You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
Budget 2022 : गेल्या 70 वर्षांत उभारलेलं विकून खाणं हेच मोदी सरकारचं धोरण - बाळासाहेब थोरात #5मोठ्याबातम्या
आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा...
1. गेल्या 70 वर्षांत उभारलेलं विकून खाणं हेच मोदी सरकारचं धोरण - बाळासाहेब थोरात
"यंदाच्या वर्षीच्या बजेटमधून मोदी सरकारने आपल्या नेहमीच्या पद्धतीने मोठमोठे आकडे फेकून भव्य-दिव्य स्वप्न दाखवली आहेत. गेल्या 70 वर्षांत उभारलेलं विकून खाणं हेच मोदी सरकारचं धोरण आहे", अशा शब्दांत महसूल मंत्री आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.
केंद्रीय अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना थोरात म्हणाले, "गुलाबी स्वप्नांशिवाय सर्वसामान्यांना काहीही मिळाले नाही. निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून अर्थसंकल्पाची मांडणी करण्यात आली आहे. पुन्हा एकदा डिजिटल स्वप्न दाखवून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला आहे."
सरकारी कंपन्या विकणे, टॅक्स आणि इंधनाचे दर वाढवणे, यापलिकडे केंद्र सरकारकडे दुसरं काही धोरण नाही. सरकारी पैशांतून व्यवस्था उभ्या करायच्या, पुन्हा त्या विकायच्या हेच मागील 7 वर्षांपासून सुरू आहे, अशी टीका थोरात यांनी केली. ही बातमी लोकमतने दिली.
2. RTE प्रवेश-प्रक्रिया 16 फेब्रुवारीपासून सुरू होणार - गायकवाड
शैक्षणिक वर्ष 2022-23 साठी RTE (राईट टू एज्यूकेशन) 25 टक्के प्रवेश प्रक्रियेचे अर्ज येत्या 16 फेब्रुवारीपासून भरता येतील, अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
पूर्वीच्या वेळापत्रकानुसार हे अर्ज 1 फेब्रुवारीपासून सुरू केले जाणार होते. पण काही तांत्रिक कारणामुळे ही प्रक्रिया 16 तारखेपासून सुरू होईल. नागरिकांनी या बदलाची नोंद घेऊन अर्ज दाखल करावेत, असं आवाहन गायकवाड यांनी केलं.
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 कलम 12(1) (सी) नुसार खाजगी विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेश स्तरावर 25 टक्के जागा वंचित व दुर्बल घटकातील मुले व मुलींसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे. ही बातमी टीव्ही 9 मराठीने दिली.
3. हे शिवरायांचं राज्य, इथं दंडुकशाही चालणार नाही - चित्रा वाघ
सध्या राज्यभरात दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑनलाईन घ्याव्यात की ऑफलाईन यावरून आंदोलन सुरू झालं आहे. दोन दिवसांपूर्वी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घरासमोर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीमार केला होता. या मुद्यावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.
विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमाराचा निषेध चित्रा वाघ यांनी केला. त्या म्हणाल्या, "तालिबानी सरकार विद्यार्थ्यांचा आवाज दाबू पाहतंय. हे शिवरायांचं राज्य, इथं दंडुकशाही चालणार नाही."
दरम्यान, परीक्षा ऑफलाईन होतील, असं सरकारने म्हटलं. पण अभ्यास ऑनलाईन झाल्यामुळे परीक्षाही ऑनलाईनच घेण्यात याव्यात, अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली. ही बातमी ई-सकाळने दिली.
4. बिल गेट्ससह पुनावाला यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका
मुलीचा मृत्यू कोरोना लसीच्या दुष्परिणामामुळे झाल्याचा आरोप करत एका व्यक्तीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून 1 हजार कोटींच्या नुकसानभरपाईचा दावा केला आहे.
विशेष म्हणजे, या याचिकेत केंद्र सरकार, राज्य सरकार, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय यांच्याबरोबरीने सिरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला आणि सिरमचे भागीदार बिल गेट्स यांनाही प्रतिवादी करण्यात आलं आहे.
दिलीप लुणावत असं याचिकाकर्त्यांचं नाव असून त्यांची मुलगी स्नेहल लुणावत नाशिक जिल्ह्यातील इगतपूरी येथील धामणगावच्या दंत महाविद्यालयात वरिष्ठ प्राध्यापक आणि डॉक्टर म्हणून कार्यरत होती. या मुलीचा लस घेतल्यानंतर मृत्यू झाल्याचं सांगत लुणावत यांनी वरील याचिका दाखल केली आहे. ही बातमी एबीपी माझाने दिली.
5. हिंदुस्तानी भाऊच्या सुटकेसाठी मुलांना एकत्रित जमण्याचं आवाहन, ऑडिओ क्लिप व्हायरल
ऑनलाईन परीक्षा घेण्यासाठी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करण्यासाठी विद्यार्थ्यांना चिथवल्याप्रकरणी हिंदुस्थानी भाऊ उर्फ विकास पाठक हा सध्या पोलिसांच्या कोठडीत आहे.
त्याच्या सुटकेसाठी मुलांना एकत्रित जमण्याचं आवाहन करण्यात येत आहे. संबंधित आवाहन करणारी एक ऑडिओ क्लिप अमान नावाच्या मुलाच्या नावे व्हायरल होत आहे. शक्य तितक्या लवकर संख्येने जमा व्हा, येताना बहुतांश मुलींना घेऊन या, जेणेकरून पोलीस मारणार नाही, अशा आशयाचं वक्तव्य या क्लिपमध्ये करण्यात आलं आहे. ही बातमी टीव्ही 9 मराठीने दिली.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)