You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
महाराष्ट्र : 92 नगरपरिषदा आणि 4 नगरपंचायतींच्या निवडणुका स्थगित
महाराष्ट्रातील 92 नगरपरिषदा आणि 4 नगरपंचायतींच्या निवडणुका स्थगित करण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगानं घेतला आहे. सुधारित निवडणूक कार्यक्रम यथावकाश देण्यात येईल, असंही निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आलंय.
8 जुलै 2022 रोजी राज्य निवडणूक आयोगानं 17 जिल्ह्यातील 92 नगरपरिषदा आणि 4 नगरपंचायतींमध्ये निवडणुका घेण्याचे जाहीर केले होते. मात्र, त्यानंतर 12 जुलैला सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणासंदर्भात सुनावणी झाली.
पुढील सुनावणी 19 जुलैला होणार आहे. या पार्श्वभूमीवर निवडणुकांना स्थगिती देण्याचा निर्णय निवडणूक आयोगानं घेतलाय.
कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये होणार निवडणूक?
- नाशिक
- धुळे
- नंदुरबार
- जळगाव
- अहमदनगर
- पुणे
- सोलापूर
- सांगली
- सातारा
- कोल्हापूर
- औरंगाबाद
- जालना
- बीड
- उस्मानाबाद
- लातूर
- अमरावती
- बुलडाणा
काँग्रेसस्वबळावर, राष्ट्रवादी-शिवसेनेचं काय?
आगामी निवडणुका काँग्रेस स्वबळावरच लढवणार हे यापूर्वीच स्पष्ट झालं होतं. आता सरकार पडल्यानंतर राष्ट्रवादी आणि शिवसेना (ठाकरे गट) काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी एकत्र येत महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं होतं. पण एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे यांचं सरकार पडलं. भाजपने आपल्या पाठिंब्यावर बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्रिपद दिल्यामुळे राज्यातील राजकीय समीकरण बदललं आहे.
त्यामुळे आता शिवसेना कशा पद्धतीने या निवडणुकांना सामोरं जाते, हे पाहणं औत्सुक्याचं आहे.
कांग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यालयाकडून निवडणुकांसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांची यादी यापूर्वीच मागवण्यात आली होती.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यापूर्वीच आगामी निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढवणार असल्याचे स्पष्ट केलं होतं. पण नंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने काढलेल्या एका पत्रामुळे निवडणूक स्वबळावरच लढण्याचं काँग्रेसने ठरवले असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालं.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस देवानंद पवार यांनी राज्यातील सर्व शहर ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटी 8 जानेवारीला एक पत्र पाठवले होतं.
ज्यात महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत, जिल्हा परिषद,पंचायत समितीच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढवणार असल्याचा उल्लेख केला आहे. म्हणून आपल्या जिल्ह्यातील इच्छुकांच्या नावांची यादी प्रदेश कार्यालयाला पाठवण्याची सूचना या पत्रात करण्यात आली होती.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)