ओमिक्रॉनबाधित व्यक्तीचा भारतातला पहिला मृत्यू पिंपरी-चिंचवडमध्ये

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

पिंपरी-चिंचवड शहरात ओमिक्रॉनबाधित व्यक्तीचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. 52 वर्षीय पुरुषाचे शहरातील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात निधन झाले.

हे 52 वर्षीय गृहस्थ नायजेरियातून परतले होते. 28 तारखेला त्यांचा मृत्यू झाल्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाने पत्रकात सांगितले आहे.

या व्यक्तीला 13 वर्षांपासून मधुमेह होता. या व्यक्तीचा मृत्यू कोव्हिडशिवाय अन्य कारणांमुळे झाला आहे. राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेच्या अहवालात आज हे समजले की या व्यक्तीला ओमिक्रॉनची बाधा झाली होती.

गुरुवारी (30 ऑक्टोबर) राज्यात 5368 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर दिवसभरात 22 मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यात मृत्यूदर 2.12 टक्के इतका आहे.

आज राज्यात 198 ओमिक्रॉन रुग्णांची नोंद झाली आहे.

ओमिक्रॉनबाधित मृत्यू झालेली व्यक्ती कोण?

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार,

  • हा व्यक्ती 12 डिसेंबरला नायजेरियाहून आला होता
  • 17 डिसेंबरला या व्यक्तीला छातीत दुखू लागलं. या रुग्णाला पिंपरीच्या यशवंतराव चव्हाण रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे सांगतात, "रुग्णालयात दाखल झाल्यानंतर 17 डिसेंबरला या व्यक्तीची कोव्हिड टेस्ट करण्यात आली. त्यानंतर करण्यात आलेली दुसरी टेस्टही निगेटिव्ह होती." वैद्यकीय तपासणीत समोर आलं की या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आला होता.

नायजेरियातून आल्याने या रुग्णाला स्पेशल वॉर्डमध्ये दाखल करण्यात आलं होतं. या व्यक्तीवर उपचार सुरू करण्यात आले होते.

डॉ. गोफणे पुढे म्हणाले, "20 तारखेला या व्यक्तीची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. नायजेरियातून आल्याने त्याचा रिपोर्ट ओमिक्रॉन चाचणीसाठी पाठवण्यात आला." पण, या रुग्णाला फार जास्त लक्षणं दिसून आले नाहीत.

पालिका अधिकारी पुढे माहिती देतात, 27 डिसेंबरला या रुग्णाला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यात त्यांचा मृत्यू झाला.

"पिंपरीमध्ये सद्य स्थितीत 25 रुग्ण ओमिक्रॉनचे आहेत. या रुग्णांना अत्यंत सौम्य लक्षणं आहेत," डॉ. गोफणे पुढे म्हणाले.

नववर्षाच्या पार्श्वभूमीवर विशेष खबरदारी

ओमिक्रॉन व्हेरियंटच्या प्रसारासह एकूणच कोविड बाधित रुग्णांची संख्या वाढीस लागल्याने राज्य सरकार अतिदक्ष झाले आहे.

या पार्श्वभूमीवर राज्याचे पर्यटन, पर्यावरण मंत्री तथा मुंबईचे (उपनगर) पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात आज (29 डिसेंबर) एक आढावा बैठक घेतली.

कोरोना

फोटो स्रोत, Hindustan Times

त्यानंतर महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी देखील महानगरपालिका प्रशासनाची दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा बैठक घेवून विविध निर्देश दिले आहेत. त्या सूचना खालीलप्रमाणे -

नववर्ष स्वागताचे कार्यक्रम / समारंभ / पार्टी आयोजित न करण्याची सूचना यापूर्वीच देण्यात आल्या आहेत. हॉटेल्स्, उपहारगृहं यांच्यासह विविध आस्थापनांना उपस्थितीच्या मर्यादा ठरवून देण्यात आल्या आहेत. त्याचे योग्यरीतीने पालन होते आहे, यावर देखरेख ठेवण्यासाठी सर्व प्रशासकीय विभाग कार्यालयांनी तातडीने भरारी पथकांची नेमणूक करावी. स्थानिक पोलीस उपायुक्तांशी समन्वय साधून या पथकांमध्ये पोलीस कर्मचाऱयांचा देखील समावेश करावा. याशिवाय इतरही सूचना देण्यात आल्या आहेत.

