शरद पवार: 'भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्तास्थापनेबाबत मोदींशी चर्चा झाली होती पण...' #5मोठ्याबातम्या

फोटो स्रोत, Getty Images
विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर आज प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा :
1. 'भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्तास्थापनेबाबत मोदींशी चर्चा झाली होती पण...' - शरद पवार
महाराष्ट्रात 2019 मधील विधानसभा निवडणुकांनंतर समोर आलेल्या सत्तेच्या गणितामुळं अनेकांना धक्का बसला. विशेषतः सर्वाधिक जागा मिळालेल्या भाजपलाही सत्तेपासून दूर राहावं लागलं. कारण शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं आघाडी करत सत्ता स्थापन केली.
पण, त्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्यासंदर्भात दिल्लीत चर्चा झाली होती, मात्र मी स्वतः त्यांना त्यासाठी नकार दिला असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले. लोकसत्तानं याबाबतचं वृत्त दिलं आहं.
आमची भूमिका वेगळी आहे, त्यामुळे तुम्हाला अंधारात ठेवायचं नाही, असं मी स्वतः मोदींना त्यांच्या कार्यालयात भेटून सांगितलं होतं, असंही पवारांनी स्पष्ट केलं.
तरीही नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा यावर विचार करावा असंही म्हटलं होतं. शिवसेनेशी फारकत घेतल्यानंतर भाजपला राष्ट्रवादीची गरज भासली असू शकते असंही पवारांनी म्हटलं आहे.
लोकसत्ता या वृत्तपत्राच्यावतीनं शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त 'अष्टावधानी' या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. यावेळी शरद पवार यांनी मुलाखती दरम्यान या घटनांचा उलगडा केला.
2. 'धर्मसंसदेतील वक्तव्य गृहयुद्ध भडकावण्याचा प्रयत्न, अशा शक्तींविरोधात मुस्लीम एकत्रितपणे लढतील' -नसिरुद्दीन शहा
धर्मसंसदेतील वादग्रस्त वक्तव्यावर अभिनेते नसिरुद्दीन शहा यांनी एका मुलाखतीत प्रतिक्रिया दिली आहे. मुस्लिमांविरोधातील अशी वक्तव्य देशात गृहयुद्ध भडकावण्याचा प्रयत्न आहे. पण अशा शक्तींच्या विरोधात मुस्लीम एकत्रितपणे लढतील असं नसिरुद्दीन शहा यांनी म्हटलं आहे. लोकमतनं याबाबतचं वृत्त दिलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
या देशामध्ये 20 कोटी मुस्लीम आहेत. ते सगळे भारतीयच आहेत. पण काही जणांना विनाकारण त्रास द्यायला आवडत असतं. विनाकारण वाद निर्माण करणं हाच त्यामागचा उद्देश असतो, असं ते म्हणाले.
माथेफिरू अशाप्रकारे भडकावण्याचं, चिथावणी देण्याचं काम करतच राहणार आहेत. मात्र आपण संयम ठेवायला हवा. तरीही विनाकारण त्रास दिल्यास आम्ही एकत्रितपणे लढून त्यांचा सामना करू, असं शहा म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही ट्वीट करून यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे.
ते म्हणाले, "फॅसिजम विरुद्ध मैदानात उतरून लढावंच लागेल. गोडसेच्या पाठीराख्यांना कायद्याच्या तरतुदीनुसार अद्दल घडवावी लागेल," असं त्यांनी तक्रार दाखल करण्यापूर्वी ट्विटवर म्हटलं.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
जितेंद्र आव्हाड यांनी कालीचरण महाराज यांच्या विरोधात ठाण्यातील नौपाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
3.व्यस्त असल्याने चौकशीला येऊ शकत नाही, नारायण राणेंचे पोलिसांच्या नोटीसला उत्तर
संतोष परब हल्ला प्रकरणात नितेश राणे यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. ते नॉटरिचेबल असल्याचं सांगण्यात येत असल्याने पोलिसांनी नारायण राणेंना नोटीस बजावत चौकशीसाठी बोलावलं. मात्र नारायण राणे यांनी व्यस्त असल्यामुळं येऊ शकत नाही, असं उत्तर या नोटीशीला दिलं आहे. न्यूज 18 लोकमतनं याबाबतचं वृत्त दिलं आहे.

