You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अल्पवयीन मुलीच्या प्रायव्हेट पार्टवर जखमा, बलात्कार झाल्याचा मुलीच्या आईचा दावा
- Author, मोहर सिंह मीणा,
- Role, जयपूरहून बीबीसी हिंदीसाठी.
- Published
- वाचन वेळ: 6 मिनिटे
राजस्थानातील अलवर जिल्ह्यात 11 जानेवारीच्या सायंकाळी तिजारा पुलावर एक मूकबधीर अल्पवयीन रक्तबंबाळ अवस्थेत आढळली होती. यामुलीवर बलात्कार झाला असल्याचा संशय व्यक्त केला जात होता.
या प्रकरणाची सीबीआयकडून या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी विनंती राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे करण्यात येणार आहे. याबाबतचा निर्णय झाला असल्याचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी सांगितले.
पीडितेच्या आईनं बीबीसी हिंदीबरोबर बोलताना अनेक प्रश्न उपस्थित केले असून मुलीबरोबर गैरकृत्य झालं असल्याचा दावा केला आहे. पीडितेवर सध्या जयपूरच्या सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मात्र, या मुलीचा वैद्यकीय अहवाल आणि आतापर्यंत मिळालेल्या तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी 'सेक्श्युअल पेनिट्रेशन', 'व्हजाइनल आणि इनर पेनिट्रेशन' झालेलं नसल्याचं म्हटलं आहे.
सरकारी रुग्णालयात दाखल
जयपूरच्या या मोठ्या सरकारी रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावरील मुख्य सर्जिकल आयसीयूमध्ये 15 वर्षांची ही पीडित तरुणी दाखल आहे.
ऑपरेशन थिएटरबाहेर रुग्णालय व्यवस्थापनाच्या दोन सुरक्षारक्षकांसह राजस्थान पोलिसांच्या तीन महिला आणि एक पोलिस कर्मचारीही तैनात आहेत.
पीडितेच्या नातेवाईकांना भेटण्याचा आग्रह केल्यानंतर त्याठिकाणच्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांना फोन करुन याबाबत परवानगी घेतली.
त्यानंतर आतून पीडितेच्या आई-वडिलांना ऑपरेशन थिएटरच्या गेटवर बोलावलं. मूकबधिर मुलीला होणाऱ्या वेदना आणि तिच्यासाठी न्याय मिळावा अशी आशा पीडितेच्या आई-वडिलांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती.
ओटीच्या गेटवर असलेले सर्व पोलिस कर्मचारी आणि रुग्णालयाच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांसमोरच पीडितेच्या आई-वडिलांशी आमची चर्चा सुरू झाली.
घटनेचा उल्लेख करताना पीडितेच्या वडिलांनी सांगितलं की, "गावापासून जवळपास 60 किलोमीटर अंतरावर एका जणाच्या जमिनीवर आम्ही शेती करतो. 11 जानेवारीच्या सायंकाळी आमच्या मोठ्या मुलीनं गावातून फोन करून लहान बहीण घरी नसल्याचं सांगितलं. त्यानंतर नात्यातील व्यक्तीने पोलिसांना याबाबत माहिती दिली."
"मुलगी बेपत्ता झाल्याचं समजताच आम्ही गावाकडे निघालो होतो. रात्री 9 वाजता पोलिस कंट्रोल रुममधून एक मुलगी सापडल्याची माहिती मिळाली. रुग्णालयात जाऊन पाहिलं तर आमची मुलगी होती. तिच्या शरीरातून प्रचंड रक्त वाहत होतं आणि ती बेशुद्धावस्थेत होती. तिथून आम्ही मुलीला जयपूरला घेऊन आलो,'' असं ते म्हणाले.
मेडिकल रिपोर्टबाबत नातेवाईकांना आश्चर्य
काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी पीडितेच्या पित्याबरोबर फोनवरून चर्चा केली होती.
