You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'Rum प्या' असं या देशाचं सरकार लोकांना का सांगतंय?
तैवान सध्या त्यांच्या नागरिकांबरोबर रमचं सेवन कसं करावं किंवा रम घालून पदार्थ कसे तयार करावे याच्या टिप्स शेअर करत आहे. चीनसाठी तयार करण्यात आलेल्या लिथुएनिया रमच्या 20,000 बाटल्या विकत घेतल्यानंतर तैवान असं करत आहे.
ही रम चीनमध्ये पोहोचण्यापासून रोखली जाऊ शकते, याबाबत माहिती मिळाल्यानंतर याची खरेदी केल्याचं तैवानमधील सरकारी तंबाखू आणि मद्य संघटना TTL नं म्हटलं आहे.
लिथुएनियानं तैवानमध्ये औपचारिक - डी फॅक्टो (De Facto) दूतावास सुरू केल्यानंतर या दोन्ही देशांदरम्यान वाढत असलेल्या संबंधांचे हे संकेत आहेत.
या प्रकारानंतर चीननं लिथुएनियाबरोबरचे द्विपक्षीय संबंध कमी केल्याचं पाहायला मिळालं.
लिथुएनियाच्या डी फॅक्टो दूतावासात चायनीज तैपेई ऐवजी तैवान असंच नाव वापरण्यात आलं आहे. चीन नाराज होऊ नये म्हणून चायनीज तैपेई हे नाव अनेक देश वापरतात.
तैवान हे स्वायत्त राष्ट्र असूनही चीन हा त्यांच्या भूभागाचा भाग असल्याचा दावा करत असतो. चीननं गेल्या काही वर्षांपासून तैवानला त्यांच्या मित्र राष्ट्रांपासून दूर करण्यासाठी दबावाचं राजकारण सुरू केलं आहे.
सीएनए या सरकारी वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार रमची एक बॅच चीनला जाण्यापासून रोखली जाण्याची शक्यता असल्याचं लिथुएनियाच्या तैवानी कार्यालयाचे प्रमुख आणि तैवानचे अर्थमंत्री एरिक हंग यांनी सांगितलं होतं, असं टीटीएलनं म्हटलं आहे.
यापूर्वीच्या काळात चीनमध्ये पाठवण्यात आलेल्या बीअरचे शिपमेंट थांबवण्यात आलं होतं. त्यामुळं रमदेखील थांबवली जाऊ शकते, असं टीटीएलनं म्हटल्याचंही या अहवालात म्हटलं होतं.
चीनच्या कस्टमद्वारे रमला क्लिअरन्स मिळाला नसता असं तैवानच्या राष्ट्रीय विकास परिषदेनं एका फेसबुक पोस्टच्या माध्यमातून म्हटलं.
जानेवारीच्या अखेरीस ही रम विक्रीसाठी उपलब्ध होईल तेव्हा ती खरेदी करावी असं आवाहन तैवानच्या नॅशनल डेव्हलपमेंट काऊन्सिलने स्थानिकांना केलंय. तसंच याबरोबर डार्क अँड स्टॉर्मी कॉकटेल, रमचा वापर केलेले फ्रेंच टोस्ट आणि स्टिक अँड हॉट चॉकलेट अशा रेसिपीही शेअर करण्यात आल्या आहेत.
राष्ट्रीय विकास परिषदेनं केलेल्या पोस्टमध्ये लिथुआनिया बरोबर असलेल्या मैत्रीपूर्ण संबंधांचाही उल्लेख केला आहे. दोन्ही देशांनी एकमेकांबरोबर सामंजस्य करार केले असून दोन्ही देशांत द्विपक्षीय व्यापारी संबंध असल्याचंही म्हटलं आहे.
चीननं मात्र जागतिक व्यापारी नियम मोडतील असे कोणतेही व्यापारी निर्बंध लिथुआनियावर लादले नसल्याचं म्हटलं आहे. मात्र, चीननं युरोपीयन संघाचा सदस्य असलेल्या देशाची कस्टममध्ये व्यापारी अडवणूक केल्याचे अहवाल पडताळले असल्याचं म्हटलं आहे.
युरोपियन कमिशननं लिथुआनियाच्या वतीनं याबाबत निषेध व्यक्त केला आहे. तसंच याबाबत जागतिक व्यापार संघटनेत दावा करणार असल्याचं म्हटलं आहे.
रम अडवणे हे तर केवळ समोर आलेलं एक ताजं उदारहरण आहे. लिथुआनियाच्या निर्यातीमध्ये चीनचा वाटा केवळ 1 टक्के असला तरी, येथील व्यापाऱ्यांना अशा अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे.
राजकीय वाद असलेल्या देशांवर अनाधिकृत व्यापारी निर्बंध लादण्याचा बीजिंगचा इतिहास राहिलेला आहे. सध्यादेखील त्यांनी ऑस्ट्रेलियातील बीफ, वाईन आणि बार्लीसारख्या अनेक वस्तूंवर बंदी लादलेली आहे.
चीन-तैवानमधील नेमका वाद काय?
तैवान हा आपल्यातून फुटून बाहेर निघालेला प्रदेश असल्याचं सांगत चीन या बेटावर कायम आपली मालकी सांगत आला आहे. तर आपण सार्वभौम राष्ट्र असल्याचा तैवानचा दावा आहे. त्यावरूनच अनेक दशकं वाद सुरू आहे.
चीन आणि तैवान यांच्यातील संघर्षाला मोठा इतिहास आहे. 1940 च्या दशकात गृह युद्धादरम्यान चीन आणि तैवान यांचं विभाजन झालं होतं. त्यानंतर तैवान स्वतःला स्वतंत्र देश म्हणतो, तर चीन त्यांना स्वायत्त प्रांत म्हणतो.
गरज पडल्यास सामर्थ्याच्या जोरावर तैवानचा चीनमध्ये समावेश करण्याचं वक्तव्यही चीन करतो. तैवानचं स्वतंत्र संविधान, लोकशाही पद्धतीनं निवडलेले नेते आणि सुमारे तीन लाखांचं सक्रिय लष्कर आहे.
तैवानला काही देशांनीच मान्यता दिली आहे. बहुतांश देश तैवानला चीनचाच भाग मानतात. अमेरिकेचेही तैवानबरोबर अधिकृत द्विपक्षीय संबंध नाहीत. मात्र, अमेरिका तैवान रिलेशन्स अॅक्ट अंतर्गत त्यांना शस्त्र विक्री करतो. तैवानला स्वसंरक्षणासाठी आवश्यक असलेली मदत पुरवण्याचा उल्लेख, त्या कायद्यात आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)