अजित पवारांचे भाजप आमदाराकडून जाहीर कौतुक, कार्यक्रमातच मिळाली ऑफर #5मोठ्याबातम्या

अजित पवार, उद्धव ठाकरे, महाविकास आघाडी सरकार, भाजप, मुंबई

फोटो स्रोत, TWITTER

फोटो कॅप्शन, उपमुख्यमंत्री अजित पवार
Published
वाचन वेळ: 4 मिनिटे

विविध वृत्तपत्रं आणि वेबसाईट्स यांचा घेतलेला आढावा

1.अजितदादांचा फॅन- भाजप आमदारानं केलं कौतुक, जाहीर कार्यक्रमात मिळाली ऑफर

भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी जाहीर कार्यक्रमात 'आपण अजितदादांचे फॅन आहोत', असं वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी जयकुमार गोरे यांना पक्षात येण्याची ऑफर दिली. 'न्यूज18 लोकमत'ने ही बातमी दिली आहे.

बारामतीमध्ये खाजगी हॉस्पिटलच्या योजनेच्या शुभारंभ पार पडला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे आणि भाजपचे आमदार जयकुमार गोरे एकत्र आले होते. यावेळी बोलत असताना जयकुमार गोरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर स्तुतीसुमनं उधळली.

"अजितदादांचे काम, दादांचे कर्तृत्व आपल्याला माहीत आहे. दादांची शिस्त मी पहिली आहे, आम्ही राजकीय विरोधक जरी असलो तरी राजकारणाच्या पलीकडे जाऊन मी अजितदादांचा फॅन आहे आणि मला हे मला सांगायला काही वाटत नाही. आमचं राजकीयदृष्ट्या प्रत्येकांशी जमत नाही. पण, दादांचं धाडस, दादांचा स्पष्टवक्तेपणा मी पाहिला आहे", असं गोरे यांनी कौतुक केलं.

त्यानंतर लगेचच बोलायला उभे राहिलेले राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी जयकुमार गोरेंना पक्षात येण्याची ऑफर दिली. "बारामतीच्या नेत्यानी जर एखाद्याला हात दिला तर दगडात देखील पाणी काढू शकतात. आमच्या दादांचे तुम्ही तोंड भरून कौतुक केलंय. भाऊ तुम्ही हाडाचा कार्यकर्ता आहात. चुकतो तोच माणूस असतो. आमच्या नेत्याचा उल्लेख चांगला केला आहे. तुमच्या डोक्यात चांगला विचार येऊ द्या आणि भविष्यात चांगला विचार भविष्यात करा," असं म्हणत भरणेंनी जयकुमार गोरेंना राष्ट्रवादीची ऑफर दिली.

2. मोदीजी मौन सोडा, चीनला उत्तर द्यावं लागेल- राहुल गांधी

"गलवानवर आपला तिरंगाच चांगला वाटतो, चीनला उत्तर द्यावं लागेल, मोदीजी मौन सोडा," असे ट्वीट राहुल गांधी यांनी केले आहे. नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी चीनकडून गलवान खोऱ्यात त्यांचा राष्ट्रीय ध्वज फडकवल्याचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करण्यात आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर राहुल यांनी हे ट्वीट केलं आहे. 'एबीपी माझा'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.

राहुल गांधी, पंतप्रधान नरेंद्र मोदी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, राहुल गांधी

चीनच्या राष्ट्रीय वृत्तपत्रांनी याबाबत माहिती देताना म्हटले आहे की, गलवान खोऱ्यात फडकवण्यात आलेला ध्वज हा चीनचा राष्ट्रीय ध्वज आहे.

चीनने 23 ऑक्टोबर 2021 रोजी कोस्ट गार्ड कायदा हा नवा सीमा कायदा मंजूर केला आहे. तो 1 जानेवारी 2022 रोजी प्रत्यक्षात लागू केला आहे. सीमा आणि सागरी वाहतूक सुरक्षा कायद्याप्रमाणेच सीमा वादांसह चीन आणि शेजारील देशांमधील वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हा नवीन कायदा मंजूर करण्यात आला.

3. नितीन गडकरींनी मानले माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचे आभार

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे आभार मानले आहेत. गडकरी म्हणाले, नागपूर ते काटोल या चौपदरी रस्त्याचा शुभारंभ झाला. त्यावेळी गडकरी बोलत होते.

