किशन भरवाड : गुजरातमध्ये ‘सोशल मीडिया पोस्ट’ वरून हिंदू तरूणाची हत्या

गुजरात, सोशल मीडिया, हत्या

फोटो स्रोत, VIDEO GRAB

फोटो कॅप्शन, गुजरातमध्ये युवकाच्या हत्येने वातावरण संवेदनशील झालं आहे.
    • Author, अर्जुन परमार
    • Role, बीबीसी गुजराती प्रतिनिधी
  • Published
  • वाचन वेळ: 4 मिनिटे

सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट लिहिल्याबद्दल अहमदाबादच्या एका तरुणाची हत्या झालीय. हे प्रकरण सगळीकडे चर्चिलं जातंय.

25 जानेवारीला अहमदाबादच्या धंधुका तालुक्यात 27 वर्षीय तरुण किशन भारवाडच्या एका 'वादग्रस्त धार्मिक पोस्ट' वरून वाद झाला आणि या वादात त्याची गोळी मारून हत्या करण्यात आली.

याच भागात राहाणाऱ्या शब्बीर आणि इम्तियाज या दोन तरुणांवर या हत्येचा आरोप आहे.

या घटनेनंतर या भागातल्या हिंदुत्ववादी संघटना सतत आंदोलन करत आहेत.

गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी यांनी या हत्येप्रकरणी ट्वीट करताना म्हटलं की याचा तपास दहशतवादविरोधी पथकाकडे (एटीस) सोपवला आहे. ते पीडित कुटुंबाला भेटायलाही गेले होते. या प्रकरणी लवकरात लवकर न्याय मिळवून देण्याचं आश्वासनही त्यांनी पीडित कुटुंबाला दिलं आहे.

दोन्ही आरोपींना 28 जानेवारीला अटक करण्यात आली आहे. त्यावेळी या प्रकरणाचा तपास स्पेशल ऑपरेशन्स टीमकडे होता. या दोन्ही आरोपींना अटक केल्यानंतर पोलिसांनी अहमदाबादच्या जमालपूर भागातून मौलवी अयूबलाही अटक केली आहे. त्यांच्यावर शब्बीरला चिथावणी दिल्याचा आणि खूनासाठी बंदूक आणि गोळ्या पुरवण्याचा आरोप आहे.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

या प्रकरणी दिल्ली पोलीस आणि गुजरात एटीएसने दिल्लीतून चौथा आरोपी मौलवी कमर गनी अब्बास याला रविवारी अटक केली. बीबीसी गुजरातीशी बोलताना गुजरात एटीएसचे डीएसपी बीएस चावडा यांनी याला दुजोरा दिला.

त्यांनी सांगितलं की, मौलवी अब्बासची या प्रकरणी काय भूमिका आहे याची चौकशी अब्बासला गुजरातमध्ये आणून केली जाईल.

स्पेशल ऑपरेशन्स टीमचे पोलिस निरीक्षक बीबीवाला यांनी बीबीसी गुजरातीला सांगितलं की या खुनाप्रकरणी वापरलेली बंदूक आणि बाईक आरोपींनी सांगितलेल्या ठिकाणी सापडली आहे.

त्यांनी म्हटलं, "चौकशीदरम्यान कळलं की मौलाना अयूब, शब्बीर आणि इम्तियाज पाकिस्तानबद्दलच्या चिथावणीखोर भाषणांचे व्हीडिओ पाहायचे. याच व्हीडिओवरून अयूब त्यांना चिथावणी द्यायचे."

गुजरात, सोशल मीडिया, हत्या

फोटो स्रोत, SACHIN PITHHVA

फोटो कॅप्शन, किशन भरवाड

इंडियन एक्स्प्रेसच्या एका रिपोर्टनुसार मृत किशनचा चुलत भाऊ भौमिक भारवाडने सांगितलं आहे की किशनचा खून 15 दिवसांपूर्वी झाला. एका सोशल मीडिया पोस्टवरून हा खून झाला.

त्याच्या चुलत भावाने दावा केला की 'इतर धर्मांचे' काही लोक किशनच्या सोशल मीडिया पोस्टवरून नाराज होते. त्यांनी पोलिसात तक्रारही केली. भौमिक यांनी सांगितलं की किशनवर पोलिसांनी कारवाईही केली होती आणि त्याने आपल्या पोस्टसाठी माफीही मागितली.

किशनच्या आई-वडिलांचं म्हणणं काय?

मृत किशनचे वडील शिवभाई भारवाड यांनी बीबीसीशी बोलताना म्हटलं, "माझ्या मुलाला ज्यांनी मारलं ते लोक त्याच्या सोशल मीडिया पोस्टवरून नाराज होते. त्याला सतत धमक्या मिळत होत्या. 25 तारखेला त्याचा खून झाला. पोलिसांनी आम्हाला कडक कारवाई करण्याचं आश्वासन दिलं आहे."

स्थानिक माध्यमांशी बोलताना किशनच्या आईने म्हटलं, "आधी माझ्या मुलाला वाईट पद्धतीने मारहाण केली. त्यांनी याची माफी मागितली आणि मग फसवून त्याचा खून केला."

