'INS रणवीर'वर नेमकं काय घडलं? ही युद्धनौका कशी आहे?

Published
वाचन वेळ: 4 मिनिटे

INS रणवीर या युद्धनौकेला अष्टपैलू युद्धनौका म्हटलं जातं. अत्यंत प्रगत तंत्रज्ञानाचा आधार घेऊन बनलेली ही युद्धनौका म्हणजे भारतीय नौदलाची शान आहे असं म्हटलं जातं.

या नौकेवर मंगळवारी स्फोट झाल्यानंतर हा स्फोट का झाला आणि ही युद्धनौका नेमकी कशी आहे याबाबत सोशल मीडियावर अनेक प्रश्न दिसत आहेत.

भारतीय नौदलाची युद्धनौका 'INS रणवीर'वर मंगळवारी (18 जानेवारी) दुपारी मोठा स्फोट झाला.

या अपघातात तीन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला तर, 11 कर्मचारी जखमी झालेत अशी माहिती भारतीय नौदलाने दिलीये.

संरक्षण मंत्रालयाच्या माहितीनुसार, 'INS रणवीर'च्या एका कंपार्टमेंटमध्ये स्फोट झाल्यामुळे हा दुर्दैवी अपघात घडला. या घटनेच्या उच्चस्तरिय बोर्ड ऑफ इन्क्वायरीचे आदेश देण्यात आलेत.

'INS रणवीर' ही भारतीय नौदलाच्या ताफ्यातील विनाशिका आहे. या स्फोटात युद्धनौकेवर असलेली शस्त्र आणि दारूगोळ्याचं नुकसान झालं नसल्याची माहिती देण्यात आलीये.

'INS रणवीर' वर नेमकं काय घडलं?

मुंबई नौदल डॉकयार्डमध्ये उभी युद्धनौका 'INS रणवीर'वर स्फोटाची ही घटना मंगळवारी दुपारी 4.30 ते 5 दरम्यान घडली.

विनाशिका 'INS रणवीर'च्या इंटर्नल कंपार्टमेंटमध्ये अचानक स्फोट झाला. हा स्फोट कशामुळे झाला, याचं ठोस कारण अद्यापही स्पष्ट झालेलं नाहीये.

युद्धनौका 'INS रणवीर'वर झालेल्या स्फोटाप्रकरणी घातपाताची शक्यता नौदलाने फेटाळून लावलीये. एसीचं काम सुरू असताना हा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती मिळतेय. पण, नौदलाने या माहितीला अद्याप दुजोरा दिलेला नाही.

भारतीय नौदलाचे प्रमुख अॅडमिरल हरी कुमार यांनी या घटनेबाबत तीव्र दुख: व्यक्त केलंय. आपल्या शोकसंदेशात ते म्हणतात, "या अपघातात दुर्दैवाने तीन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. आम्ही त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी उभे आहोत."

'INS रणवीर' युद्धनौका असल्याने यावर शस्त्र आणि दारूगोळा होता. मात्र याला कोणत्याही प्रकारचं नुकसान झालं नसल्याची माहिती, नौदलाच्या अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर दिलीये.

मिळालेल्या माहितीनुसार, 'INS रणवीर'वर स्फोट झाला त्यावेळी देखभालीचं काम सुरू होतं. बोटीवर उपस्थित 16 ते 17 कर्मचारी विविध भागात कार्यरत होते.

भारतीय नौदलाच्या माहितीनुसार, "या दुर्दैवी घटनेत तीन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झालाय. मास्टर चिफ पेट्टी ऑफिसर कृष्णन कुमार, सुरिंदर कुमार आणि एके सिंह अशी मृत कर्मचाऱ्यांची नावं आहेत. तर, बुधवारी सकाळी या घटनेतील जखमींचा आकडा 11 पर्यंत पोहोचला होता."

"स्फोट झाल्यानंतर 'INS रणवीर'वर उपस्थित कर्मचाऱ्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी हालचाली सुरू केल्या. या घटनेत मोठी वित्तहानी झालेली नाही," अशी संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केलंय.