याबाबत पीडितेच्या आईने सांगितलं, "रात्री जवळपास 10.30 वाजता कॉल आला होता. प्रियंका गांधी यांनी कारवाई होईल असं आश्वासन दिलं आहे. तसंच मुलीच्या तब्येतीची माहिती घेतली."
पीडितेची आई संतप्त वाटत होती. मेडिकल रिपोर्टमध्ये 'सेक्श्युअल पेनिट्रेशन', 'व्हजाइनल आणि इनर पेनिट्रेशन' झालं नसल्याचं समोर आलं आहे, त्यावर त्यांचा विश्वास नाही.
मुलीच्या स्थितीबाबत विचारलं असता त्या म्हणाल्या, "तिचे कपडे कुठूनही फाटलेले नव्हते. खाली सलवारही बांधलेली होती."
हाताने इशारा करत त्या म्हणाल्या की, "प्रायव्हेट पार्टजवळ खोल घाव आहेत, त्याशिवाय कुठेही काही झालेलं नाही. अपघातही झाला असता तर कपडे फाटले असते, शरिरावर इतर ठिकाणी मार लागलेला असता. पण हा अपघात नाही. एवढी बुद्धी तर आम्हालाही आहे. मी माझ्या मुलीच्या जखमा पाहिल्या आहेत. तिच्याबरोबर गैरकृत्य झालं आहे."
या प्रकरणी देशभरात होत असलेल्या राजकारणाबाबत त्या म्हणाल्या की, "आम्हाला माहिती नाही की बाहेर काय होत आहे. आम्ही गरीब लोक आहोत. आम्हाला आमच्या मुलीसाठी न्याय हवा आहे."
गंभीर स्थितीत रात्री दोन वाजता जयपूरला पोहोचले
रुग्णालयात वरिष्ठ डॉक्टरांच्या एका टीमच्या निगराणीमध्ये पीडितेवर उपचार सुरू आहेत. दुसरीकडे देशभरात घटनेची चर्चा आहे. पण, याबाबत बोलायला रुग्णालयातील आरोग्य कर्मचारी आणि डॉक्टरही कचरत आहेत.
प्रचंड प्रयत्नांनंतर नाव जाहीर न करण्याच्या अटीवर रुग्णालयातील एका आरोग्य कर्मचाऱ्यानं आम्हाला सांगितलं की, "पीडितेला 11 जानेवारीच्या रात्री उशिरा दोन वाजता गंभीर स्थितीत अलवरहून रेफर केल्यानंतर याठिकाणी आणलं होतं. तिचा पल्स रेटही अत्यंत खाली आला होती."
"पीडितेचा खूप रक्तस्त्राव झाला होता आणि ती बेशुद्ध होती. तिच्या प्रायव्हेट पार्टजवळ मोठी जखम होती. आम्ही पूर्वी कधीही अशा अवस्थेत या रुग्णालयात कुणालाही पाहिलं नव्हतं," असं त्यांनी म्हटलं.
पीडितेला अलवरच्या स्थानिक रुग्णालयात एक युनिट रक्त चढवल्यानंतर याठिकाणी रेफर करण्यात आलं होतं. सकाळी सुमारे चार वाजता पुन्हा रक्त चढवण्यात आलं आणि अखेर सकाळी डॉक्टरांच्या टीमनं सुमारे तीन तास ऑपरेशन केलं.
'अशी अवस्था कधी पाहिली नाही'
रुग्णालयातील दुसऱ्या एका आरोग्य कर्मचाऱ्यानंही नाव जाहीर न करण्याच्या अटीवर आमच्याशी बोलायची तयारी दाखवली. "2016 पासून आतापर्यंत रुग्णालयात पीडितेसह जवळपास 50 अल्पवयीन बलात्कार पीडितांना आणण्यात आलं आहे, पण अशी गंभीर अवस्था आम्ही पूर्वी कधीच पाहिली नाही," असं ते म्हणाले.
