वर्ध्यात कारचा भीषण अपघात, भाजप आमदाराच्या मुलासह सात विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू #5मोठ्याबातम्या

फोटो स्रोत, NITESH RAUT
विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्स यांचा घेतलेला आढावा,
1. वर्ध्यात कारचा भीषण अपघात, भाजप आमदाराच्या मुलासह 7 जणांचा मृत्यू
वर्ध्यातील सेलसुरा येथे चारचाकी गाडीचा भीषण अपघात झाला आहे. यात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या सात विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे.
सावंगी येथील दत्ता मेघे वैद्यकीय महाविद्यालयात शिकणारे हे सर्व विद्यार्थी होते. परीक्षा संपल्यानंतर देवळीवरून वर्ध्याला येत असताना हा अपघात झाला.
एबीपी माझाने हे वृत्त दिलं आहे.
चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि गाडी सेलसुरा येथील नदीच्या पुलावरून खाली कोसळली. यात सात जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.
मृतांमध्ये भाजपचे आमदार विजय रहांगडाले यांचा मुलगा अविष्कार रहांगडाले यांचाही समावेश आहे.
2. 'राबडीदेवी ही काय शिवी आहे?' - देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र भाजप सोशल मीडियाचे प्रभारी जितेन गजारिया यांनी काही दिवसांपूर्वी रश्मी ठाकरे यांना 'महाराष्ट्राच्या राबडीदेवी' असं संबोधलं होतं. यावरून मोठा वाद झाला होता.
माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
जितेन गजारिया यांना या ट्वीट प्रकरणी सायबर पोलिसांनी समन्स बजावलं होतं. बीकेसी पोलीस ठाण्यात त्यांना जबाब नोंदवण्यासाठीही बोलवण्यात आलं होतं.
लोकसत्ताने हे वृत्त दिलं आहे.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजप सीबीआय, ईडी या केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करत असल्याचा आरोप केला होता. याला प्रत्युत्तर देताना फडणवीस म्हणाले, "चोऱ्या कराल तर ईडी सीबीआय कारवाई करणारच. तुम्ही तर आम्ही साधं ट्वीट केलं तरी जेलमध्ये टाकत आहात. राबडीदेवी ही काय शिवी आहे का?"
"पण सौभाग्यवतींना राबडीदेवी म्हटलं म्हणून पुण्याचे 25 पोलीस रात्री आमच्या कार्यकर्त्याच्या घरी जात आहेत. आम्ही त्याचं समर्थन केलं नाही. त्यामुळे हा रडीचा डाव आहे,"असंही ते म्हणाले.
3. किरीट सोमय्या यांचा 'हा' फोटो व्हायरल का होतोय?
भाजपचे माजी खासदार आणि नेते किरीट सोमय्या यांचा मंत्रालयातील एक फोटो नुकताच व्हायरल झाला आहे. किरीट सोमय्या मंत्रालयातील एका अधिकाऱ्याच्या खुर्चीवर बसल्याचं या फोटोत दिसून येतं.

फोटो स्रोत, Social media
हा फोटो नेमका कधीचा आहे हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. फोटोमध्ये दिसत असल्याप्रमाणे सोमय्या यांच्या आजूबाजूला फायलींचा ढिगारा आहे. झी 24 तासने हे वृत्त दिलं आहे.
किरीट सोमय्या अनेकदा माहितीच्या अधिकाराचा वापर करत असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे यापैकीच एका प्रकरणासंबंधी हा फोटो असावा अशीही चर्चा आहे.
काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी किरीट सोमय्या यांना मंत्रालयात थेट प्रवेश कसा मिळाला यावर आक्षेप घेतला आहे. सोमय्या कोणत्या अधिकारात याठिकाणी गेले असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
4. राजकारणात प्रवेश करण्याबाबत सोनू सूद काय म्हणाले?
कोरोना आरोग्य संकटात अभिनेता सोनू सूद चर्चेत आले. ते गरजूंना सातत्याने मदत करत असल्याचं चित्र सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आलं.
बहीण मालविका सिंग यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर सोनू सूदही राजकारणात प्रवेश करणार का? असा प्रश्न विचारला जात होता.

फोटो स्रोत, SONU SOOD/FACEBOOK
मालविका सिंग या पंजाब निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या असून मोगा या मतदारसंघातून त्या काँग्रेसच्या उमेदवार आहेत. बहिणीच्या प्रचारासाठी सोनू सूदही मैदानात उतरले आहेत.
आपला कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नसून आपण केवळ बहिणीला प्रचारासाठी मदत करत असल्याचं सोनू सूद यांनी स्पष्ट केलं आहे. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे.
"माझा राजकारणाशी संबंध नाही हे मी सुरुवातीपासून सांगत आलो आहे. मी आजही अभिनेता आणि सामाजिक कार्यकर्ताच आहे. मला अनेक पक्षांकडून ऑफर्स आल्या. राज्यसभेसाठीही विचारणा झाली. पण माझ्या हातात आधीच खूप काम आहे आणि माझी टीम एवढी मोठी नाही." असं सोनू सूद यांनी स्पष्ट केलं.
आजपासून पाच ते सात वर्षांनंतर विचार करता येईल असंही ते म्हणाले.
5. 'पुष्पा' सिनेमातील कलाकारांनी मानधन किती घेतलं?
सुपरस्टार अभिनेता अल्लू अर्जुन आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांच्या 'पुष्पा' सिनेमाने बॉक्स ऑफीसवर 300 कोटीहून अधिक कमाई केली. यासाठी दोघांनीही कोट्यवधी रुपयांचं मानधन घेतलं आहे.

फोटो स्रोत, twitter/Pushpa
लाल चंदनाच्या तस्करीवर आधारित या सिनेमाने 300 कोटींहून अधिक व्यवसाय केला आहे. कोरोना काळात बॉक्स ऑफीसवर केलेली ही कमाई नवीन विक्रम मानला जात आहे.
अल्लू अर्जुनने या सिनेमासाठी सुमारे 50 कोटी रुपयांचं मानधन घेतल्याचा दावा केला जात आहे. तर रश्मिकाने 5 ते 10 कोटी रुपयांचं मानधन घेतल्याचं सांगितलं जातं. महाराष्ट्र टाईम्सने हे वृत्त दिलं आहे.
खलनायकाच्या भूमिकेत दिसलेला मल्याळम अभिनेता फहाद फासिल यानेही या सिनेमासाठी साडे तीन कोटी रुपये मानधन घेतलं आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)