  • नववर्ष स्वागत प्रतिबंधात्मक आदेश तसेच कोविड प्रतिबंधात्मक सूचनांचे उल्लंघन करताना आढळणाऱ्या हॉटेल्स्, उपहारगृहांवर सक्त कारवाई करावी.
  • सर्व सहायक आयुक्तांनी आपापल्या अखत्यारितील हॉटेल्स्, उपहारगृहं यांचे दैनंदिन फुटेज तपासून उपस्थितीचे नियम पाळले जात असल्याची खातरजमा करावी.
  • मालाड येथील कोविड उपचार केंद्र हे लहान मुलांवर उपचारांसाठी महत्त्वाचे आहे. या केंद्रासह कांजूरमार्ग येथे उभारलेले कोविड उपचार केंद्र देखील लवकरात लवकर कार्यान्वित करावे.
  • दुबईमधून येणाऱ्या आंतरराष्ट्रीय हवाई प्रवाशांना सक्तीने सात दिवस गृह विलगीकरण करण्याचे निर्देश व त्याअनुषंगाने करावयाच्या कार्यवाहीबाबत महानगरपालिका प्रशासनाने दिनांक 24 डिसेंबर 2021 रोजी आदेश दिले आहेत. या आदेशांमध्ये आता फक्त दुबईऐवजी संपूर्ण संयुक्त अरब अमिराती देशांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच संयुक्त अरब अमिराती (यूएई) देशांमधून मुंबईत येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला विमानतळावर आगमनप्रसंगी आरटीपीसीआर (ऑन अरायव्हल टेस्टींग) चाचणी करावी लागेल. या चाचणीच्या अहवालासापेक्ष व प्रचलित नियमानुसार संबंधित प्रवाशांचे विलगीकरण ठरविण्यात येईल.
  • हवाईमार्गे मुंबईत येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांमधून, ज्या बाधितांना लक्षणे नाहीत (एसिम्प्टोमॅटिक) आणि औषधोपचाराची देखील गरज भासत नाही, अशा रुग्णांसाठी वांद्रे-कुर्ला संकुल व गोरेगावातील नेस्को या दोन्ही कोविड उपचार केंद्रामध्ये प्रत्येकी 500 रूग्णशय्यांची स्वतंत्र विलगीकरण व्यवस्था कार्यान्वित करावी.
  • विमानतळावर, रॅपिड टेस्टमध्ये बाधित आढळलेल्या रुग्णांची नियमित आरटीपीसीआर चाचणी करावी. ती चाचणी निगेटिव्ह असेल तर प्रचलित नियमानुसार विलगीकरणाची कार्यवाही करावी. जर चाचणी पॉजिटिव्ह आली तर त्या रुग्णास प्रचलित नियमानुसार विलगीकरण अथवा रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घ्यावा. तसेच नियमित आरटीपीसीआर चाचणीचेच नमुने जनुकीय सूत्रनिर्धारण तपासणी (जिनोम सिक्वेसिंग) साठी पाठवावे.
  • प्रत्येक विभाग कार्यालयाच्या हद्दीमध्ये, कोविड बाधितांच्या विलगीकरणासाठी किमान 500 व्यक्ती क्षमतेचे कोविड काळजी केंद्र (सीसीसी 2) लवकरात लवकर कार्यान्वित करावेत.
  • सर्व विभाग कार्यालयांमधील विभाग नियंत्रण कक्ष (वॉर्ड वॉर रुम) मध्ये येत्या दोन महिन्यांसाठी प्रशिक्षणार्थी डॉक्टर अतिरिक्त संख्येने नेमण्यात येणार आहेत. गृह विलगीकरणात राहत असलेल्या रुग्ण व व्यक्तींचा पाठपुरावा करण्यासह इतर वैद्यकीय सेवांसाठी या प्रशिक्षणार्थींच्या सेवा उपयोगात येतील.
  • सर्व रुग्णालये आणि कोविड उपचार केंद्रामधील मनुष्यबळ, संयंत्रे व इतर यंत्रणा, औषधसाठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत किंवा कसे, याचा आढावा घेवून त्यामध्ये कमतरता राहणार नाही, याची खात्री करावी.

31 डिसेंबरसाठी गृहविभागाने जारी केली नियमावली

राज्याच्या गृह विभागानेही कोरोना व्हायरस साथीच्या पार्श्वभूमीवर नियमावरी प्रसिद्ध केली. त्यानुसार खालील सूचना सर्व नागरिकांना देण्यात आलेल्या आहेत.

  • नवीन वर्ष शक्यतो घरीच साजरं करा
  • समुद्र किनारा, सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी
  • संध्याकाळी 9 ते सकाळी 6 सार्वजनिक ठिकाणी पाचपेक्षा जास्त लोक नाहीत
  • गेट-ने ऑेफ इंडिया, मरिन डृाइव्ह, गिरगाव आणि जुहू चौपाटीवर गर्दी करू नये
  • नवीन वर्षाच्या स्वागतासाठी धार्मिक/सांस्कृतिक कार्यक्रम करू नयेत
  • फटाक्यांची आतशबाजी करू नये

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)