किरीट सोमय्यांचा खटाटोप बातमीसाठी, 'त्या' फोटोवरुन नवाब मलिकांची टीका #5मोठ्याबातम्या

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

आज सकाळी विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.

1. किरीट सोमय्या भाजपचे 'आयटम गर्ल', नवाब मलिकांचं वादग्रस्त विधान

भाजपचे माजी खासदार आणि नेते किरीट सोमय्या यांच्या मंत्रालयातील व्हायरल फोटोवरुन वाद सुरू आहे. सरकारने किरीट सोमय्या यांना नोटीस बजावली असून महाविकास आघाडीच्या नेत्यांकडूनही टीका केली जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी किरीट सोमय्या यांना बॉलिवूडमधील 'आयटम गर्ल'ची उपमा दिली आहे. टीव्ही 9 ने हे वृत्त दिलं आहे.

किरीट सोमय्या राजकारणात भाजपच्या 'आयटम गर्ल'प्रमाणे काम करत असल्याचं मलिक म्हणाले आहेत. बातमी कशी होईल यासाठी त्यांचा खटाटोप सुरू आहे असंही ते म्हणाले.

बॉलिवूडमध्ये एखादा सिनेमा चालवण्यासाठी 'आयटम गर्ल'ची गरज भासते. त्याप्रमाणे किरीट सोमय्या राजकीय क्षेत्रात भाजपच्या 'आयटम गर्ल'सारखं काम करत आहेत.

व्हायरल झालेल्या फोटोविषयी बोलताना किरीट सोमय्या म्हणाले, "ज्याने तो फोटो काढला, त्यांनी जाहीर करावं की, तो नगरविकास खात्यातला आहे. नगरविकास मंत्र्यांनी किंवा सचिवांनी सांगावं त्या फोटोबद्दल सांगावं."

2. उत्पल पर्रिकरांच्या मुद्यावरून शिवसेनेत दोन गट?

माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे पुत्र उत्पल पर्रिकर यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे.

गोवा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने पणजी मतदारसंघातून उमेदवारी नाकारल्याने त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. लोकसत्ताने हे वृत्त दिलं आहे.

तर दुसरीकडे पर्रिकर कुटुंबाने हिंदुत्ववादी म्हणून शिवसेनेशी संबंध जोडावा असं आवाहान शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. परंतु स्थानिक शिवसैनिकांनी याला विरोध दर्शवल्याचं शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं आहे.

उत्पल पर्रिकरांच्या पक्ष प्रवेशाच्या मुद्यावरून शिवसेनेत दोन मतप्रवाह असल्याचं दिसून येत आहे.

उत्पल पर्रिकर अपक्ष लढणार असतील तर सर्व पक्षांनी राजकीय मतभेद विसरून त्यांना समर्थन द्यावे असंही संजय राऊत म्हणाले होते.

मनोहर पर्रिकर यांच्या मुलाला तिकीट नाकारणे हा खूप मोठा अन्याय असल्याची टीका उदय सामंत यांनी केली आहे. पर्रिकर गोव्यामध्ये 40 तिकीटं वाटायचे. आता त्यांच्या मुलाला तिकीट नाकरणं हा अन्याय आहे असंही ते म्हणाले आहेत.

3. औरंगाबाद विमानतळाला संभाजी महाराजांचं नाव देण्याबद्दल काय म्हणाले उद्धव ठाकरे?

औरंगाबादमधील संत एकनाथ महाराज रंगमंदिर नाट्यगृहाच्या नूतनीकरणाचा लोकार्पण सोहळा पार पडला. या सोहळ्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑनलाईन उपस्थिती दर्शवली. यावेळी त्यांनी अनेक मुद्यांवर भाष्य केलं.

संपूर्ण भाषणात उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादचा उल्लेख संभाजी नगर असाच केला. औरंगाबादमधील विमानतळाला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला आहे अशीही माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

केंद्र लवकरच प्रस्ताव मंजूर करेल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. संभाजीनगर नामकरणाचा प्रश्न कायम असला तरी विमानतळाला संभाजी नगर नाव लवकरच दिलं जाईल आणि त्यामुळे लवकरच त्याचं बारसं करता येईल असंही ते म्हणाले.

संत एकनाथ महाराज नाट्यगृह मला तिथे येऊन पाहायचं आहे, अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली. तसंच या नुतणीकरणासाठी हातभार लागलेल्या सर्वांचे आभार त्यांनी यावेळी मानले.

4. भाजप-मनसे युती होणार? भाजपच्या बैठकीत काय ठरलं?

आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची नुकतीच एक महत्त्वाची बैठक पार पडली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांची चर्चा झाली.

या बैठकीत शिवसेनेविरुद्ध आक्रमक पवित्रा घ्यावा अशा सूचना देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीत दिल्याचे समजते. महाराष्ट्र टाईम्सने हे वृत्त दिलं आहे.

मनसे आणि भाजप युती होणार का? हा प्रश्न कायम असला तरी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला सोबत घेण्याची शक्यता आहे.

तसंच या बैठकीत मुंबई महापालिका निवडणूक भाजप आणि मनसे एकत्रित लढणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे अशीही माहिती मिळते आहे. मनसेसोबत युती करू नये या मुद्यावर भाजपच्या नेत्यांचं एकमत झाल्याचं समजते.

त्यामुळे स्वबळावर सत्ता आणण्यासाठी काम करा अशा सूचना देवेंद्र फडणवीस यांनी भाजप नेत्यांना दिल्या आहेत.

5. मुकेश अंबानींना मागे टाकत गौतम अदानी देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती

अदानी समुहाचे मालक गौतम अदामी हे मुकेश अंबानींना मागे टाकत भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. नुकत्याच जाहीर झालेल्या एका सर्वेक्षणात ही माहिती देण्यात आली आहे.

एबीपी माझाने हे वृत्त दिलं आहे.

गेल्या दोन दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात आलेल्या मंदीमुळे रिलायन्सच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाल्याचं दिसून येत आहे. परिणामी मुकेश अंबानी यांच्या कमाईवरही त्याचा फटका बसला आहे.

गौतम अदानी यांनी कमाईच्या बाबतीत मुकेश अंबानींना मागे टाकत ते भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. याशिवाय जगातील श्रीमंत व्यक्तींमध्येही अदानी 11 व्या क्रमांकावर पोहोचले असून अंबानी सध्या 12 व्या क्रमांकावर आहेत.

फोर्ब्सच्या रिअल-टाइम नेट वर्थ डाटानुसार, सध्या गौतम अदानी यांची संपत्ती 90 अब्ज डॉलर म्हणजेच 6.72 लाख कोटी रुपये इतकी असून मुकेश अंबानी यांची संपत्ती 89.8 अब्ज डॉलर म्हणजेच 6.71 लाख कोटी रुपये इतकी आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)