आरोग्य कर्मचारी म्हणाले की, "पीडितेचं अॅडमिशन तिकिट (उपचाराची संपूर्ण माहिती) देखील रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. अरविंद शुक्ला यांच्याकडेच ठेवण्यात आलं आहे. प्रथमच अॅडमिशन तिकिट अशा प्रकारे अधीक्षकांकडे ठेवलं आहे."
पीडितेच्या अवस्थेबाबत ते म्हणाले की, "अद्याप तिला जेवण दिलं जात नाही आहे. ड्रिपच्या माध्यमातूनच दिलं जात आहे. 15 जानेवारीला तिच्या जखमेवर ड्रेसिंगही करण्यात आली आहे."
या जखमेमुळं पीडितेला भविष्यात काही समस्या होऊ शकते का, असा प्रश्न आम्ही विचारला. त्यावर रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. अरविंद शुक्ला यांनी "जखमा तर सर्व भरुन निघतील" असं उत्तर दिलं.
पीडितेवर बलात्कार झाला आहे किंवा नाही, या प्रश्नावर, "आम्ही रिपोर्ट दिला आहे, आता पोलीसच सांगतील," असं ते म्हणाले.
याच प्रश्नाबाबत बोलताना एक आरोग्य कर्मचारी नाव जाहीर न करण्याच्या अटीवर म्हणाले की, "पीडितेचे घाव गंभीर आहेत. त्यामुळं भविष्यात त्यांना समस्या होण्याची पूर्ण शक्यता आहे."
आतापर्यंत झालेली पोलीस कारवाई
अलवर पोलिसांनी या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक केलेली नाही. पोलिस घटनेशी संबंधित सर्व सीसीटिव्ही फुटेज पाहत आहेत. आतापर्यंतच्या तपासानुसार पीडिता ऑटोद्वारे शहरात आली होती, हे समोर आलं आहे. एसएफएल रिपोर्टमध्ये ऑटोत बलात्कार झाला नसल्याचं स्पष्ट झालं आहे.
दुसऱ्या एका सीसीटिव्ही फुटेजमध्ये 11 जानेवारी म्हणजे घटनेच्या दिवशी सायंकाळी 7.31 वाजता पीडिता तिजारावर पायी जाताना दिसत आहे. फुटेजमध्ये घटनास्थळापासून 350 मीटरच्या अंतरावर पीडिता दिसत आहे. पीडिता सीसीटिव्हीमध्ये दिसल्यापासून 15 मिनिटांदरम्यान पुलावरून गेलेल्या वाहनांची माहिती मिळवली जात आहे.
"त्या दरम्यान या पुलावर कोण-कोण होतं, हे आम्ही सध्या शोधत आहोत," असं याबाबत अलवर जिल्ह्याच्या एसपी तेजस्विनी गौतम यांनी बीबीसी हिंदीला सांगितलं.
"एसएफएल रिपोर्टचीही वाट पाहत आहेत. अद्याप आमचं मुलीशीही बोलणं झालेलं नाही. कारण डॉक्टरांनी ती फिट नसल्याचं सांगितलं आहे," असं त्या म्हणाल्या.
मेडिकल रिपोर्ट आणि आतापर्यंतच्या तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी 'सेक्श्युअल पेनिट्रेशन', 'व्हजाइनल आणि इनर पेनिट्रेशन' झालं नाही, असं मेडिकल रिपोर्टमध्ये असल्याचं सांगितलं आहे. मात्र, अद्याप तपास सुरू असल्याचंही पोलिस म्हणाले.
या प्रकरणाचा तपास स्पेशल इनव्हेस्टिगेशन टीम म्हणजे एसआयटीकडे सोपवल्याचीही माहिती मिळत आहे. या एसआयटीचा रिपोर्टही अद्याप आलेला नाही.
मात्र, घटनेच्या चार दिवसांनंतरही गुन्हेगार पकडले गेले नसल्यानं सामान्य लोकांपासून राजकीय पक्षही पोलिसांवर प्रश्न उपस्थित करत आहेत.
