अखिलेश यादव यांना भाजपचा झटका, भावजय अपर्णा यादव भाजपच्या वाटेवर #5मोठ्याबातम्या

अपर्णा यादव

फोटो स्रोत, APARNA YADAV FB PAGE

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा :

1. मुलायम सिंह यांची सून अपर्णा यादव भाजपच्या वाटेवर, राजकीय वर्तुळात चर्चा

उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीचं राजकारण तापायला सुरुवात झाली आहे. उत्तर प्रदेशात सत्ताधारी भाजपच्या मंत्री आणि आमदारांना फोडून समाजवादी पक्षाने मोठा धक्का दिला होता. आता भाजपने थेट समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि पक्षाचे संस्थापक मुलायम सिंह यादव यांच्या घरातच फूट पाडल्याची चर्चा आहे.

मुलायम सिंह यादव यांची धाकटी सून अपर्णा यादव या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं वृत्त आहे. एबीपी न्यूजने ही बातमी दिली आहे.

अपर्णा या मुलायम सिंह यांचा धाकटा मुलगा आणि अखिलेश यादव यांचे सावत्र भाऊ प्रतीक यादव यांची पत्नी आहे. अपर्णा यांनी 2017ची विधानसभा निवडणूक लखनऊच्या कँट मतदारसंघातून लढवली होती. त्यांच्यासाठी अखिलेश यांनी प्रचारही केला होता.

पण निवडणुकीत त्यांचा भाजपच्या उमेदवार रिटा बहुगुणा जोशी यांनी पराभव केला.

2. पंतप्रधान मोदींनीच आम्हाला इमानदारीचे प्रमाणपत्र दिले- अरविंद केजरीवाल

"गोव्यातील जनता काँग्रेस-भाजपला कंटाळली आहे. गोव्यातील जनतेला बदल हवा आहे आणि या वेळी खरा बदल घडेल, असे वाटते," असं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे.

गोव्यामध्ये आम आदमी पक्षाचा प्रचार करताना केजरीवालांनी हे वक्तव्य केलं. दोन दिवसाच्या गोवा दौऱ्यावर असलेले केजरीवाल हे घरोघरी जाऊन प्रचार करत आहेत.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

रविवारी (16 जानेवारी) त्यांनी पत्रकार परिषद घेतली.

या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी म्हटलं, की "निवडणूक 14 फेब्रुवारीला आहे आणि गोव्यातील मतदार खूप उत्साही आहेत. यावेळी खरा बदल होईल, असे त्यांना वाटतं. पूर्वी नागरिकांकडे पर्याय नव्हता. एकदा भाजप आणि एकदा काँग्रेस येत असल्याने जनता कंटाळली होते आणि आता त्यांना बदल हवा आहे."

"चांगले काम करणार, असं निवडणुकीच्या काळात सर्वच पक्ष सांगतात. पण आम्ही हे दिल्लीत करून दाखवले आहे. तिथे आम्ही प्रामाणिकपणे सरकार चालवून दाखवले आहे. 'आप' हा देशातील सर्वांत प्रामाणिक पक्ष असल्याचे इमानदारीचे प्रमाणपत्र खुद्द पंतप्रधान मोदींनीच दिले आहे", असंही केजरीवाल यांनी म्हटलं.

महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिली आहे.

3. ओबीसी आरक्षणावर महाविकास आघाडी सरकार खोटं बोलतंय- चंद्रशेखर बावनकुळे

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात सोमवारी (17 जानेवारी) महत्वाची सुनावणी पार पडणार आहे.

ओबीसी समाजाचा एम्पिरीकल डेटा गोळा करण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाने तज्ज्ञांच्या मदतीने प्रश्नावली तयार केली आहे.

चंद्रशेखर बावनकुळे

फोटो स्रोत, FACEBOOK/CHANDRASHEKHAR BAWANKULE

दरम्यान, ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन माजी ऊर्जामंत्री आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवलाय.

महाविकास आघाडी सरकार हे ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर खोटं बोलत असल्याचा आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलाय.

नवीन एम्पेरिकल डेटा तयार करायचा होता. मात्र, या लोकांनी ओबीसी समाजाची दिशाभूल केली. केंद्र सरकारकडे बोट दाखवत राहिले. 2011 चा जनगणनेचा डेटा हा 2011 च्या जिल्हा परिषदेच्या कामाचा नव्हता. नवीन डेटा तयार करायचा होता. पण या सरकारनं ते काम केलं नाही, असं बावनकुळे यांनी म्हटलं.

टीव्ही9 मराठीनं हे वृत्त दिलंय.

4. एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटेपर्यंत भाजपा आंदोलकांना शिधा पुरवणार - चंद्रकांत पाटील

राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप संपेपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यातील अडीच हजार एसटी कर्मचाऱ्यांची चूल पेटवण्याची जबाबदारी भाजप घेत आहे, अशी घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी रविवारी (16 जानेवारी) कोल्हापुरात केली.

चंद्रकांत पाटील

फोटो स्रोत, CHANDRAKANTPATIL

एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनस्थळी चंद्रकांत पाटील यांच्यासह जिल्ह्यातील भाजप पदाधिकारी यांनी भेट दिली. यावेळी एसटी कर्मचाऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात शिधा वाटप करण्यात आला.

हा संदर्भ घेऊन चंद्रकांत पाटील यांनी संपात उतरलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना संप सुरू असेपर्यंत शिधा देण्याची जबाबदारी भाजपा घेत असल्याचे घोषित केलं.

हा संप लवकरच संपुष्टात यावा, कर्मचाऱ्यांनी स्वाभिमानाने कामावर जावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

लोकसत्तानं हे वृत्त दिलंय.

5. जमत नसेल तर आराम करा, आम्हाला संधी द्या; प्रवीण दरेकरांची टीका

"रायगड जिल्ह्यातील नगरपंचायतीच्या दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक जवळ आली असून पोलादपूरवासीय हे परिवर्तनाच्या प्रयत्नात आहेत. जमत नसेल तर आराम करा," असा खोचक टोला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला लगावला.

प्रवीण दरेकर

फोटो स्रोत, @MIPRAVINDAREKAR

पोलादपूर नगरपंचायतीच्या दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांची प्रचार रॅली काढण्यात आली. यावेळी विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर उपस्थित होते.

यावेळी प्रवीण दरेकर यांनी म्हटलं, की पहिल्या टप्प्यातील निवडणुकीत भाजपला कौल दिला असून दुसऱ्या टप्प्यात देखील आपल्याला मताधिक्य मिळेल. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना संधी देण्यात आली होती. परंतु आज पोलादपूरवासीय परिवर्तन करण्याच्या प्रयत्नात आहेत.

एबीपी माझानं हे वृत्त दिलं आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)