राजू शेट्टी-वाईनच्या मुद्द्यावरून शेतकऱ्यांची बदनामी थांबवा, कीर्तनाने समाज सुधारत नसतो #5मोठ्याबातम्या

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा...

1. वाईनच्या मुद्द्यावरून शेतकऱ्यांची बदनामी थांबवा, कीर्तनाने समाज सुधारत नसतो - राजू शेट्टी

जसं कीर्तनाने माणूस सुधारत नाही, किंवा लावणीने तो बिघडतही नाही, त्याचप्रमाणे किराणा दुकानात वाईन विक्रीची परवानगी दिल्यामुळे त्याचा खप वाढणारही नाही किंवा कमीही होणार नाही, त्यामुळे वाईन विक्रीवरून होत असलेली शेतकऱ्यांची बदनामी थांबवण्यात यावी, असं आवाहन शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी केलं आहे.

राज्य सरकारने किराणा दुकानात वाईन विक्रीची परवानगी देताना त्यामागे शेतकऱ्यांचं हित असल्याचा तर्क मांडला होता. यावरून विविध प्रकारच्या प्रतिक्रिया उमटत असल्याचं दिसत आहे.

दरम्यान, राजू शेट्टी यांनीही याबाबत मत मांडलं. काही लोक जाणीवपूर्वक वाईन विक्रीचा विषय चर्चेत आणत आहेत. मात्र या सर्वांमधून शेतकऱ्यांची नाहक बदनामी सुरू आहे. त्यामुळे हे सर्व वेळीच थांबवण्यात यावं, असं शेट्टी म्हणाले. ही बातमी टीव्ही 9 मराठीने दिली.

2. आपल्या वाहनावर गोळीबार झाल्याचा असदुद्दीन ओवैसी यांचा दावा

MIM पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी आपल्या वाहनावर गोळीबार करण्यात आल्याचा दावा केला आहे.

या घटनेत असदुद्दीन ओवैसी यांना कोणतीही दुखापत झाली नसून आपण सुखरूप असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

ओवैसी हे उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी मेरठ येथे गेले होते. तिथून नवी दिल्लीला परतत असताना छिजारसी टोलनाक्याजवळ ही घटना घडल्याचं त्यांनी सांगितलं.

आपल्या गाडीवर एकूण चार राऊंड फायर करण्यात आले. त्यामुळे गाडीही पंक्चर झाली. अखेर, दुसऱ्या एका व्यक्तीच्या मदतीने त्या ठिकाणाहून निघालो, अशी माहिती त्यांनी ट्विट करून सर्वांना दिली. ही बातमी एबीपी माझाने दिली आहे.

3. आई इटालियन, वडील भारतीय असल्याने राहुल गांधींना दोन भारत दिसतात - अनिल विज

राहुल गांधी यांची आई इटालियन आणि वडील भारतीय असल्यामुळे त्यांना दोन भारत दिसतात, अशा शब्दांत हरयाणाचे गृहमंत्री आणि भाजप नेते अनिल विज यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

राहुल गांधी यांनी दोन दिवसांपूर्वी संसदेत केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना विज यांनी वरील वक्तव्य केलं.

आता दोन भारत आहेत एक अतिशय श्रीमंतांचा भारत आणि दुसरा गरीबांचा. या दोन्ही भारतांच्या दरम्यानची दरी दिवसेंदिवस वाढत आहे, असं वक्तव्य करत काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी केलं होतं.

त्याच्यावर विज यांनी ट्वीट करून प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, "राहुल गांधींना एका भारतात दोन भारत दिसणे स्वाभाविक आहे. कारण ते दोन संस्कृतींमध्ये वाढलेले आहेत; त्यांच्या आई सोनिया गांधी इटालियन असून वडील राजीव गांधी हे भारतीय होते."

"राहुल गांधी हे इटली आणि भारताच्या संस्कृतीत वाढले. परिणामी त्यांच्या विचारांमध्ये नेहमीच संघर्ष होत असतो," असं विज यांनी म्हटलं. ही बातमी लोकसत्ताने दिली.

4. आपल्या वडिलांचं-काकांचं ऐकत नाहीत, ते तुमचं काय ऐकणार?

जे आपल्या वडिलांचं-काकांचं ऐकत नाहीत, ते तुमचं काय ऐकतील, अशा शब्दात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यावर टीका केली आहे.

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अनुपशहर येथे आयोजित प्रचारादरम्यान शाह बोलत होते.

ते म्हणाले, "माफिया उत्तर प्रदेशाबाहेर, तुरुंगात अथवा सपाच्या यादीत अशा तीन ठिकाणीच आढळून येईल."

"गेल्या पाच वर्षांत योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेश बदलण्याचं काम केलं आहे," असा दावा शाह यांनी यावेळी केला. ही बातमी लोकमतने दिली.

5. वानखेडेंची बदनामी झाल्यास परिणाम भोगायला तयार राहा - हायकोर्ट

वानखेडे यांच्याबाबत वारंवार वक्तव्ये करून तुम्ही त्यांची अप्रत्यक्षपणे बदनामीच करत आहात. याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने दिलेले निर्देश पाळले जात नसतील, तर परिणाम भोगायला तयार राहा, असा इशारा मुंबई उच्च न्यायालयाने नवाब मलिक यांना दिला आहे.

मलिक यांच्यासोबतच्या वादाबाबत ज्ञानदेव वानखेडे यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

न्या. शारुख काथवाला आणि न्या. मिलिंद जाधव यांच्यासमोर या प्रकरणी सुनावणी झाली. यामध्ये मलिक यांना बदनामीकारक विधाने न करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. हे थांबले नाही तर परिणाम भोगण्यास तयार राहा, असं न्यायालयाने म्हटलं. ही बातमी ई-सकाळने दिली.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)