You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
राहुल गांधी : नरेंद्र मोदी सरकारने दोन भारत बनवले; एक श्रीमंतांचा, एक गरीबांचा #5मोठ्याबातम्या
आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईट यांच्यावर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा..
1. नरेंद्र मोदी सरकारने दोन भारत बनवले; एक श्रीमंतांचा, एक पिचलेल्या गरीबांचा - राहुल गांधी
देशात दोन भारत तयार करण्याचं काम मोदी सरकारने केलं आहे. एक भारत असा आहे जो खूप श्रीमंत आहे, त्यांच्याकडे सत्ता आहे, त्यांना पाणी, वीज यासारख्या समस्या पडत नाहीत. तर दुसरा भारत पिचलेल्या गरीबांचा आहे, या दोन भारतामधील दरी वाढतच आहे, अशी टीका काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी केली.
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपतींच्या अभिभाषण धन्यवाद प्रस्तावावर ते बोलत होते.
राहुल गांधी यावेळी म्हणाले, "देशातल्या 55 कोटी लोकांकडे जेवढी संपत्ती आहे त्यापेक्षा जास्त संपत्ती ही अदानी आणि अंबानींकडे आहे, देशातील उद्योगांमध्ये एकाधिकारशाही तयार होऊन ते सर्व अदानी-अंबानींच्या हाती देण्याचं काम मोदी सरकारने केलं आहे."
ते पुढे म्हणाले, "रेल्वेच्या नोकरीसाठी बिहारमध्ये युवकांनी आंदोलन केलं. भारतातील युवक हे सरकारकडून रोजगार मागत आहेत पण सरकार त्यांना ते देण्यास सक्षम नाही. पण केंद्र सरकारने बेरोजगारांच्या मुद्द्यावर एकही शब्द काढला नाही."
"सन 2020 मध्ये देशातील तीन कोटी युवकांनी आपला रोजगार गमावला. गेल्या 50 वर्षातील ही आकडेवारी सर्वात मोठी आहे," असंही राहुल गांधी यांनी सांगितलं. ही बातमी एबीपी माझाने दिली.
2. मोदींमुळे कोरोना काळातही प्रत्येकाच्या घरात लक्ष्मी आली - अमित शाह
गेली दोन वर्षे देशावर कोरोनाचं संकट होतं. पण तरीही प्रत्येकाच्या घरात लक्ष्मी आली. प्रत्येक घराची आर्थिक परिस्थिती सुधारली, असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला आहे.
उत्तर प्रदेश निवडणुकीदरम्यान आयोजित प्रचारसभेत अमित शाह बोलत होते.
ते म्हणाले, बसपा आणि समाजवादी पक्ष गरिबांचा विकास कधीच करणार नाही. गॅस, शौचालय, वीज आणि घरे ही कामे मोदी सरकारच्याच काळात पूर्ण झाली, असंही शाह यांनी म्हटलं. ही बातमी ई-सकाळने दिली.
3. राणेंच्या बाबतीत सरकारने सूडबुद्धीने वागू नये - सुधीर मुनगंटीवार
छगन भुजबळांवर केलेल्या कारवाईचा सूड घेण्याच्या भावनेने जे कारवाईचं सत्र सुरू झालं, तसं राणेंचं होऊ नये, राणे यांच्या बाबतीत सरकारने सूडबुद्धीने वागू नये, अशी मागणी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.
या प्रकरणात दोन्ही बाजूंनी युक्तिवाद होईल, त्यामुळे सध्या तरी वेट अँड वॉच करावे. एखादी व्यक्ती दोषी सिद्ध करण्याइतका गंभीर दिसत असेल, तर त्याच्यावर जरूर कारवाई करावी, असंही मुनगंटीवार यांनी म्हटलं.
निरपराध माणसाच्या पाठीशी भाजप नेहमीच उभी राहते, मग तो पक्षाचा असो की नसो. न्यायालयावर आमचा पूर्ण विश्वास आहे, असंही मुनगंटीवार म्हणाले. ही बातमी टीव्ही 9 मराठीने दिली
4. वाईन विक्रीच्या निर्णयाला विरोध, नवाब मलिक यांची भाजपवर टीका
राज्यात सुपर मार्केट-किराणा दुकानात वाईन विक्रीला परवानगी देण्यात आल्यानंतर या निर्णयावरून वाद निर्माण झाला आहे.
या निर्णयाला विरोध करणाऱ्या विरोध पक्ष भाजपच्या भूमिकेवर राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
भाजपवर टीका करताना ते म्हणाले, भाजपच्या शिवराज सिंह चौहान सरकारने, गोवा, आणि हिमाचल प्रदेश सरकारने असाच निर्णय घेतला होता की नाही हे भाजपने सांगावं.
वाईनला विरोध करत असताना भाजप त्यांच्या नेत्यांचे दारू बनवण्याचे परवाने परत करणार का हा आमचा प्रश्न आहे."
तसंच भाजप नेत्यांनी आजपासून दारू पिणार नाही, अशी शपथ कधी घेणार, हे सांगावे, अशी टीकाही मलिक यांनी केली. ही बातमी लोकसत्ताने दिली.
5. U-19 क्रिकेट वर्ल्डकपमध्ये भारताचा अंतिम सामन्यात प्रवेश
19 वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भारतीय संघाने प्रवेश केला आहे. स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात भारताने तगड्या ऑस्ट्रेलियाचा 96 धावांनी पराभव करून भारताने अंतिम फेरी गाठली.
भारतीय कर्णधार यश धौल याचं शतक आणि उपकर्णधार शेख रशीदच्या अर्धशतकाच्या बळावर भारताने 50 षटकांत 290 धावा अशी मजबूत धावसंख्या उभी केली होती.
आपल्या शानदार शतकी खेळीत यशने 10 चौकार आणि एका षटकारासह 110 धावा केल्या. तर रशीदनेही 94 धावांची खेळी करत त्याला सुयोग्य साथ दिली.
भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन संघाला 194 पर्यंतच मजल मारता आली. त्यामुळे भारताने हा सामना सहजपणे 96 धावांनी जिंकला.
स्पर्धेचा अंतिम सामना शनिवारी (5 फेब्रुवारी) विजेतेपदासाठी भारत आणि इंग्लंड संघात होणार आहे. ही बातमी महाराष्ट्र टाईम्सने दिली.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)