुलाचे वीर्य मिळाले आणि त्यांनी सरोगसी किंवा ART च्या मदतीनं पुढं जायचं ठरवलं तरी मुलाच्या जन्मानंतर त्याच्या पालन पोषणाचं काय? असं हाईकोर्टातील वकील सोनाली करवासरा म्हणाल्या.
या प्रकरणी वीर्य मिळाले तरी याचिकाकर्ते आई-वडील बनण्याच्या अवस्थेत असतील का? असं याबाबत सुप्रीम कोर्टाच्या वकील राधिका थापर म्हणाल्या.
"कोर्टानं वीर्य देण्याची परवानगी दिली तरी ते फार पुरोगामी पाऊल असेल. जर कोणात्या माध्यमातून याचिकाकर्त्यांनी वीर्य एखादं भ्रूण दत्तक घेऊन आजोबा आजी बनण्याऐवजी स्वतःच आई-वडील बनले तर, अशा परिस्थितीत भविष्यात त्याचं पालनपोषण कोण करेल हा मुद्दा असेल. कारण याठिकाणी याचिकाकर्त्यांचं वय हा मोठा मुद्दा ठरू शकतो. भारतीय समाजामध्ये 20 वर्षापर्यंतच्या मुलाच्या आर्थिक आणि त्याच्या सुरक्षेची जबाबदारी आई वडिलांचीच असते," असं त्या म्हणाल्या.
महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यामध्ये 2018 मध्ये असंच एक प्रकरण समोर आलं होतं. त्यात डॉक्टरांनी प्रथमेश पाटील यांचे वीर्य त्यांच्या आई राजश्री पाटील यांना दिलं होतं. त्यानंतर सरोगसीच्या माध्यमातून त्या जुळ्या मुलांच्या आजी बनल्या होत्या.
दरम्यान, दिल्ली हायकोर्टात या प्रकरणी पुढील सुनावणी 13 मे रोजी होईल.

हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)