भाजपने केली काँग्रेसवर टीका
अलवरमध्ये झालेल्या या घटनेचा संबंध 2012 मधील निर्भया प्रकरणाशी जोडला जात आहे.
काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी पीडितेच्या आईशी फोनवरून चर्चा केली आहे. तर भारतीय जनता पक्षही या मुद्द्यावरून सातत्यानं राजस्थान सरकार आणि काँग्रेसला घेरत आहे.
राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजेंपासून केंद्रीय मंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनीही निवेदन देत या घटनेवरून काँग्रेस सरकारवर हल्लाबोल केला आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष डॉ. सतीश पुनिया यानी एक समिती स्थापन करून पीडितेला न्याय देण्याची मागणी केली आहे. समितीमध्ये राष्ट्रीय मंत्री डॉ. अलका गुर्जर, प्रदेश महिला मोर्चा अध्यक्षा अलका मुंदडा, प्रवक्ते रामलाल शर्मा, प्रदेश मंत्री जितेंद्र गोठवाल यांचाही समावेश आहे.
ही समिती गुरुवारी प्रियंका गांधींना घेराव घालण्यासाठी सवाई माधोपूरलाही गेली होती. शनिवारी ही समिती अलवरमध्ये पीडितेच्या गावात, जिल्हाधिकारी आणि अधीक्षकांना भेटायला हेली होती.
प्रियंका गांधी 50वा वाढदिवस साजरा करण्यासाठी सवाई माधोपूरला आल्या होत्या. या दरम्यान पीडितेची त्यांनी भेट घेतली नाही. मात्र, शुक्रवारी रात्री प्रियंका गांधी फोनवर पीडितेच्या वडिलांशी बोलल्या आणि त्यांना कारवाईचं आश्वासनही दिलं.
भाजपने पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी संपूर्ण राजस्थानात 17 आणि 18 जानेवारीला आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी भाजप करत आहे.
दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांना ट्विट करून याबाबत पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी, अलवरच्या एसपी, पीडितेवर उपचार करणारे डॉक्टर यांच्याशी संपर्कात असल्याचं म्हटलं आहे. तसंच पोलिस महासंचालकांना स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी करून लवकर प्रकरणाचा छडा लावण्याचे निर्देश दिले आहेत.
ते म्हणाले की, या प्रकरणी राजकीय पक्षांनी विचार न करता वक्तव्य करता कामा नये. पोलिसांनी स्वतंत्ररीत्या चौकशी करायला हवी. चौकशीनंतरच याबाबत बोलणं योग्य ठरेल.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष डॉ. सतीश पुनिया यांनी शनिवारी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत राज्य सरकारवर पुन्हा या प्रकरणावरून हल्लाबोल केला आहे.
"या घटनेच्या कारवाईला यूटर्न देण्यामागे पंजाब आणि उत्तर प्रदेशच्या निवडणुका आहेत. मुख्यमंत्री आणि राजस्थान पोलिसांना गैरकृत्य झालं आहे असं वाटत नसेल तर सरकार आणि पोलिसांवरही विश्वास ठेवता येणार नाही. अशाप्रकारेच अचानक यूटर्न घेतल्यानं काही प्रश्न उपस्थित होतात. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवायला हवा," असं ते म्हणाले.
2021 मध्ये राजस्थानात दाखल असलेली प्रकरणं आणि त्यावर झालेली पोलिस कारवाई याबाबत पोलिस महासंचालक एमएल लाठर यांनी नुकतेच आकडे जाहीर केले होते.
या आकड्यांचा विचार करता, 2020 मध्ये राज्यात बलात्काराचे 5,310 गुन्हे दाखल करण्यात आले. तर 2021 मध्ये ही संख्या 1027 ने वाढून 6,337 झाली. 2021 मधील बलात्कार प्रकरणी दाखल झालेल्या 835 प्रकरणांचा तपास अजूनही सुरू आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)