नितीन गडकरी, अनिल देशमुख

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

"या रस्त्यासाठी अनेक अडचणी आल्या. वनविभागाने हा वाघांच्या जाण्याचा मार्ग असल्याचे सांगितले. माझा जन्म तुमच्या आधी झाल्याचे मी त्यांना म्हटले. इतक्या वर्षात इथे कोणत्या गावात वाघ शिरला नाही तर तुम्ही कुठे घुसवत आहात. त्रास द्यायचे काम कशाला करता. अनिल देशमुखांनी मदत केली तेव्हा वनविभागाची परवानगी मिळाली. नाहीतर मिळतच नव्हती. या रस्त्याकरता त्यांचेही मी आभार मानतो. येणाऱ्या काळामध्ये सगळ्या अडचणी दूर करुन हा रस्ता पूर्ण होणार आहे," असं गडकरी म्हणाले. 'लोकसत्ता'ने ही बातमी दिली आहे.

100 कोटी रुपयांच्या खंडणीप्रकरणी ईडीने अटक केल्यानंतर महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची न्यायालयीन कोठडीत आहेत. खंडणीचा आरोप आणि संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात 13 तास चौकशी केल्यानंतर २ नोव्हेंबर रोजी ईडीने देशमुख यांना अटक केली होती. सध्या देशमुख मुंबईतील आर्थर रोड तुरुंगात आहेत.

4. पालिकेच्या सत्तेची खुर्ची डळमळित झाल्यानंतर मुंबईकराची आठवण- आशिष शेलार

महापालिकेच्या सत्तेची खुर्ची डळमळली तेव्हाच मुंबई'करां'ची आठवण झाली, अशा शब्दात भाजप आमदार आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

मुंबईतील 500 चौरस फुटापर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर माफ करण्याची घोषणा शनिवारी करण्यात आली. "आतापासूनच नाही तर वचन दिलेत त्या तारखेपासून 500 चौरर फुटापर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर पूर्ण माफ करा. अती श्रीमंत सोडून ज्या मध्यमवर्गीयांची घरं 500 चौ. फु. पेक्षा मोठी आहेत, त्यांचाही 500चौ. फु. पर्यंतचा कर माफ करा? 500 चौ. फु.पर्यंतच्या दुकानदारांही हीच सूट देणार का?, असे प्रश्न शेलार यांनी विचारले आहेत. 'टीव्ही9मराठी'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.

आशिष शेलार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

फोटो स्रोत, ASHISH SHELAR / FACEBOOK

फोटो कॅप्शन, आमदार आशिष शेलार

त्याचबरोबर 'सरकारच्या तिजोरीत खडखडाट होता तरीही प्रथम बिल्डरांना प्रिमियममध्ये 11 हजार कोटींची सूट दिलीत. बार, पब, रेस्टॉरंटना लायसन्स फी मध्ये सवलत दिलीत. विदेशी दारुला करात 50 टक्के सूट दिलीत. वायनरींवर पण सवलतींची खैरात झाली. आता पालिकेच्या सत्तेची खुर्ची डळमळली तेव्हा मुंबई"करां"ची आठवण झाली', अशी टीकाही शेलार यांनी शिवसेनेवर केली आहे.

5. कालीचरणच्या समर्थनार्थ बजरंग सेना रस्त्यावर

मध्य प्रदेशातील इंदूर येथे गोरक्षण संघटना आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी रविवारी कालीचरण महाराजाच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करत छत्तीसगढ सरकारने केलेल्या कारवाईचा निषेध नोंदवला. 'लोकमत'ने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.

कालीचरण

फोटो स्रोत, CG KHABAR/BBC

फोटो कॅप्शन, कालीचरण

आज रायपूर कोर्टात कालीचरणच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. इंदूरमधल्या रिगल चौकात महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर विरोध प्रदर्शन करण्यात आलं. या दोन संघटनांनी छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचा पुतळाही जाळला.

महात्मा गांधी यांना उद्देशून आक्षेपार्ह उद्गार काढल्याप्रकरणी कालीचरणला अटक करण्यात आली होती. छत्तीसगडची राजधानी इथे भरलेल्या धर्मसंसदेमध्ये महात्मा गांधींबाबत वादग्रस्त वक्तव्य करताना कालीचरण महाराज यांनी गांधीजींचा मारेकरी नथुराम गोडसेला वंदन केलं.

त्यावेळी काही उपस्थितांनी टाळ्या वाजवल्या. महात्मा गांधींबाबत अपशब्द काढणाऱ्या कालीचरण महाराजांविरोधात रायपूर महापालिकेचे सभापती आणि काँग्रेस नेते प्रमोद दूबे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे प्रमोद दूबे हे या धर्मसंसदेचं आयोजन करणाऱ्यांपैकीच एक होते.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)