शरद पवारांचा नरेंद्र मोदींना सवाल, 'आम्ही चुका केल्या पण तुम्ही त्या 6 वर्षात का सुधारल्या नाही?'#5मोठ्याबातम्या

फोटो स्रोत, Getty Images
आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया
1. आम्ही चुका केल्या पण तुम्ही त्या 6 वर्षात का सुधारल्या नाही? - शरद पवार
'केंद्रात गेली 6 वर्षं मोदींचे सरकार आहे. ठीक आहे....आमच्याकडून चुका झाल्या, तर 6 वर्षांत तुम्हाला त्या दुरुस्त करता आल्या नाहीत का,' असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केला आहे. लोकमतनं ही बातमी दिली आहे.
दिवसेंदिवस वाढत्या इंधनदराने सर्वसामान्य हैराण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन दिवसांपूर्वीच पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतीला यूपीए सरकारचं त्यावेळचं धोरण कारणीभूत असल्याचा आरोप केला आहे.
शरद पवार माळेगाव बु (ता.बारामती) येथील शिवनगर विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आहेत. या संस्थेच्या सभेसाठी पवार शनिवारी(20 फेब्रुवारी) उपस्थित होते. यावेळी बारामतीत पत्रकारांशी बोलताना हा टोला लगावला आहे.
ते म्हणाले, केंद्र सरकारमध्ये सहा वर्षे सत्तेत असताना देखील चुका दुरुस्त करता येत नसेल, त्यावर चर्चा काय करायची?
2. '…तर मी माझी खासदारकी फेकून देतो'- संभाजीराजे
"मी काहीही राजकीय फायदा घेतल्याचं, स्टंट केल्याचं दाखवा. तसं दिसलं तर मी माझी खासदारकी फेकून देतो. मी समाजासाठी अहोरात्र महाराष्ट्र पिंजून काढतोय. संभाजीराजेंना टार्गेट केल्यास टीआरपी वाढतो," असं खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं आहे. टीव्ही 9 मराठीनं ही बातमी दिली आहे.
ते पंढरपूरात बोलत होते.

फोटो स्रोत, Yuvraj Sambhajiraje Chhatrapati/facebook
ते पुढे म्हणाले, "मी भाजपकडून खासदार आहे म्हणून त्यांची शाल घेऊन फिरत नाही. पण किल्ले रायगडवरून कुणी आरोप केल्यास गाठ माझ्याशी आहे. मी कधीच राजकारण केलं नाही आणि करत नाही. माझा राग पुरातत्व खात्यावर आहे. किल्ल्यावरून मला राजकीय टॅग करू नका. अन्यथा गाठ माझ्याशी आहे."
पुरातत्व खात्यानं शिवजयंतीच्या दिवशी रायगडावर रोषणाई केली होती, त्यावर संभाजीराजेंनी नाराजी व्यक्त केली होती.
3. कार्यालयीन वेळांची 10 ते 5 ही मानसिकता बदलण्याची गरज : मुख्यमंत्री
'कोरोनाचा लढा हा संपलेला नाही, कार्यालयीन वेळेच्या बाबतीतही पारंपरिक 10 ते 5 ही मानसिकता बदलून वेगवेगळ्या कार्यालयीन वेळांचं नियोजन करणं गरजेचं आहे. त्यासाठी केंद्रानं राष्ट्रीय धोरण आखावं,' असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. एबीपी माझानं ही बातमी दिली आहे.

फोटो स्रोत, TWITTER
मुंबई लोकल सुरू केल्यानंतर सर्वसामान्यांना लोकल प्रवास करण्यासाठी काही वेळा ठरवून दिल्या होत्या. त्यावेळी कामकाजाची वेळ बदलण्यासाठी राज्य सरकारनं सर्व कार्यालयांना विनंती आणि आवाहन केलं होतं.
अशातच शनिवारी (20 फेब्रुवारी) नीती आयोगाची बैठक झाली तेव्हा, त्यावेळी थेट पंतप्रधानांसमोर ही बाब मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवली आहे.
4. पामेला गोस्वामी यांचा सहकाऱ्यावर आरोप
भाजयुमोच्या नेत्या पामेला गोस्वामी यांना पोलिसांनी 100 ग्रॅम कोकेन गाडीतून नेताना पकडलं होतं. पण, यामागे भाजप नेते राकेश सिंग यांचा कट असल्याचा आरोप आता पामेला यांनी केला आहे. एनडीटीव्हीनं ही बातमी दिली आहे.
"याप्रकरणाची सीआयडी चौकशी झाली पाहिजे. भाजप नेते राकेश सिंग जे कैलाश विजयवर्गीय यांच्या जवळचे आहेत, त्यांना अटक झाली पाहीजे. हा त्यांनीच रचलेला कट आहे. माझ्याकडे सगळे पुरावे आहेत," असं गोस्वामी यांनी म्हटलं आहे.
कोर्टात घेऊन जात असताना असे आरोप करणारा पामेला यांचा व्हीडिओ व्हायरल झाला आहे.
दरम्यान, राकेश सिंग यांनी हे आरोप फेटाळले आहेत. माझा या महिलेशी काही संपर्क नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
5. देशातील 63.5 टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांचं लसीकरण
देशातील 63.5 टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांना आतापर्यंत कोरोना लस देण्यात आल्याचं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे.

फोटो स्रोत, Reuters
पुढच्या 5 दिवसांत शक्य तितक्या आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्याचा प्रयत्न करावा, असंही मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे.
1 कोटी 8 लाख कोरोनाचे डोस देशभर वितरित करण्यात आले. यात 63 लाख आरोग्य कर्मचाऱ्यांना आतापर्यंत कोरोना लशीचा एक तरी डोस मिळाला आहे., असं मंत्रालयानं सांगितलं आहे. हिंदुस्तान टाईम्सनं ही बातमी दिली आहे.

हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)
























