You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
BulliBai, Sulli Deals मधील आरोपी नीरजबद्दल अनेक गोष्टी तपासात उघड
सुल्लीडिल्स आणि बुल्लीबाई अॅप प्रकरणी अटक करण्यात आलेल्या नीरज बिश्नोई याच्या चौकशीतून काही अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
त्यात प्रामुख्यानं त्याचा हॅकिंगशी असलेला संबंध आणि त्याचबरोबर त्याचा या संपूर्ण प्रकरणातील संबंधितांशी कशा प्रकारे संपर्क होता याबाबतच्या महत्त्वाच्या माहितीचा समावेश आहे.
नीरज बिश्नोई याला गुरुवारी आसाममधून अटक करण्यात आली होती. हा 20 वर्षीय आरोपी या संपूर्ण प्रकरणाचा मास्टरमाईंड असल्याचा दावाही केला जात आहे.
तपासादरम्यान नीरज यानं तपास संस्थांना महत्त्वाची माहिती दिली असून त्यातून अनेक नवीन बाबी समोर येण्याची शक्यता आहे.
15 व्या वर्षांपासून हॅकिंग शिकला
या प्रकरणाच्या चौकशीदरम्यान आरोपी नीरज बिश्नोई यानं त्याला हॅकिंगची, वेबसाईट डिफेन्सिंगची सवय असल्याचं सांगितलं. वयाच्या 15 व्या वर्षापासून हे सर्व शिकायला सुरुवात केली होती, असंही त्यानं सांगितलं.
यापूर्वीही त्यानं विविध शाळा आणि विद्यापीठांच्या वेबसाईट हॅक करत त्यावरचा मजकूर बदलला होता. भारतातील आणि पाकिस्तानातीलही वेबसाईटचा यात समावेश होता.
शाळांच्या वेबसाईट हॅक केल्याच्या त्याच्या दाव्याचा संबंधित विभाग तपास करत आहेत.
आरोपी नीरज बिश्नोई याला जपानमधील अॅनिमेशन गेमिंग कॅरेक्टर GIYU आवडत होतं. त्यानं GIYU नावाने विविध ट्विटर हँडल तयार केलेले होते.
GIYU या शब्दानं त्यानं अकाऊंट तयार केलेलं होतं. त्याद्वारे त्याने कायदे संस्थांना त्याला पकडण्याचं आव्हान दिलेलं होतं.
सुल्ली डिल्सशी संबंधितांशी संपर्क
नीरज हा मुंबई पोलिसांनी अटक केलेल्या व्यक्तींच्या संपर्कात होता असंही त्यांनी सांगितलं आहे. ट्विटर ग्रुपद्वारे त्यांच्याबरोबर चॅट करत होता असं त्यानं सांगितलं.
त्या व्यक्तींना कधीही भेटला नव्हता किंवा त्यांचे नंबर त्याच्याकडं नसल्याचं त्यानं सांगितलं. मुंबई पोलिसांनी अटक केलेल्या श्वेता नावाच्या मुलीचं ट्विटर अकाऊंट तो वापरत होता, असंही त्यांनं सांगितलं.
गिटहबवर सुल्ली डिल्स अॅप तयार करणारा आणि @sullideals नावाचं ट्विटर हँडल तयार करणाऱ्यांच्या संपर्कात असल्याचंही त्यानं तपासात सांगितलं. तसंच त्याचा प्रचार केलयाचंही तो म्हणाला.
दिल्लीच्या किशनगड पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये उल्लेख असलेल्या त्याने वापरलेल्या ट्विटर हँडलद्वारे त्याचा दावा तपासण्यात आला.
संबंधित एफआयआरमध्ये त्याने वापरलेल्या ट्विटर हँडलच्या माध्यमातून महिलांचे फोटो लिलावासाठी पोस्ट करण्यात आले होते. सुल्लीडिल्स अॅप तयार करणाऱ्यांच्या संपर्कात असल्याचा त्याचा दावाही तपासण्यात आला.
आत्महत्या करण्याची धमकी
नीरज बिश्नोईला गुरुमुखी लिपी अधिक प्रभावी वाटत होती, त्यामुळं देवनागरी ऐवजी गुरुमुखीचा वापर केल्याचंही त्यानं जाहीर केलं.
या प्रकरणी आणखी काही तांत्रिक विश्लेषण केलं जात आहे. तसंच तांत्रिक उपकरणांची न्यायवैद्यक तपासणीही केली जात आहे.
आरोपी नीरज बिश्नोई हा तपासात सहकार्य करत नसून विलंब करण्याचा प्रयत्न करत असल्याचं तपास संस्थांकडून सांगण्यात आलं आहे.
त्यानं दोन वेळा स्वतःला हानी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आणि आत्महत्या करण्याची धमकीही देत आहे. त्यामुळं त्याच्यावर लक्ष ठेवण्यात येत असून यादिशेनं काळजी घेतली जात आहे. त्याची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली आहे.
काय आहे बुल्ली बाई अॅप?
तुमचा सोशल मीडियावरचा फोटो काढून कुणी भलत्याच अॅपवर लावला आणि तुम्ही विक्रीसाठी उपलब्ध आहात असं परस्पर सांगून तुमच्यावर बोली लावली तर? काही भारतीय मुस्लीम महिलांच्या बाबतीत असं अलीकडच्याच काळात दुसऱ्यांदा घडतंय.
सुल्ली डील्स हे अॅप तयार करणाऱ्यांवर कारवाई करण्यात दिल्ली पोलिसांना अपयश आलं असतानाच आता बुल्ली बाई असं बीभत्स नाव देऊन दुसरं अॅप पुढे आलं. यावेळी मुंबई पोलिसांनी तत्परतेने कारवाई केली आहे.
गेल्या वर्षी जुलै महिन्यात सुल्ली डील्स अॅपनेही खळबळ उडवून दिली होती. सुल्ली हा खरंतर मुस्लीम स्त्रीसाठी वापरला जाणारा अत्यंत अपमानकारक शब्द आहे. विकाऊ स्त्री असा त्याचा ढोबळ अर्थ आहे. अनेक मुस्लीम महिला पत्रकार आणि विचारवंतांचे फोटो आणि नावं देऊन या अॅपमध्ये चक्क लिलाव सुरू केले होते.
अर्थातच हे लिलाव खोटे होते आणि हा केवळ बदनाम करण्याचा प्रयत्न होता. या अॅपमध्ये अत्यंत अवमानजनक आणि अश्लील मजकूरही छापला होता.
या प्रकरणाचा छडा दिल्ली पोलिसांना अजून पर्यंत लावता आलेला नाही.
त्यातच आता बुल्ली बाई अॅप समोर आलं आहे. गिटहब या खुल्या ऑनलाईन व्यासपीठावर हे अॅप सुरू केलं. मग गदारोळ झाल्यानंतर हे अॅप त्यांनी काढूनही टाकलं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)