भारतीय नौदलाच्या ईस्टर्न कमांडच्या ताफ्यातील 'INS रणवीर', नोव्हेंबर 2021 पासून क्रॉस कोस्ट ऑपरेशनल डिप्लॉयमेंटवर तैनात होती. पुढील काही दिवसातच 'INS रणवीर' पुन्हा आपल्या बेस पोर्टच्या दिशेने रवाना होणार होती.

सराव मोहिमेवर या युद्धनौका एका कमांडमधून दुसऱ्या कमांडमध्ये ये-जा करत असतात.

वेस्टर्न कमांडमधील सूत्रांच्या माहितीनुसार, "अपघातातील जखमी कर्मचाऱ्यांवर भारतीय नौदलाचं रुग्णालय INS अश्विनीमध्ये उपचार सुरू करण्यात आलेत. तर, मुंबई पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूचा गुन्हा दाखल करून घेतलाय."

ही घटना का घडली असावी?

विनाशिकेवर नेमकं काय काम चालतं, विनाशिकेचं स्वरूप कसं असतं या गोष्टी समजून घेण्याचा बीबीसीने प्रयत्न केला.

मनन भट्ट भारतीय नौदलाचे निवृत्त अधिकारी आहेत. त्यांनी 'INS राणा' आणि 'INS रणजीत' या विनाशिकांवर काम केलंय.

बीबीसीशी बोलताना ते म्हणाले, "ही युद्धनौका गॅस टर्बाईनवर चालते. याचं काम सुरू असताना ऑक्झिलरी बॉयरल किंवा त्याच्या इंधन टाकीत स्फोट झाला असण्याची मला दाट शंका आहे. पण नौदलाकडून याबाबत स्पष्ट करण्यात आलं नाहीये."

ते पुढे सांगतात, ऑक्झिलरी बॉयरल जहाजाच्या मध्यभागी असतात. बॉयरलच्या वर मास्टर चिफ पेट्टी ऑफिसरचं केबिन असतं. त्यामुळे बहुदा जीवितहानी झाली असावी.

'INS रणवीर'च्या अपघातात मृत्युमुखी पडलेले मास्टर चिफ पेट्टी ऑफिसर सुरिंदर कुमार, मनन भट्ट यांना एक वर्ष सिनिअर होते. "सुरिंदर कुमार एक चांगले खेळाडू आणि टीम लिडर होते," मनन भट्ट त्यांच्या आठवणींना उजाळा देतात.

'INS रणवीर' विनाशिका कशी आहे?

'INS रणवीर' भारतीय नौदलाच्या ताफ्यातील युद्धनौका आहे.

शत्रूवर सर्व बाजूंनी हल्ला करण्याची ताकद असल्याने याला विनाशिका म्हणूनही ओळखलं जातं. विनाशिका नौदलाचं स्ट्राईक वेपन मानल्या जातात.

भारतीय नौदलाच्या ताफ्यात 'INS रणवीर'ला साल 1986 मध्ये कमिशन करण्यात आलं. इंडियन नेव्हीचा भाग असलेली 'INS रणवीर' ही सर्वात जूनी युद्धनौका असल्याची माहिती आहे.

सुरक्षातज्ज्ञ ब्रिगेडीअर (निवृत्त) हेमंत महाजन बीबीसीशी बोलताना सांगतात, "'INS रणवीर' एक युद्धनौका आहे. यावर तोफा, क्षेपणास्त्र आणि अॅन्टी एअरक्राफ्ट गन्स आहेत." या जहाजाला एक अष्टपैलू लढाऊ जहाज म्हणता येईल.

'INS रणवीर' युद्धनौकांच्या राजपूत क्लासमधील चौथी युद्धनौका असून, 'INS रणविजय' ही दुसरी रणवीर क्लास युद्धनौका आहे.