फोटो स्रोत, FACEBOOK/NARAYAN RANE
अत्यंत व्यस्त असल्यामुळं 2-3 दिवस चौकशीसाठी येऊ शकत नाही. त्यानंतर येऊ शकेन. तसंच पोलीस व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारेही जबाब घेऊ शकतात, असं उत्तर नारायण राणे यांनी पोलिसांना पाठवलं आहे.
संतोष परब या शिवसेना कार्यकर्त्यावर हल्ला प्रकरणी नितेश राणेंवर आरोप आहे. या प्रकरणी अटकपूर्व जामीनासाठी त्यांनी अर्ज दाखल केला असून त्यावर सुनावणी होणार आहे.
दरम्यान, नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत नितेश राणे कुठे आहेत हे माहिती असलं तरी सांगणार नाही, असं वक्तव्य केलं होतं. त्यामुळं नारायण राणे यांना पोलिस ठाण्यात बोलावण्यात आलं होतं.
4. मुंबईत 5 जम्बो कोव्हिड सेंटरच्या कामाला वेग, मनपाचा 105 कोटींचा निधी
कोरोनाच्या रुग्णसंख्येत पुन्हाएकदा वेगानं वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबईतील रुग्णांचा आकडाही 2 हजारावर पोहोचला आहे. त्यामुळं भविष्यात खाटांची संख्या कमी पडू नये म्हणून मुंबई मनपानं 5 जम्बो कोव्हिड सेंटर सुरू करण्याची तयारी सुरू केली आहे.

फोटो स्रोत, AFP
मुंबई महानगर पालिकेनं यासाठी ठेकेदार नियुक्त केला आहे. त्यासाठी 105 कोटी रुपये दिले जाणार असून कोव्हीडचं प्रमाण कमी होईपर्यंत खासगी वैद्यकीय संस्थेकडे याची जबाबदारी असेल. लोकमतनं याबाबतचं वृत्त दिलं आहे.
पहिल्या लाटेत संसर्ग वाढल्यानं मुंबई महानगरपालिकेनं जम्बो कोव्हिड सेंटर सुरू केली होती. पण रुग्णसंख्या घटल्यानं त्यापैकी पाच बंद करण्यात आली होती. पण रुग्णसंख्या वाढल्यानं ती पुन्हा सुरू केली जात आहेत.
मुंबईत बीकेसी, दहिसर, मालाड, कंजूरमार्ग आणि सोमय्या याठिकाणची कोव्हिड सेंटर सुरू केले जाणार आहेत. जवळपास एकूण 4 हजारांपेक्षा अधिक बेड याठिकाणी उपलब्ध होतील.
5. ओमिक्रॉनमुळे परिस्थिती बिघडल्यास अडकेल्या कर्जांची स्थिती गंभीर होणार : आरबीआय
या आर्थिक वर्षामध्ये कर्जदारांकडे अडकलेल्या कर्जाचं प्रमाण (एनपीए) मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता असल्याचं भारतीय रिझर्व्ह बँकेनं एका अहवालामध्ये म्हटलं आहे. बीबीसी हिंदीनं याबाबतचं वृत्त दिलं आहे.
त्याचं मुख्य कारण म्हणजे कोरोनाच्या ओमिक्रॉन या नव्या व्हेरीएंटमुळं अर्थव्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
या रिपोर्टनुसार, प्रामुख्यानं सप्टेंबर 2022 पर्यंत बँकांमध्ये अडकलेलं कर्ज वाढून 8.1-9.5 टक्के होऊ शकतं. ते सप्टेंबर 2021 मध्ये 6.9 टक्के राहिलं आहे.
परिस्थिती सामान्य असली तरी एनपीए 8.1 टक्के होण्याचा अंदाज असल्याचं म्हटलं आहे. तर ओमिक्रॉनमुळं परिस्थिती बिघडल्यास हा आकडा 9.5 टक्क्यापर्यंत वाढू शकतो.
मात्र आरबीआयच्या ताज्या अहवालानुसार सप्टेंबरमध्ये बँकांच्या एकूण एनपीए आणि शुद्ध एनपीएमध्ये सुधारणा पाहायला मिळाली. सप्टेंबरमध्ये बँकांचा एकूण एनपीए घटून 6.9 टक्के झाला, तर शुद्ध एनपीए केवळ 2.3 टक्के राहिला आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
























