You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
शिवसेनाः रामदास कदम यांच्यानंतर शिवाजीराव आढळराव पाटील नाराज आहेत का?
"आम्ही महाविकास आघाडी मान्य केली आहे पण आम्हाला शिवसेनेचं आमचं अस्तित्व तरी टिकवू द्या. आम्हाला शिवसैनिक म्हणून जगू द्या."
शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी हे वक्तव्य केलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवसेनेवर अन्याय होत असल्याची भावना आढळराव-पाटील यांनी व्यक्त केली आहे. पण आढळराव-पाटील हे का नाराज आहेत? याबाबतचा हा आढावा.
'शिवसैनिक म्हणून जगू द्या' असं का म्हटलं?
16 डिसेंबर 2019 ला सुप्रीम कोर्टाने बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी दिली. त्यानंतर राज्यातली पहीली बैलगाडा शर्यत ही लांडेवाडी (तालुका आंबेगाव) या ठिकाणी आयोजित करण्यात आली.
शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी यासाठी पुढाकार घेतला. शितळादेवीच्या यात्रेच्या उत्सवानिमित्त ही बैलगाडा शर्यत भरवण्यात नियोजन करण्यात आलं होतं. जिल्हाधिकारी प्रशासनाने यात्रेला एक आठवडा आधी परवानगीही दिली.
1 जानेवारीला ही शर्यत होणार होती. पण 31 डिसेंबरला रात्री 9.30 च्या सुमारास जिल्हाप्रशासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही शर्यत रद्द करण्याचे आदेश काढले.
या आदेशाविरुद्ध सर्व बैलगाडा मालकांनी 1 जानेवारीला निषेध केला. यावेळी आढळराव पाटीलही उपस्थित होते.
त्यावेळी बोलताना ते म्हणाले, "जिल्ह्याचे आणि राज्याचे राजकारण वेगवेगळे आहे. यात जिल्हाधिकाऱ्यांनी पडू नये. सात वर्ष शेतकऱ्यांनी बैलगाडा शर्यत केली नाही. आता सुप्रीम कोर्टाने याला परवानगी दिली आहे. सर्व नियम पाळून ही शर्यत होणार होती. तर आता ती ऐनवेळेला रद्द करण्यात आली ही शेतकऱ्यांची फसवणूक आहे."
या संपूर्ण घटनेनंतर आढळराव पाटील यांनी महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेसवरही निशाणा साधला. त्यांची राष्ट्रवादीबद्दलची असलेली नाराजी माध्यमांकडे उघडपणे बोलून दाखवली.
ते म्हणाले, "महाविकास आघाडी ही तुमच्या फायद्यासाठी आहे. गेली दोन वर्ष आम्ही या सरकारमध्ये असलो तरी पुणे जिल्ह्यात आमच्यावर वेगवेगळ्या पद्धतीने वार केले जात आहेत. पुण्यातील शिवसेना संपवण्याचा हा प्रयत्न आहे. पुण्यातील शिवसैनिकांना संपवू नका. आम्हाला जगू द्या".
राष्ट्रवादी कॉंग्रेसवर निशाणा?
शिवसैनिकांना जगू द्या असं तुम्ही का म्हणता आहात? तुमचा निशाणा कोणावर आहे? हे प्रश्न विचारले असता ते पुढे सविस्तर बोलतात, "बैलगाडा शर्यत रद्द करण्याचा काहीच कारण फक्त ती आढळराव-पाटील यांनी आयोजित केली आहे, म्हणून अनेकांच्या डोळ्यात खुपत होती. ती कोणाच्या डोळ्यात खुपत होतं हे वेगळं सांगण्याची गरज नाही."
असं म्हणत त्यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली. आंबेगाव हा दिलीप वळसे पाटील यांचा मतदारसंघ आहे.
त्याचबरोबर आढळराव पाटील पुढे म्हणतात, "आमचा खेड तालुक्याचा पंचायत समितीचा सभापती गेल्या सहा महिन्यांपासून तुरुंगात आहे. त्यांच्यावर 307 गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला जामीन मिळू नये, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि नेते दबाव टाकत असल्याची माहिती आहे.
"त्याचबरोबर गृहमंत्र्यांच्या जवळच्या कार्यकर्त्याने माझ्या कार्यकर्त्याला धमकावलं. माझा व्हिडीओ स्टेटसला ठेवला म्हणून संपवून टाकू अशा धमक्या दिल्या जात आहेत. "
याबाबत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचं काय म्हणणं आहे हे आम्ही जाणून घ्यायचा प्रयत्न केला.
त्यावेळी ते म्हणाले, "कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध कडक करण्यात आले आहेत. जेव्हा निर्बंध शिथिल करण्यात येतील, तेव्हा बैलगाडा शर्यत भरेल."
याव्यतिरिक्त त्यांनी कुठल्याही राजकीय टिकेला उत्तर देण्यास नकार दिला.
पुणे जिल्ह्यात आघाडीत बिघाडी का आहे?
शिवाजीराव आढळराव पाटील आणि दिलीप वळसे पाटील यांच्यातला राजकीय संघर्ष 15 वर्षांपासून सुरू आहे.
आंबेगावमधील वरिष्ठ पत्रकार संतोष वळसे-पाटील सांगतात, "पूर्वी आढळराव पाटील हे काँग्रेसमध्ये होते. त्या काळात दिलीप वळसे पाटील आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांची चांगली मैत्री होती. 2004 साली आढळराव-पाटील हे शिरूर मतदारसंघातून लोकसभेच्या तिकीटासाठी प्रयत्न करत होते. पण राष्ट्रवादीकडून त्यांना मदत केली गेली नाही, म्हणून आढळराव-पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
"2004 साली ते शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले. तेव्हापासून दिलीप वळसे पाटील आणि आढळराव पाटील यांच्यामध्ये राजकीय संघर्ष आहे. राज्यात जरी शिवसेनेचा मुख्यमंत्री असला तरी स्थानिक पातळीवरचे राजकारण आणि वाद पूर्वीसारखेच आहेत. "
सत्तेसाठी महाविकास आघाडीचे नेते एकत्र आले. पण शिवसेनेचे निवडून आलेले आमदार हे राष्ट्रवादी किंवा कॉंग्रेसविरुद्ध निवडून आले आहेत. राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या आमदारांचं तसंच आहे.
पुण्याचे जेष्ठ पत्रकार श्रीधर लोणी सांगतात, " राज्यातले नेते जरी सत्तेसाठी एकत्र असले तरी निवडणुकांआधी त्यांचा संघर्ष आत्ताच्या घटक पक्षांबरोबरच होता. त्यामुळे राज्यातल्या राजकारण बदललं तरी स्थानिक पातळीवरची गणित आणि संघर्ष हा कायम आहे."
कोण आहेत शिवाजीराव आढळराव पाटील?
शिवाजीराव आढळराव पाटील हे शिवसेनेचे माजी खासदार आहेत. पुणे जिल्ह्यातल्या शिरूर मधून ते पहिल्यांदा 2004 साली निवडून आले. त्यानंतर 2009 आणि 2014 च्या लोकसभा निवडणुकीतसुद्धा त्यांनी निवडणूक जिंकत आपला गड कायम राखला.
सलग 15 वर्षे खासदार राहिलेल्या शिवाजीराव आढळराव पाटील यांना 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागला.
शिवेसेनेतून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये गेलेले अमोल कोल्हे यांनी शिरूरमधून लोकसभा निवडणूक लढवली आणि आढळराव पाटील यांना पराभूत केलं.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)