अशाच प्रकारचं वक्तव्य किशनच्या बहिणीने केलं आहे. त्या म्हणाल्या, "माझ्या भावाच्या पाठीवर गोळ्या झाडल्या. लोकांनी त्याला मारहाणही केली. आता आम्हाला भाऊ राहिला नाही. आम्ही काय करायचं?"

गुजरात, सोशल मीडिया, हत्या

फोटो स्रोत, SACHIN PITHHVA

फोटो कॅप्शन, गुजरातचे गृहमंत्री शोकसभेत सहभागी झाले होते.

स्पेशल ऑपरेशन्स टीमचे पोलीस निरीक्षक बीबीवाला यांनी या प्रकरणी काय पुढे काय तपास होतोय त्याबद्दल सांगितलं. "आरोपींना आता कोर्टात हजर केलं जाईल आणि 14 दिवसांच्या रिमांडमध्ये घेतलं जाईल."

अहमदाबाद ग्रामीणचे पोलीस अधीक्षक वीरेंद्र यादव यांनी म्हटलं की, "दोन्ही आरोपी मोटारसायकलवर आले आणि त्यांनी किशनवर हल्ला केला. शब्बीरच्या हातात बंदूक होती तर इम्तियाज बाईक चालवत होता. चौकशी दरम्यान कळलं की शब्बीर कट्टरतावादी आहे आणि त्याने दुसऱ्यांच्या सांगण्यावरून असं केलं."

ते पुढे म्हणाले, "किशनने आपल्या पोस्टमध्ये मोहम्मद पैगंबरांवरून अनेक वादग्रस्त गोष्टी लिहिल्या होत्या. त्याच्या विरोधात केस दाखल झाली होती ज्या प्रकरणी त्याला जामीन मिळाला होता. पोलिसात केस दाखल झाल्यानंतर त्याने माफी मागितली होती."

पोलिसांच्या म्हणण्यानुसार अयूबने शब्बीरला सांगितलं की धार्मिक भावनांबद्दल कोणाचीची माफी स्वीकारायची नाही.

या प्रकरणी मुंबईच्या एका मौलवीचा संबंध असल्याचंही म्हटलं जातंय पण त्याविषयी खुलासा करता येणार नाही असं पोलिसांनी म्हटलं.

विश्व हिंदू परिषदेचे प्रवक्ते हिंतेंद्र सिंह राजपूत यांनी बीबीसी गुजरातीशी बोलताना म्हटलं की ही हत्या 'मुस्लीम समाजाच्या आरोपींनी रचलेला कट' आहे.

बीबीसी गुजरातीशी बोलताना किशनचे वडील शिवभाई भारवाड यांनी म्हटलं की, "मला काहीही माहिती नाही. मला फक्त इतकंच माहितेय की माझ्या मुलाला मुसलमानांनी मारलं."

गुजरात, सोशल मीडिया, हत्या

फोटो स्रोत, SACHIN PITHHVA

फोटो कॅप्शन, मयत तरुणाला श्रद्धांजली वाहताना हर्ष सांघवी

माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांनुसार किशनचे चुलत भाऊ भौमिक भारवाड यांनी म्हटलं की त्यांच्या भावाने या पोस्टसाठी माफी मागितली होती आणि सोशल मीडियावर माफीचा व्हीडिओही पोस्ट केला होता.

गुजरात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सहा जानेवारीला किशनने फेसबुकवर एक पोस्ट केली होती ज्यामुळे धार्मिक भावना दुखावू शकत होत्या. नऊ जानेवारीला त्याच्या विरोधात तक्रार दाखल झाली आणि या प्रकरणी कायदेशीर कारवाई झाली. पण प्रतिवादी या कारवाईवर खूश नव्हते आणि त्यांनी किशनचा खून केला.

विश्व हिंदू परिषदेचे प्रवक्ते हितेंद्रभाई राजपूत यांनी म्हटलं की, "पीडित कुटुंबाप्रति सहवेदना व्यक्त करण्यासाठी संपूर्ण गुजरातमध्ये प्रार्थना सभा आयोजित केल्या जातील. सगळ्या आरोपींना अटक होत नाही आणि त्यांना कडक शिक्षा होत नाही तोवर आम्ही पीडित कुटुंबाला साथ देत राहू."

किशन भारवाडने काय पोस्ट केली होती हे समजू शकलं नाही कारण त्यांचं फेसबुक अकाऊंट ब्लॉक केलेलं आहे.

पाटणच्या घटनेलाही हिंदूत्ववादी संघटना महत्त्व देत आहेत. आपल्या आंदोलनात त्यांनी हाही मुद्दा उचलला आहे.

पाटणच्या राधनपुरमध्ये 28 जानेवारीला एका हिंदू तरुणीवर कथितरित्या मुस्लीम तरुणाने हल्ला केला होता. एकतर्फी प्रेमातून ही घटना घडली असा पीडित तरुणीच्या घरच्यांचा दावा आहे. याप्रकरणी आरोपीला अटक केली आहे.

पण पाटणचे पोलीस अधीक्षक अक्षयराज मकवाना यांनी म्हटलं की, "सोशल मीडियावर या घटनेला ज्यापद्धतीने रंगवलं जातंय, तसं नाहीये. हल्लेखोर आणि पीडित दोघं एकमेकांना अनेक वर्षांपासून ओळखत होते आणि हल्ला पैशांच्या वादावरून झाला. अशा परिस्थितीत अफवांना बळी पडता कामा नये."

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)