नौदलाचे निवृत्त अधिकारी मनन भट पुढे म्हणाले, "भारतील नौदलाने वेळो-वेळी याची दुरूस्ती, अपग्रेडेशन आणि रिनोवेशन केलंय." यावर अत्याधुनिक रडार आणि सरफेस-टू-एअर मिसाईल लावण्यात आले आहेत.

युद्धनौका 'INS रणवीर' ही रशियन बनावटीची आहे. पूर्वीच्या सोव्हिएत युनियनमध्ये याचं बांधकाम करण्यात आलं होतं.

'INS रणवीर'बाबत माहिती देताना सिनिअर डिफेंन्स रिपोर्टर समीर कर्वे सांगतात, "भारतात मिसाईल गायडेड विनाशिकांचं युग खऱ्याअर्थाने 'INS रणवीर' नौदलात सामील झाल्यानंतर सुरू झालं." यावर सद्य स्थितीत ब्रम्होस मिसाईल (क्षेपणास्त्र) बसवण्यात आले होते.

भारतीय नौदलाच्या माहितीनुसार, 146 मीटर लांबीची ही युद्धनौका असून, यावर 35 अधिकाऱ्यांसह 350 कर्मचारी तैनात असतात.

समीर कर्वे पुढे सांगतात, "INS राजपूत भारतीय नौदलातून डी-कमिशन करण्यात आली. आता INS रणवीरधरून तीन जहाजं अजूनही आहेत." यावर कमऊ हेलिकॉप्टर आहेत. हे हेलिकॉप्टर हॅंगरमधून वर येतात हे याचं वेगळेपण आहे.

'INS रणवीर' विनाशिकेचा वापर कुठे होतो?

नौदलातील निवृत्त अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, रणवीर क्लासमधील युद्धनौकांचा रोल अॅन्टी एअरक्राफ्ट आणि अॅन्टी सबमरिन (पाणबुडी) वॉरफेअरमध्ये प्रामुख्याने महत्त्वाचा असतो.

युद्धकाळ नसताना या युद्धनौकांचा वापर "पेट्रोलिंग किंवा गस्त घालण्यासाठी आणि आपल्या भागात कोणी येत तर नाही, याची टेहाळणी किंवा सर्व्हेलन्ससाठी केला जातो," सुरक्षातज्ज्ञ ब्रिगेडीअर (निवृत्त) हेमंत महाजन सांगतात.

तर, युद्धकाळात शत्रूच्या युद्धनौकांविरोधात लढण्यासाठी आणि स्वत:चं रक्षण करण्यासाठी याचा वापर कण्यात येतो.

मुंबई नौदल डॉकमधील अपघात?

नौदलाच्या मुंबई डॉकमध्ये याआधी सुद्धा जहाजांना अपघात झाले आहेत.

  • 2011- 'INS विंध्यगिरी' मुंबई डॉकमध्ये प्रवेश करत असताना त्याची मालवाहू जहाजासोबत टक्कर झाली होती. INS विंध्यगिरीमध्ये आग लागल्यामुळे जहाज समुद्रात बुडालं होतं.
  • ऑगस्ट 2013- 'INS सिंधुरक्षक' पाणबुडीवर मोठा स्फोट झाला होता. यात 18 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता. ही पाणबुडी समुद्रात बुडाली होती.
  • 26 फेब्रुवारी 2014- 'INS सिंधुरत्न' पाणबुडीवर आग लागली होती. ज्यात दोन अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला. तर, सात कर्मचारी जखमी झाले होते. या घटनेनंतर तत्कालीन नौदल प्रमुख अडमिरल डी.के.जोशी यांनी घटनेची नैतिक जबाबदारी स्विकारून राजीनामा दिला होता.
  • 2014- 'INS कोलकाला' वर वायूगळती झाली होती. यात एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला होता.
  • 2016- 'INS बेतवा' मिसाईल फ्रिगेड जहाज मुंबई डॉकमध्ये असताना बोट एकाबाजूला कलंडल्यामुळे झालेल्या अपघातात दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. तर, 14 जखमी झाले होते.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता